महाराष्ट्र

maharashtra

Amravati News: कुपोणषग्रस्त मेळघाटात आहे एक पौष्टीक खव्याचे गाव; मध्य प्रदेशात मिळतो 'या' खव्याला मोठा भाव

By

Published : Jun 7, 2023, 8:01 PM IST

Updated : Jun 7, 2023, 10:18 PM IST

सातपुडा पर्वत रांगेत मेळघाटात गवळी समाज बांधवांकडून तयार केला जाणाऱ्या खव्याला महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात मोठी बाजारपेठ आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर डोंगराच्या उंच टोकावर वसलेल्या कोकरू या गावातील खवा संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. कोकरू हे गाव खव्याचे गाव म्हणून ओळखले जाते. कोकरूप्रमाणेच मेळघाटात अनेक गावे ही खव्यासाठीच प्रसिद्ध आहेत.

khoa  famous in  melghat
कोकरुतला खवा

खव्यासाठी प्रसिद्ध असलेले गाव

अमरावती: कोकरू हे अवघ्या दोन अडीचशे लोकसंख्येचे गाव आहे. 40 ते 50 घरे असणाऱ्या ह्या गावात अनेकांचा व्यवसाय हा गाई आणि म्हशी राखणे व दुधाचे उत्पादन घेणे हाच आहे. यापैकी गावातील पाच ते सहा घरांमध्ये दूध घोटून खवा तयार केला जातो. चार लिटर दूध घोटल्यावर एक किलो खवा तयार होतो. हा खवा गावात अडीचशे रुपये किलोने विकला जातो. उन्हाळ्याच्या दिवसात दूध कमी असल्यामुळे मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यात खव्याचे प्रमाण कमी असते. मात्र पाऊस पडल्यावर पुढचे सात-आठ महिने गावात शंभर किलो खावा तयार होतो. अशी माहिती कोकरू येथील रहिवासी नामदेव गायन यांनी दिली.

पूर्वी होती लोण्याला मागणी :नामदेव गायन यांनी सांगितले की, त्यांच्या घरी 25 म्हशी आणि तितक्याच गाई आहेत. घरातील दुधासह आमच्या गावासह लगतच्या काही गावातील दूध उत्पादकांकडून आम्ही दूध खरेदी करून खवा बनवतो. पूर्वी आमच्याकडे लोण्याला प्रचंड मागणी होती. मात्र पाच वर्षांपासून खव्याची मागणी वाढली असल्याने, आम्ही लोणी काढणे बंद करून खवा तयार करण्यावर भर देत आहोत. गावातील खवा मोठ्या प्रमाणात परतवाडा येथे विकला जातो. काही व्यापारी थेट आमच्या गावात येऊन खवा खरेदी करतात.



मेळघाटात ही आहेत दुधाची गावे : मेळघाटात कोकरूसह चुरणी, आलडोह, वैराट, मोथा, लवादा, वस्तापूर, कुलंगणा, सेमाडोह, हरीसाल रोहा मालूर, वडगाव फत्तेपूर, उपात, खेडा, मडकी, कोठा, जांबु , तेलखार इत्यादी गावांमध्ये गवळी समाज मोठ्या संख्येने वसला आहे. या सर्व गावांमध्ये दुधाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. गवळी समाजासोबतच आता मेळघाटातील अनेक गावांमध्ये आदिवासी बांधव देखील शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचे उत्पादन घ्यायला लागले आहेत.



या कारणामुळे आले खव्याला महत्त्व : मेळघाटात 1980 पर्यंत रोज 50 हजार लीटरपेक्षा अधिक दुधाचे उत्पादन व्हायचे. मेळघाटातील दूध विदर्भातील परतवाडा, अमरावती, अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदपर्यंत जायचे. तसेच मेळघाटातून जाणाऱ्या अकोला ते खंडवा या रेल्वेगाडीद्वारे खंडव्यापर्यंत देखील दूध जायचे. मध्यप्रदेशातील बैतूल, भैसदेही या भागातही दूध आणि लोण्याला मोठी मागणी होती. मात्र गत पंधरा-वीस वर्षात मेळघाटातील दूध मेळघाट बाहेर जाणे कमी झाले. शासनाच्या वतीने देखील मेळघाटातील दूध संकलनाची कुठलीही व्यवस्था करण्यात आली नाही. अशा परिस्थितीत दूध हे दूध उत्पादकांच्या घरातच राहायला लागल्याने ते खराब व्हायला लागले. यावर पर्याय म्हणून दूध उत्पादकांनी हे दूध आपल्या घरीच आटवणे सुरू केले. दूध आटवून खवा तयार व्हायला लागला. चार लिटर दूध आटवले की एक किलो खवा तयार होतो. पुढे दुधाऐवजी मेळघाटातील खवा दूरवर जायला लागला.



