चंद्रपूर Man Killed in Tiger Attack: चंद्रपूर जिल्हा हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोचला आहे. मात्र कधी नव्हे ते आता वाघांनी चंद्रपूर शहराच्या दिशेने कूच केली आहे. चंद्रपूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या शनी मंदिरात, एक व्यक्ती गेला असता त्यावर वाघाने हल्ला करून ठार केलं आहे. मनोहर वाणी (वय 53) असं मृतकाचे नाव आहे.
असा केला वाघाने हल्ला : चंद्रपूर शहराच्या बाबूपेठ वस्तीला लागून जुनोना जंगल सुरू होते. याच परिसरात शनी मंदिर (Shani Mandir) आहे. मृतक मनोहर वाणी येथील मंदिरात दररोज पूजा करण्यासाठी जातात. आज सकाळी ते पूजा करण्यासाठी गेले असता त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने मनोहर यांच्यावर हल्ला केला. वाघाने मृत झालेल्या वाणी यांना शनी मंदिरापासून तब्बल 300 ते 400 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेलं. मनोहर वाणी यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. कुडे यांनी वनविभागाला सदर घटनेची माहिती देत मृतकाच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली. मनोहर हे घरचे कर्ते पुरुष होते, घरची आर्थिक परिस्थिती बिकट असून त्यांना दोन मुली आहेत.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविणार: प्राथमिकदर्शी हा हल्ला वाघाचाच असल्याचे समोर येत आहे. मात्र याबाबत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुष्टी होणार आहे. नुकसान भरपाई म्हणून मृतकाच्या कुटुंबाला तात्काळ 25 हजार देण्यात आले. वाघाच्या हल्ल्यात मृतकाच्या कुटुंबाला 25 लाख नुकसान भरपाई मिळते. 10 लाख नगदी तर 15 लाख फिक्स डिपॉझिटमध्ये जमा केले जातात. मात्र वाघाच्या हल्ल्याची पुष्टी झाल्यावर ही नुकसानभरपाई देण्याचं वनविभागानं सांगितलं आहे.
बाबुपेठ परिसरात वाघ, बिबट्याचा वावर : बाबूपेठ वस्तीला लागूनच जंगल लागून असल्याने येथे हिंस्र प्राणी दिसून येतात. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघ आणि बिबट्या फिरत असल्याचे नागरिक सांगत आहेत. या वाघांचा तात्काळ बंदोबस्त करावा त्यासाठी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. तसेचजिथे घटना घडली त्या परिसरात अनेक लोक दररोज मॉर्निंग वॉकला जातात. मात्र आज घडलेल्या घटनेमुळं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
हेही वाचा -
- Tiger Hunting Racket Exposed: गडचिरोलीतील वाघाच्या शिकारीच्या रॅकेटचे केंद्र दिल्लीत... निवृत्त वनाधिकारीच निघाला आरोपी!
- Tiger injured in Melghat : मेळघाटात वाघ जखमी, उपचारासाठी वनविभाग घेत आहे शोध
- Tiger Death in Maharashtra : जागतिक व्याघ्र दिनालाच चार वर्षाच्या वाघिणीचा मृत्यू, मृत्यूचे नेमके कारण काय?