महाराष्ट्र

maharashtra

अमरावतीत मालटेकडीवर साकारणार शिवसृष्टी; चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार भूमिपूजन

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 9:43 PM IST

Shivsrushti In Amravati : अमरावती शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव अश्वारूढ पुतळा असणाऱ्या शहराच्या मध्यभागातील मालटेकडी अर्थात शिवटेकडीवर शिवसृष्टी साकारली जाणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गुरुवारी या शिवसृष्टीचे (Shivsrushti Amravati) भूमिपूजन केलं जाणार आहे.

Amravati News
मालटेकडीवर साकारणार शिवसृष्टी

मालटेकडीवर साकारणार शिवसृष्टी

अमरावतीShivsrushti In Amravati : शहरातील अतिशय महत्त्वाचं ठिकाण असणाऱ्या मालटेकडीवर शिवसृष्टी साकारावी यासाठी गत अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. ज्यावेळी मदन येरावार हे पर्यटन राज्यमंत्री होते, त्यावेळी अमरावतीत 'शिवसृष्टी' साकारण्यासाठी (Shivsrushti Amravati) पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला होता. त्यापैकी तीन कोटी रुपये या शिवसृष्टीसाठी मंजूर झाले असल्याची माहिती, भाजपाचे माजी शहर अध्यक्ष तुषार भारतीय यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिलीय.

लेझर शोची केली व्यवस्था : मालटेकडीवर लवकरच छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांचा इतिहास उलगडणारे भित्तीचित्र साकारले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या निधी मधून मालटेकडीवर छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण माहिती नव्या पिढीला सांगणाऱ्या लेझर शोची व्यवस्था देखील केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भित्ती चित्रकारसह ज्या प्रसंगाची ती चित्रं आहेत त्याबाबतची संपूर्ण माहिती देखील लेखी स्वरूपात वाचायला मिळणार आहे. अमरावती शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण आयुष्य या शिवसृष्टीत कळणार आहे. याद्वारे पर्यटनाला देखील चालना मिळेल. अमरावतीकरांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना काहीतरी नवीन पाहायची, समजून घ्यायची संधी मिळेल असं देखील तुषार भारतीय म्हणाले.



दहा वर्षांपासून पालटायला लागले मालटेकडीचे स्वरूप: मालटेकडी परिसरात दहा वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व्हायला लागलं होतं. मालटेकडीच्या पायथ्याशी लगतच्या परिसरातील नागरिकांनी चक्क हगणदारी करून ठेवली होती. मालटेकडी प्रभागाचे नगरसेवक आणि शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश बुब यांनी दहा वर्षांपूर्वी शिवटेकडीचे रूप पालटण्याचा संकल्प हाती घेतला. मालटेकडी परिसरात पहाटे फिरायला येणाऱ्या मंडळींसह मालटेकडी परिसराची साफसफाई मोहीम सुमारे सहा महिने राबवली. महापालिका प्रशासनाने देखील नागरिकांच्या मालटेकडी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन मालटेकडीचा परिसर स्वच्छ सुंदर करण्यात आला.

मालटेकडीचा परिसर हिरव्यागार झाडाझुडपांनी वेढला :मालटेकडी ठिकाणी तीन प्रकारचे ट्रॅक तयार करण्यात आले. टेकडीवर सकाळी फिरायला येणाऱ्या वृद्ध युवक आणि चिमुकल्यांना आपापल्या सोयीने मालटेकडीच्या प्रदक्षिणा मारता याव्यात अशी व्यवस्था करण्यात आली. लहान मुलांसाठी या ठिकाणी खेळणी तयार करण्यात आली. यासह विविध फुलांचे वृक्ष लावून मालटेकडी परिसरात उद्यान देखील साकारण्यात आले. पूर्वी ओसाड असणाऱ्या मालटेकडीवरून संपूर्ण अमरावती शहर दिसायचे. आज मालटेकडीवर लावण्यात आलेल्या हजारो झाडांमुळे मालटेकडीचा संपूर्ण परिसर हिरव्यागार झाडाझुडपांनी वेढला आहे.



मालटेकडीवर उभारला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा: शहराच्या मध्यभागात असणाऱ्या मालटेकडीवर 1976 -77 मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष हरिभाऊ कलोती यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापित करण्यात आला होता. या टेकडीवर गत दीड दोनशे वर्षांपासून दर्गा देखील आहे. गत अनेक वर्षांपासून हिंदू मुस्लिम असे सारेच छत्रपती शिवाजी महाराज आणि दर्ग्याप्रती आदर सन्मान राखून आहेत. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडणारी शिवसृष्टी या ठिकाणी साकारली जाणार आहे. अमरावती शहरात पर्यटनाचं नवं दालन खुलं होणार आहे.

हेही वाचा -

  1. 'काकू'ला पकडण्यासाठी नदीत दगड मातीचं छोटं धरण, मेळघाटात आदिवासी महिलांची मासेमारीची अनोखी पद्धत
  2. उघड्या अंगावर मोडतात बाभळीचे काटे, काट्यांच्या गंजीवर मारतात उड्या; मानकर जमातीत आगळीवेगळी प्रथा
  3. मेळघाटात 'सिपना पटेल'चा आहे अनोखा थाट, जाणून घ्या आदिवासी बांधव का करतात 'सिपना पटेल' वृक्षाची पूजा

ABOUT THE AUTHOR

...view details