रेल्वेगाडी बंद झाल्याने खवा घटला : धारणी तालुक्यात येणाऱ्या गोलाई ह्या गावात पाच वर्षांपूर्वी दिवसाला चार क्विंटल खावा तयार व्हायचा. मेळघाटातून जाणारी रेल्वे गाडी बंद झाल्यामुळे गोलाई येथील खाव्याच्या व्यवसायाला प्रचंड फटका बसल्यामुळे, आता या भागात खव्याचे उत्पादन देखील कमी झाले आहे.



खव्यावरच उदरनिर्वाह :कोकरू या डोंगरावर अतिउंच भागात वसलेल्या गावात शेती उत्पन्न होत नाही. यामुळे दूध उत्पादन हाच या भागातील गवळी समाज बांधवांचा मुख्य व्यवसाय आहे. 40 ते 50 रुपये लिटर असे या गावात दुधाचे भाव आहेत. दिवसभर 30 ते 40 लिटर दूध घोटणे हा नित्याचा उपक्रम आमचा आहे. खवा हेच आमचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असल्याचे कोकरू येथील रहिवासी हमी गायन यांनी सांगितले.



कोकरूवासियांनी सांभाळून ठेवली चव: हा संपूर्ण परिसर जो आहे तो अवर्षणग्रस्त आहे. पाऊस जरी भरपूर होत असला तरी, अन्नधान्य इथे मात्र पिकत नाही. सोयाबीन लावले जाते परंतु ते येत नाही. ब्राऊन राईस पूर्वी खूप व्हायचे. परंतु ब्राऊन राईस देखील आता फार पेरला जात नाही. परंतु कोदू, कुटकी सारखी पिके इथे भरपूर प्रमाणात यायची. परंतु आता त्याच्या देखील पेरण्या घटलेला आहे. यामुळे पशुपालन हाच एक प्रमुख व्यवसाय या भागात राहिलेला आहे. कोकरू या गावाची संपूर्ण विदर्भात ओळख याच्यासाठी आहे की, हे सर्वात महत्त्वाचे खवा उत्पादक गाव आहे.

दुधाला विशिष्ट अशी चव: अगदी वऱ्हाडात सर्व दूर या गावातला खवा पोहोचवला जातो. हॉटेलमधून किंवा इतर सगळ्या कौटुंबिक कार्यासाठी देखील इथला खवा वापरला जातो. याचे कारण असे आहे की, इथले जे पशु आहेत मग गाई असतील किंवा म्हशी त्यांचे खाद्य जे आहे ते नुसते गवत आहे. तसेच ज्या प्रजाती या भागात सापडतात गवताच्या रान गवताच्या विशेषता गोंधळ, सुकई, बोचाटी हे गवत अतिशय रुचकर आणि न्यूट्रिशियस आहे. त्यामुळे इथल्या दुधाला विशिष्ट अशी चव आहे. ही चव कोकरू या गावाने सांभाळली आहे. सगळे सेंद्रिय आपल्याला हवे असते या काळात या गावांनी ती जपणूक केली आहे. पशूचे सर्व खाद्य जे आहे ते पूर्णपणे सेंद्रिय आहे. त्यामुळे येथील दुधापासून बनवलेल्या खव्याला एक उत्तम अशी चव आहे.

हेही वाचा-

  1. Journey For Bull Sell बैल विक्रीसाठी मध्य प्रदेश ते अचलपूर असा त्यांचा तीनशे किलोमीटरचा प्रवास
  2. 2. Mahimapur Well विदर्भात प्रसिद्ध असलेल्या सातमजली पायविहीरीचा थाटच अनोखा वाचा विहिरीचे ऐतिहासिक महत्त्व
  3. Pandharpur Vari पंढरपूर वारीची शंभर वर्षांपासून परंपरा अमरावतीच्या नारायण गुरु मठातून 1924 पासून निघते पालखी
Last Updated : Jun 7, 2023, 10:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details