महाराष्ट्र

maharashtra

Upper Wardha Dam : अमरावती जिल्ह्यात मुसळधार; अप्पर वर्धा धरणाचे सात दरवाजे उघडले

By

Published : Jul 21, 2023, 10:27 PM IST

Updated : Jul 21, 2023, 10:54 PM IST

अमरावती जिल्ह्यात सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सततच्या पावसामुळे अप्पर वर्धा धरणामध्ये पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे धरणाचे 13 पैकी सात दरवाजे उघडले आहेत. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Etv Bharat
Etv Bharat

अप्पर वर्धा धरणाचे सात दरवाजे उघडले

अमरावती - जिल्ह्यात मोर्शी तालुक्यात सिंभोरा येथे असणारे पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाचे एकूण 13 पैकी सात दरवाजे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता उघडण्यात आले. हे सातही दरवाजे 50 सेंटिमीटरने उघडण्यात आले आहे. यामधून धरणातील 529 घनमीटर पाण्याचा विसर्ग होत आहे.

66 टक्के भरले धरण - अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारे अप्पर वर्धा जलाशय पाणलोट क्षेत्रात गत दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. जलाशयात येणाऱ्या माळू, दमयंती, वर्धा, जाम आणि चुडामण नदी दुधडी भरून वाहत असल्याने जलाशयाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे धरण 66 टक्के भरले आहे. शुक्रवारी सायंकाळी अप्पर वर्धा जलाशयाचे सात दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा नदी पात्रात या पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वर्धा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

अमरावती जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस - यावर्षी पावसाळ्यात पहिल्यांदाच अमरावती जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. मध्यंतरी चांदुर बाजार , चिखलदरा तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला होता. आज शुक्रवारी मात्र संपूर्ण जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे. येत्या काळात हा पाऊस असाच राहिला तर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

अनेक गावांना सतर्कतेचा इशारा - अप्पर वर्धा धरणातील पाणी सोडण्यात आल्याने धरणालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अप्पर वर्धा धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आल्यामुळे वर्धा नदी ओसांडून वाहत असून तिवसा तालुक्यातील अनेक गावातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे. पुढील चार दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून अप्पर वर्धा धरणाचे इतर सहा दार सुद्धा उघडल्या जाण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा प्रशासन देखील सतर्क झाले आहे.

महाराष्ट्रात मुसळधार - 22 जुलैपर्यंत महाराष्ट्रातील विविध भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाच हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच मुंबई आणि कोकणासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे.

हेही वाचा -Nanded Rain: पुरात अडकलेल्या शाळकरी मुलांची जेसीबीच्या साहाय्याने सुटका, पाहा व्हिडिओ

Last Updated :Jul 21, 2023, 10:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details