महाराष्ट्र

maharashtra

Chandrapur Truck News : शेकडो ट्रक्सची भंगारात विल्हेवाट; गोलछा ग्रुपच्या कंपनी विरोधात कंत्राटी सेनेचे आरटीओ विभागाला निवेदन

By

Published : Apr 19, 2023, 3:32 PM IST

पैनगंगा कोळसा खाण क्षेत्रात गोलछा ग्रुपच्या एएसडीसी कंपनीत कार्यरत शेकडो ट्रकांना उपप्रादेशिक परिवहन विभागाची कुठलीही परवानगी न घेता त्यांना कापून भंगारात विकले जात आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांना दिले आहे.

Chandrapur News
कंत्राटी सेनेचे आरटीओ विभागाला निवेदन

कंत्राटी सेनेचे आरटीओ विभागाला निवेदन

चंद्रपूर : कोळसा खाणीतून कोळशाची उचल करण्याचे कंत्राट मिळालेल्या गोलछा ग्रुपच्या कंपनीने काम पूर्ण होताच, शेकडो ट्रक भंगारमध्ये काढले आहेत. दररोज एकामागून एक ट्रक भंगारात काढले जात आहेत. उपप्रादेशिक परिवहन विभागाची कुठलीही परवानगी न घेता हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. यातून शासनानाचा कोट्यावधीचा महसूल बुडत आहे. या कंपनीविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी कैलाश तेलतुंबडे यांनी केली आहे.



काय आहे प्रकरण:गोलछा ग्रुपची कंपनी एएसडीसी (असोसिएटेड सोपस्टोन डिस्ट्रिब्युटिंग कंपनी) कंपनीला कोळसा वाहून नेण्याचे कंत्राट मिळाले. तीन वर्षांसाठीचे हे कंत्राट होते. पैनगंगा कोळसा खाणीपासून घुगूस येथील नव्या रेल्वे सायडिंगपर्यंत हा कोळसा टिप्परच्या माध्यमातून पोचवायचा होता. दररोज 500 मेट्रिक टन इतका कोळसा पोचविण्याचे हे काम होते. शेकडो कोटींच्या घरात हे कंत्राट होते. यासाठी शेकडो ट्रक नाममात्र पैसे बगरून फायनान्सवर घेण्यात आले. वेकोलीने यासाठी कार्यालय तसेच वाहनांसाठी जागा उपलब्ध करून दिली. पुढे हे कंत्राट या कंपनी ऐवजी दुसऱ्या कंपनीला मिळाले, तर ही जागा आता एएसडीसी कंपनीला नव्या कंपनीसाठी रिकामी करून द्यायची आहे. फायनान्सवर उचललेल्या अनेक वाहनांचे कर्ज आद्यप फेडण्यात आलेले नाही. मात्र या वाहनांची आता परस्पर विल्हेवाट लावली जात आहे. या ट्रकना कापुन त्याचे भाग भंगारात अवैधरित्या विकल्या जात आहेत. नाममात्र दाखवण्यासाठी चार ते पाच ट्रकला भंगारात काढण्याची परवानगी घेण्यात आली, आता त्याच नावावर आता सर्व ट्रक कापले जात आहेत.



कंत्राटी कामगार सेनेने आणले धक्कादायक वास्तव:कंत्राटी सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष कैलाश तेलतुंबडे यांना गोलछा ग्रुपच्या कंपनीत बेकायदेशीररित्या ट्रक कापले जात असल्याची तक्रार मिळाली. त्यानुसार त्यांनी थेट त्या ठिकाणी जाऊन बघितले असता हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला. यावेळी कंपनीचा प्रकल्प अधिकारी करणसिंग गेहलोत याला विचारणी केली. त्याच्याकडून थातुरमातुर उत्तर देण्यात आले. अवघ्या चार ते पाच स्क्रॅप काढण्याचे परवाने त्याच्याकडे होते. मात्र ज्याचा परवाना नाही अशी वाहने देखील तिथे कापली जात असल्याचे लक्षात आले, त्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. अशी महिती तेलतुंबडे यांनी दिली आहे.



आरटीओ विभागाने दिले कारवाईचे आश्वासन: कैलाश तेलतुंबडे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांची भेट घेतली. हा सर्व प्रकार त्यांना निदर्शनास आणून दिला. कंपनीच्या परिसरात जाऊन या कंपनीचे आरटीओ विभागात नोंद असलेल्या सर्व वाहनांची पाहणी करण्यात यावी, यातील काही ट्रक गायब असल्यास कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. आरटीओ मोरे यांनी याची गंभीर दखल घेत कारवाईचे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात त्यांनी आरटीओ विभागाचे निरीक्षक कलसी यांच्याकडे तपास करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आरटीओ विभाग नेमका यावर कुठली कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.



फोन आऊट ऑफ सर्व्हिस:या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी असणारा प्रकल्प अधिकारी हे करणसिंग गेहलोत होते, मात्र कारवाईची चाहूल लागताच ते राजस्थान येथे पळून गेल्याची माहिती आहे. यासंदर्भात कंपनीची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता त्याचा नंबर हा 'आऊट ऑफ सर्व्हिस' असल्याचे येत आहे. या संपूर्ण प्रकरणात गेहलोत हाच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणात गंभीर घोटाळा झाल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यावर आता काय कायदेशीर कारवाई होते हे बघणे उत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा: Kharghar Heatstroke Deaths महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृतांचा आकडा १४ वर पोहोचला जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे नवा वाद

ABOUT THE AUTHOR

...view details