महाराष्ट्र

maharashtra

भंडारा जळीत प्रकरण : देशभरातील नेत्यांच्या प्रतिक्रिया

By

Published : Jan 9, 2021, 7:54 PM IST

Updated : Jan 9, 2021, 8:31 PM IST

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवजात केअर युनटमध्ये (एसएनसीयू) आग लागल्याने 10 बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबात देशभरातून शोक व्यक्त होत आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

भंडारा -जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवजात केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) आग लागल्यामुळे 10 बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. एसएनसीयूमध्ये एकूण 17 नवजात बालके होती. त्यापैकी 7 बालकांना वाचविण्यात यश आले आहे.

आढावा घेताना प्रतिनिधी

अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना धुरामुळे रुग्णालयात जाता येत नव्हते. दुसऱ्या दरवाज्याने ते आत गेले. अग्निशामक कर्मचाऱ्यांना आग लागलेल्या ठिकाणच्या लगतच्या वॉर्डात असलेल्या 7 बालकांना वाचवण्यात यश आले. घटनेत 10 बालकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 7 बालकांचा गुदमरून तर 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणाची निश्चित गंभीर दखल घेऊन, चौकशी करणार असून पुन्हा अशा घटना होणार नाहीत याची काळजी घेऊ, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर सांगितले.

5 लाखांची मदत जाहीर

भंडाऱ्यातील नवजात बालकांच्या मृत्यूची घडलेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नवजात बालक ठेवण्यात आली आहेत, अशा सर्व एनआयसीयूचे ऑडीट करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच मृतांच्या पालकांना पाच लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. याच मदतीचा पुनरुच्चार आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी केला.

भंडारा शासकीय रुग्णालयास पोलीस छावणीचे रूप

भंडारा शासकीय रुग्णालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. भंडारा रुग्णालय आगीच्या घटनेनंतर या ठिकाणी नातेवाईक आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लोकप्रतिनिधींही भेट दिली. त्या पार्श्वभूमीवर रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एकंदरीत रुग्णालयाला छावणीचे रूप आले होते.

सत्ताधारी अन् विरोधी नेत्यांनी दिली रुग्णालयास भेट

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विरोधीपक्ष नते देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री राजेश टोपे, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम यांनी घटनास्थळाला भेट दिली. या सर्वांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी मृत बालकांच्या पालकांचे सांत्वन केले.

राज्यासह देशभरातील नेत्यांच्या प्रतिक्रिया

या घटनाबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ही घटना मन सुन्न करणारी असल्याचे म्हटले आहे. प्रगतीशील महाराष्ट्रासाठी ही बाब लाजिरवाणी असल्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तर राज्याचे आरोग्य मंत्री टोपे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. तर या मुलांचा मृत्यू नसून त्यांची हत्या आहे, त्याला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे, असा आरोप भाजप प्रवक्ते राम कदम यांनी केला. भंडाऱ्याच्या घटनेने ग्रामीण रुग्णालयाच्या व्यवस्थेतील दोष पुढे आले आहेत, असे विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले. त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी दरेकर यांनी केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू केअर यूनिटला आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तर दोषी जिल्हा शल्य चिकित्सक व डॉक्टरवर कारवाई करा, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली. भंडारा येथील घटना हृदय पिळवटून टाकणारी असल्याचे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पालकांना आश्वासन दिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यानीही याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील भंडारामध्ये आगीच्या घटनेमुळे नवजात बालकांचा मृत्यू हे खूप दु:खद आहे. या ह्रदयविदारक घटनेत आपले अपत्य गमावणाऱ्या कुटुंबीयांच्या दुःखाप्रती मी संवेदना व्यक्त करत असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. भंडारामध्ये घडलेली घटना हृदय पिळवटून टाकणारी आणि त्रासदायक आहे. आपण अनमोल लहान जीव गमावले असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. भंडाऱ्याची घटना अत्यंत्य दुर्दैवी; सरकारने पीडित कुटुंबीयांना सर्वोतपरी मदत करावी, असे राहुल गांधी म्हणले. गृहमंत्री अमित शाह यांनीही भंडारा घटनेबद्दल व्यक्त दु:ख केले.

हेही वाचा -'माझे बाळ मला परत पाहिजे'; बाळासाठी मातांचा टाहो

हेही वाचा -भंडारा : दोन महिन्यांपासून जपलेल्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू

Last Updated :Jan 9, 2021, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details