महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra Weather : मराठवाड्यात पावसाची दडी; शेतकरी अडचणीत, 'या' तालुक्यात भीषण पाणीटंचाई

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 1:33 PM IST

Maharashtra Weather : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या दीड महिन्याभरापासून पावसाने हजेरी लावलेली नाही. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. तर नाशिक जिल्ह्यात 41 गावांवर पावसाने अवकृपा दाखवली आहे. तसेच अनेक तालुक्यांमध्येही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

Maharashtra Weather Update
शेतकरी चिंतेत

माहिती देताना शेतकरी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :Maharashtra Weather : सप्टेंबर महिना सुरू झाला तरी ऐन पावसाळ्यात शेतकरी हवालदिल झाला आहे. कारण जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी गेला दीड महिना पाऊस पडलाच नाही. त्यामुळे लावलेली पिके पूर्णतः उध्वस्त झाली आहेत. लावलेली मका आता चारा म्हणून देखील वापरता येईल का नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सोयाबीन मकासारखी हक्काचे पीक हातची गेल्याने, केलेला खर्च देखील निघणार नाही. त्यात सरकारी घोषणा कागदावरच आहेत. बांधावर जाऊन पाहणी होईल अशी घोषणा कृषिमंत्र्यांनी केली. मात्र, अद्याप त्याची पूर्तता नसल्याने मायबाप सरकार साथ देणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थितीत केला आहे.

पावसाने मारली दडी : मराठवाडा दुष्काळाच्या सावटाखाली आला आहे. (Marathwada Drought ) ऑगस्ट महिना अखेर 234 मंडळात 2.05 पेक्षा कमी पावसाची नोंद झाली (Monsoon 2023) आहे. झालेला पाऊस म्हणजे सरासरीच्या फक्त 48 मिमी इतका आहे. त्यामुळे अनेक भागात दुष्काळ पडणार असून, पिण्याच्या पाण्याची देखील अडचण निर्माण होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कृषीमंत्र्यांच्या आदेशाचे काय झाले? : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यांपासून पाऊस पडलेला नाही. त्यामुळे जून, जुलै दरम्यान केलेली पेरणी आता वाया जाईल, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. विभागात 234 मंडळात पावसाने 21 दिवसांपेक्षा जास्तीचा खंड झाल्याचा अहवाल नुकताच समोर आला आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन बांधावर जाऊन सात दिवसाच्या आत पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मात्र, अद्याप त्यात कुठलीही हालचाल सुरू न झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कृषीमंत्र्यांचे आदेश फक्त मनाला दिलासा देणारे होते का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅंकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा

अनेक मंडळात नाही पाऊस : मराठवाड्यातील अनेक मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे. ज्यात संभाजीनगर - 33, जालना- २२, बीड- 25, लातूर- 48, धाराशिव(उस्मानाबाद) - 46, नांदेड- 41, परभणी- 14 तर हिंगोलीत 5 मंडळात कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीच्या 48.43 मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मागील तीन महिन्यात फक्त 33 दिवस पाऊस पडला आहे. उर्वरित दिवस कोरडे गेल्याने मराठवाड्यासमोर पाण्याचा भीषण प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पेरणी उशिरा तरीही नुकसान : यंदा पाऊस उशिरा पडेल अशी शक्यता आधीपासून वर्तवली गेली. त्यामुळेच विभागातील 48.57 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 48.23 लाख हेक्टरवर यावेळेस उशिरा पेरणी झाली. एकूण लागवड क्षेत्रापैकी सोयाबीन- 53.244, कापूस- 28.750, तूर- 7.434, मका- 4.8, उडीद- 2, मूग- 1.4, बाजरी- 1.3, त्याचबरोबर मका आणि सोयाबीन देखील लावण्यात आले आहे. या पिकांचे पाऊस नसल्याने नुकसान होत आहे. मका आणि सोयाबीन मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याची माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिली आहे. आता पाऊस आला तर किमान लावलेल्या मक्याचा चारा तरी होऊ शकतो, मात्र इतर पिकांची शाश्वती आता राहिली नाही, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

तालुका निहाय आतापर्यंत झालेला पाऊस

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस नाही : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या तीन-चार वर्षात पावसाचे चांगले प्रमाण होते. यावर्षी पावसाने या तालुक्यावर पुन्हा वक्रदृष्टी केली. आतापर्यंत केवळ 165 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तालुक्यातील 128 गावांपैकी 41 गावांवर पावसाने अवकृपा केल्याने, या गावातील शेतातील ढेकूळही फुटला नसल्याचे चित्र आहे. ही सर्व गावे तालुक्याच्या पूर्व भागात आहेत. ज्या गावांमध्ये शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत त्या आता वाया गेल्यात जमा आहेत. अशात पशुधनाचा चारा प्रश्न दिवसेंदिवस बिकट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे.

पशुधन तालुका : सिन्नर तालुक्यातील गावांमध्ये पशुधन अर्थात दुभत्या गायींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दुग्ध व्यवसाय व कुक्कुटपालनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला होता. मात्र यावर्षी पावसाने दगा दिला आणि शेतकरी संकटात सापडला आहे. महागड्या दुभत्या गाईचा चाऱ्याचा मोठा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास तीन महिने उलटे मात्र सिन्नर तालुक्यात आतापर्यंत केवळ 165 मीटर पावसाची झाला आहे. दरवर्षी सिन्नर तालुक्यात ऑगस्टपर्यंत 365 मिलिमीटर पाऊस होत असतो. अद्याप सरासरीच्या केवळ 45 टक्के पाऊस झाला असून, सिन्नर तालुक्याची पावसाची सरासरी नोंद 522 मिलिमीटर झाली असून केवळ 31.6 टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे.


हेही वाचा -

  1. कोल्हापुरात पावसाने मारली दडी; दुबार पेरणीच्या संकटाने धास्तावला शेतकरी
  2. परभणीत पावसाने पुन्हा दडी मारली; शेतकरी हवालदिल
  3. धुळ्यात महिन्याभरापासून पावसाने मारली दडी; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

ABOUT THE AUTHOR

...view details