महाराष्ट्र

maharashtra

Child Marriage In Beed: बालविवाहाला बीड जिल्हा प्रशासनाचं पाठबळ आहे का? तक्रार देण्यास ग्रामसेवकाची टाळाटाळ

By

Published : May 5, 2023, 10:15 PM IST

सध्या लग्न सराई चालू आहे. त्यामुळे अनेक बालविवाह होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातच प्रशासकीय अधिकाऱ्यांना अनेक वेळा माहिती देऊन देखील अधिकारी वरिष्ठांना माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.

Child Marriage In Beed
बालविवाह

बालविवाह प्रकरणी तत्त्वशील कांबळे यांची प्रतिक्रिया

बीड: राज्यात बालविवाहाचा प्रश्न गंभीर बनला असताना आणि सर्वाधिक बालविवाह बीड जिल्ह्यात होत आहेत. बीडच्या आष्टी तालुक्यातील तहसीलदार, बीडीओ, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांना याचे कोणतच सोयर सुतक नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.


प्रशासनाचा कारवाईस नकार? बीडच्या आष्टी तालुक्यात काल दोन बालविवाह रोखण्यात आले होते; मात्र दुपारी रोखलेला एक बालविवाह सायंकाळी मोठ्या थाटामाटात मंगल कार्यालयात झाल्याचे चाईल्ड लाईन सदस्य तत्त्वशील कांबळे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, याचे फोटो तत्त्वशील कांबळे यांनी संबंधित धामणगावचे सायंबर नामक ग्रामसेवक, त्याचबरोबर संबंधित अंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना पाठवले; परंतु पोलीस प्रशासनाने ग्रामसेवकांना तक्रार द्यायला पाठवा, आम्ही गुन्हा दाखल करून घेतो म्हणाले. तर ग्रामसेवक या प्रकरणात आम्ही दुपारी बालविवाह रोखले आहेत, नोटीस दिली आहे; मात्र नंतर काय झालं हे माहीत नाही, असे म्हणत तक्रार देण्यास टाळाटाळ करत आहे.

तहसीलदार, बीडीओचा नो रिस्पॉन्स:विशेष म्हणजे, गेल्या आठवड्याभरापासून आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बालविवाह होत असल्याची माहिती चाईल्ड लाईनकडे होती. यामुळे गेल्या चार दिवसांपासून चाईल्ड लाईन सदस्य तत्त्वशील कांबळे यांनी आष्टीचे तहसीलदार विनोद गुंडमवार, यांना जवळपास 40 फोन केले; मात्र एकाही फोनचे उत्तर गुंडमवार यांनी दिले नाही. तर बीडीओ सुधाकर मुंडे यांना अनेक वेळा कॉल केला; परंतु त्यांनी देखील काहीच सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्याचबरोबर विस्तार अधिकारी, आणि ग्रामसेवकही कारवाई करायला टाळाटाळ करत आहेत, असे म्हणत चाइल्डलाईन सदस्य तत्त्वशील कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना तक्रारीचा पाढाचं वाचला.



बालविवाहांना प्रशासनाचे पाठबळ: राज्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक बालविवाह होत आहेत. एकीकडे होणारे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या मोहीम हाती घेत आहे; मात्र तालुका पातळीवर असणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचेच या होणाऱ्या बालविवाहांना पाठबळ आहे, असे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली, तरच ही बालविवाहाची समस्या कमी होऊ शकेल. अन्यथा बालविवाहाची संख्या आणखी वाढू शकते, असे मत तत्त्वशील कांबळे यांनी मांडले.

हेही वाचा:Sharad Pawar On Ajit Pawar : 'राजीनाम्याबाबत अजित पवारांना आधीच माहित होते', शरद पवारांचा खुलासा

ABOUT THE AUTHOR

...view details