महाराष्ट्र

maharashtra

धुळे: शासनाच्या आदेशानंतर शहरातील मंदिरे दर्शनासाठी खुली

By

Published : Nov 16, 2020, 7:08 PM IST

तब्बल आठ महिन्यांच्या कालावधीनंतर राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे उघडण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. श्रीराम मंदिरात भाजप व्यापारी आघाडीच्या वतीने आरती करून फटाके फोडत आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.

एकवीरा देवी
एकवीरा देवी

धुळे -तब्बल आठ महिन्यांच्या कालावधीनंतर राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे उघडण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. बलिप्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर धुळे शहरातील आदिशक्ती एकवीरा देवीचे मंदिर तसेच आग्रा रोडवरील श्रीराम मंदिर उघडण्यात आले. यावेळी श्रीराम मंदिरात भाजप व्यापारी आघाडीच्यावतीने आरती करून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण राज्यातील मंदिरे गेल्या 8 महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले होते. राज्यातील धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी भाजपच्या वतीने तसेच अन्य विरोधी पक्षाच्या वतीने आंदोलने करण्यात आली होती. अखेर राज्य सरकारने दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंदिरे उघडण्यास परवानगी देण्यात आली. मंदिरे उघडताना राज्यसरकारने नियमावली जाहीर केली असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. धुळे शहरातील तसेच महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ असलेले खान्देश कुलस्वामिनी श्री एकवीरा देवीचे मंदिर तसेच आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी शासनाच्या नियमांचे पालन करण्यात आले. आग्रा रोड परिषदेच्या मंदिरात भाजप व्यापारी आघाडीच्या वतीने महाआरती करण्यात आली तसेच भजन करण्यात आले. आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील दारूची दुकाने सुरू करण्यात आली मात्र मंदिरे बंद ठेवण्यात आली होती भाजपने वेळोवेळी आंदोलने करून मंदिरे उघडण्यात राज्य सरकारला भाग पाडले, अशी टीका डॉ. सुभाष भामरे यांनी यावेळी केली.

अशी घेण्यात येते काळजी

राज्य सरकारने मंदिरे उघडण्यास परवानगी दिल्यानंतर धुळे शहरातील मंदिर विश्वस्तांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत भाविकांना दर्शन उपलब्ध करून दिले आहे. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले असून मुख्य गाभाऱ्यापासून दूर अंतरावर उभे राहून दर्शन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच मंदिरात होणाऱ्या आरतीला भाविकांना उपस्थित न राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच येणाऱ्या प्रत्येक भाविकाची थर्मामीटर आणि ऑक्सिमीटरने तपासणी करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details