महाराष्ट्र

maharashtra

मुख्य अधिकाऱ्याच्या बनावट सहीने बेरोजगार युवकांना दीड कोटींचा गंडा, आरोपी फरार

By

Published : Sep 17, 2021, 9:51 AM IST

fraud

जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बनावट संगणकीकृत स्वाक्षरी वापरून बेरोजगार युवकांना दीड कोटींचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक बाब उजेडास आली आहे. 12 ते 15 युवकांची अशाप्रकारे फसवणूक करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी पसार झाला आहे.

चंद्रपूर : जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बनावट संगणकीकृत स्वाक्षरी वापरून बेरोजगार युवकांना दीड कोटींचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक बाब उजेडास आली आहे. 12 ते 15 युवकांची अशाप्रकारे फसवणूक करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी हा पसार झाला आहे.

शाम वाखर्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

नोकरीचे आमिष दाखवून गंडवले

आता शासनाची सर्व पदे ही परीक्षा घेऊनच भरली जातात. असे असतानाही अजूनही अनेक ठिकाणी बेरोजगार युवक नोकरीच्या आमिषाला बळी पडून आपली मिळकत गमावून बसतात. बल्लारपूर येथील ब्रिजेशकुमार झा याने अशाच पद्धतीने नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार युवकांना गंडवले आहे.

कोट्यवधींना गंडा

जिल्हा परिषदेतील विविध विभागात वर्ग-3 च्या जागा आहेत. त्यात माझ्या ओळखीने मी तुम्हाला नोकरी लावून देतो. असे म्हणत त्याने अनेक युवकाकडून दहा ते पंधरा लाखांची मागणी केली. त्यानंतर आपल्याला नियुक्तीपत्र मिळून जाईल, असे सांगितले. युवकांनीही ब्रिजेशकुमारला पैसे दिले. त्यानंतर आरोपी ब्रिजेशकुमार याने चक्क जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची डिजिटल स्वाक्षरी केली आणि बनावट नियुक्तीपत्र तयार करून या युवकांना पाठवले. यात जवळपास 1 कोटी 70 लाख रुपये त्याने जमवले. हे सर्व युवक आपले नियुक्तीपत्र घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्याकडे आले. त्यांना हे नियुक्तीपत्र बघून धक्काच बसला. कारण त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची डिजिटल स्वाक्षरी होती. ही घटना 9 सप्टेंबरला निदर्शनास आली.

गुन्हा दाखल, आरोपी फरार

मात्र, जिल्हा परिषदेकडून 15 सप्टेंबरला रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याच दरम्यान ह्या सर्व प्रकाराची कुणकुण लागलेला बल्लारपूर येथील आरोपी ब्रिजेशकुमार झा हा फरार झाला. बल्लारपूर येथील सरदार पटेल वॉर्डातील रहिवासी ब्रिजेशकुमार बैद्यनाथ झा याने काही युवकांना आपल्या जाळ्यात ओढून जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहाय्यक व परिचराच्या नोकरीचे बनावट आदेश माथी मारले. जिल्हा परिषदेत या प्रकारची कोणतीही भरती प्रक्रिया राबविली गेली नसताना 2019-20 या आर्थिक वर्षात तत्कालीन जिल्हाधिकारी आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची संगणकीकृत स्वाक्षरी चोरून हे आदेश तयार करण्यात आले. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी झा याच्याविरूद्ध भादंवी कलम 465, 468, 471, 420 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा -ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी : मोदींकडून दगडूशेठ ट्रस्टच्या व्हर्च्युअल माध्यम सुविधेचे कौतुक

ABOUT THE AUTHOR

...view details