महाराष्ट्र

maharashtra

Agricultural Exhibition In Amravati: डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंती प्रित्यर्थ अमरावतीत कृषी प्रदर्शन

By

Published : Jul 11, 2023, 7:29 PM IST

भारताचे पहिले कृषिमंत्री आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त अमरावती शहरात कृषी प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. 64 वर्षांपूर्वी पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वात जगातील सर्वांत मोठ्या कृषी प्रदर्शनाचे दिल्लीतील मथुरा रोडवर 100 एकर जागेत आयोजन करण्यात आले होते. त्याच कृषी प्रदर्शनाच्या स्मृती अमरावतीत देखील शंभर एकर जागेवर आयोजित कृषी प्रदर्शनाद्वारे जागृत करण्याचा प्रयत्न श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या वतीने केला जातो आहे.

Agricultural Exhibition In Amravati
कृषी प्रदर्शन अमरावती

कृषी प्रदर्शनी निमित्त मान्यवरांची प्रतिक्रिया

अमरावती :11 डिसेंबर 1959 रोजी सायंकाळी साडेचार वाजता देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते या कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन झाले होते. या सोहळ्याला अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष आयसेन हॉवर हे प्रामुख्याने उपस्थित होते. 11 डिसेंबर 1959 ते 27 फेब्रुवारी 1960 अशा 82 दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला रशियाचे त्यावेळी असणारे राष्ट्र प्रमुख निकिता ख्रुश्चेव यांच्यासह चीन, पोलंड, इराक, नेपाळ, जपान, जर्मनी अशा विविध राष्ट्रातील एकूण 28 हजार जणांनी भेट दिली होती.


कृषी प्रदर्शनीला होते 25 पैसे तिकीट :शेती आणि शेतकऱ्यांच्या संपूर्ण विश्वाचा विचार या कृषी मेळाव्यात करण्यात आला होता. शेतकरी व शेतकऱ्यांच्या एकूणच जीवनाशी संबंधित सर्वच विषयांना या कृषी प्रदर्शनामध्ये महत्त्व देण्यात आले होते. देशातच नव्हे तर संपूर्ण जगात अशा स्वरूपाचे भव्य कृषी प्रदर्शन पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले होते. प्रदेशातील प्रतिनिधींसह देशाच्या सर्वच भागातील शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली होती. त्यावेळी या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी 25 पैसे इतके तिकीट आकारण्यात आले होते.


'त्या' स्मृती अमरावतीत होणार जागृत :देशातच नव्हे तर संपूर्ण जगात पहिल्यांदाच दिल्लीत 1959 मध्ये आयोजित कृषी प्रदर्शनाच्या स्मृती जागृत करण्याचा प्रयत्न अमरावती शहरात केला जातो आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या पुढाकाराने आणि श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकिशोर चिखले यांच्या मार्गदर्शनात प्राध्यापक राजेंद्र पाटील आणि त्यांचे सहकारी गत सहा महिन्यांपासून या भव्य कृषी प्रदर्शनाची तयारी करीत आहेत. हे प्रदर्शन देखील पहिल्या कृषी प्रदर्शना प्रमाणेच 100 एकर जागेवर आयोजित केले जाणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. नंदकिशोर चिखले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.


असे असणार कृषी प्रदर्शन :या कृषी प्रदर्शनामध्ये एकूण शंभर एकर जागेत विविध पीक सध्या घेतली जात आहेत. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या मान्यवर कृषी तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांना उभी पिके शेतात कशी वाढवली जातात हे सगळे दाखवण्याचा, समजून सांगण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या विविध कंपन्यांचा सहभाग या कृषी प्रदर्शनात राहणार आहे. त्यांच्यासाठी खास जागा देखील राखीव ठेवण्यात आल्या आहेत, असे देखील ते म्हणाले.


अशी मिळणार माहिती :हे कृषी प्रदर्शन महाराष्ट्रासह देशभरातील सर्वच शेतकऱ्यांसाठी खास पर्वणी ठरणार आहे. शेती या उद्योगाला समृद्ध करण्यासाठी शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त माहिती या कृषी प्रदर्शनातून मिळणार आहे. शेतीसह पशुपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यशेती अशा कृषीवर आधारित विविध व्यवसायासंदर्भात देखील महत्त्वपूर्ण माहिती या कृषी प्रदर्शनात उपलब्ध होईल. कृषी क्षेत्रातील जवळपास सर्वच नामांकित कंपन्या या कृषी प्रदर्शनात सहभागी होणार असून शेतकऱ्यांच्या हिताचे प्रयोग दाखविले जाईल. शेतकऱ्यांनी लाखोच्या संख्येत या कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन हर्षवर्धन देशमुख यांच्यासह प्राचार्य डॉ. नंदकिशोर चिखले यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details