महाराष्ट्र

maharashtra

भंडारा : चारित्र्याच्या संशयावरून पतीने गळा आवळून केली पत्नीची हत्या

By

Published : Jul 19, 2021, 9:10 PM IST

Updated : Jul 19, 2021, 9:32 PM IST

f

जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीतील राजेदहे गावात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मध्यरात्रीच्या सुमारास ओढणीने गळा आवळून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे.

भंडारा - जिल्ह्याच्या जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीतील राजेदहे गावात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मध्यरात्रीच्या सुमारास ओढणीने गळा आवळून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. हत्येनंतर सकाळीच पती स्वतः जवाहरनगर पोलिसांसमोर हजर झाला. त्यामुळे संबंधित घटना उघड़ झाली आहे. स्नेहलता लंकेश्वर खांडेकर (वय 24) असे मृतकाचे नाव असून, लंकेश्वर खेमराज खांडेकर (वय 34) असे आरोपी पतीचे नाव आहे. तो जवाहरनगर येथील एका कँटीनमध्ये कूक पदावर कार्यरत आहे. या दोघांना 5 वर्षाची मुलगी होती.

माहिती देताना पोलीस निरीक्षक

2015 मध्ये झाले होते लग्न-

गोंदिया जिल्ह्यातील स्नेहलताचे भंडारा जिल्ह्याच्या नेहरवानी येथील लंकेश्वर याच्याशी 2015 मध्ये शुभमंगल होऊन संसार सुरू झाला होता. सुरुवातीच्या काळात मोठ्या गुणागोविंदाने संसार सुरू होता. त्यांना एक चिमुकलीही होती. मात्र, कालांतराने लंकेश्वर याच्या स्वभावात बदल होऊ लागला व तो स्नेहलताच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यानंतर या दोघांमध्ये भांडण होऊ लागले.

काय झाले त्या मध्यरात्री-

नेहमीप्रमाणे लंकेश्वर हा कामावरून रात्री घरी परतला. घरी आल्यावर स्नेहलता यांनी माझा फोन रिचार्ज का करून दिला नाही म्हणून भांडण सुरू केले. भांडण वाढतच गेले. या भांडणात रागात आलेल्या स्नेहलता हिने मुलीचा गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला. लंकेश्वर याने स्नेहलतापासून मुलीला वाचवले आणि नंतर स्नेहलताच्या ओढणीने तिचा गळा आवळून तिची हत्या केली, असे लंकेश्वर याने पोलिसांना सांगितले आहे.

सासूने दिली लंकेश्वर विरुद्ध तक्रार -

मध्यरात्री 1 च्या सुमारास ही घटना घडली. रात्रभर मुलीला घेऊन लंकेश्वर घरीच बसला होता. सकाळी लंकेश्वर यास आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला व सरळ जवाहरनगर पोलीस स्टेशन गाठले. दरम्यान, लंकेश्वर याच्या सासूने जवाहर नगर पोलीस ठाण्यात लंकेश्वरच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. माझ्या मुलीच्या चारित्र्यावर संशय करून तिची हत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण तपासणी केली असून, आरोपी लंकेश्वर याला अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Last Updated :Jul 19, 2021, 9:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details