महाराष्ट्र

maharashtra

वाघाला पकडा अथवा ठार करा; चंद्रपुरात आजी-माजी आमदार एकवटले

By

Published : Oct 9, 2020, 7:46 PM IST

चंद्रपुरातील राजुरा तालुक्यात वाघाचा धुमाकुळ सुरुच आहे. येथील दहा लोकांचा बळी घेणाऱ्या या वाघाला जेरबंद करा अथवा ठार करा, अशी मागणी येथील आजी-माजी लोकप्रतिनिधींनी केली आहे.

chandrapur tiger (file photo)
चंद्रपूर वाघ (प्रतिकात्मक)

राजुरा (चंद्रपूर) -दहा लोकांचा बळी घेणाऱ्या त्यावाघाला पकडा, नाहीतर ठार करा, अशी मागणी येथील आजी-माजी आमदारांनी केली आहे. या मागणीसाठी आजी-माजी आमदार आणि शेतकरी एकत्र आले होते.

तालुक्यात वाघाचा धुमाकुळ सुरूच आहे. वाघाला जेरबंद करण्याचे वनविभागाचे प्रयत्न तोकडे पडू लागले आहेत. दुसरीकडे जनतेचा रोष वाढत आहे. शेतकरी बांधवानीही आंदोलनाचा इशारा दिल्याने वनविभागावर दवाब वाढला आहे. मध्य चांदा वन विभागांतर्गत राजुरा, विरुर वनपरिक्षेत्रात मागील 22 महिन्यांपासून वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. या वाघाने 10 शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे. मात्र, अद्यापही हा वाघ मोकाटच असल्याने जनतेत प्रचंड रोष वाढला आहे.

म्हणून या वाघाचा तत्काळ बंदोबस्त करा किंवा त्याला ठार मारा, यासाठी सर्वपक्षीय आजी- माजी आमदार आणि शेतकरी बांधव एकवटले. यात आमदार सुभाष धोटे, माजी आमदार अॕड. वामनराव चटप, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार अॕड. संजय धोटे यांनी एकसूरात नरभक्षी वाघाला ठार करण्याची मागणी केली आहे. वन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वाघ मोकाट असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

वनविभागाने नरभक्षक वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा. वाघापेक्षा नागरिकांच्या जीव महत्त्वाचा आहे. वाघाला ठार मारण्याचे आदेश शासनाने द्यावे. शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, अशी मागणी राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे. तसेय याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रधान वन सचिव यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वन विभागाची मोहीम दिशाभूल करणारी आहे. वनविभागाने केवळ कागदोपत्री अहवाल सादर करून शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये. शेतकऱ्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत आणि अधिकारी निश्चिंत आहेत. नरभक्षक वाघाला तत्काळ ठार मारावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी दिला आहे.

160 कॅमेरे, 200 कर्मचारी, 2 शार्प शूटर तरी वाघ हाती लागेना...

वनविभागाने वाघाला जेरबंद करण्यासाठी काही टीम तयार केल्या आहेत. जवळपास 160 कॅमेरे, 200 कर्मचारी आणि 2 शार्प शूटर वाघावर लक्ष ठेवून आहेत. मात्र, प्रत्येकवेळी वाघ हुलकावणी देत आहे. या वाघाला जेरबंद करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details