महाराष्ट्र

maharashtra

Nitin Deshmukh on DCM : 'देवेंद्र फडणवीस यांना खारे पाणी पाजू, त्याच पाण्याने आंघोळसुद्धा घालू'

By

Published : Apr 3, 2023, 10:01 PM IST

Updated : Apr 3, 2023, 10:13 PM IST

खारपान पट्ट्यातील 69 गावांना खारे पाणी प्यावे लागत आहे. या गावांमध्ये वाण धरण येथून पाणीपुरवठा योजना करण्यासाठी महाविकास आघाडीने निधी मंजूर केला होता. मात्र, ही योजना सध्याच्या राज्य सरकारने स्थगित केली आहे. तेल्हारा तालुक्यातील अनेक नागरिक न्यायालयात गेलेले असतानाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे 69 गावांमधील नागरिक खारपाणपट्ट्यातील खारे पाणी जमा करून टँकरद्वारे हे पाणी घेऊन ग्रामस्थांच्या सोबत पायी जाऊन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी देणार आहोत, असे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले.

MLA Nitin Deshmukh Movement
MLA Nitin Deshmukh Movement

आमदार नितीन देशमुख आक्रमक

अकोला : त्यांना हे पाणीसुद्धा पाजण्यात येईल आणि त्याची अंघोळदेखील उपमुख्यमंत्र्यांना घालण्यात येईल, अशी माहिती ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शासकीय विश्रामगृह येथे ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, खारपान पट्ट्यासाठी महाविकास आघाडीने 69 गावांतील खाऱ्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी 69 ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. यासाठी निधीही मंजूर झाला होता.

उपमुख्यमंत्री यांच्याकडून पाणीपुरवठा योजना स्थगित :या योजनेचे जवळपास 70 ते 80 टक्के कामही पूर्ण झाले. मात्र, शिंदे गट आणि भाजपने स्थापन केलेल्या सत्तेनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक आमदारांच्या सांगण्यावरून ही योजना स्थगित केली. त्यामुळे या खारपानपट्ट्यातील 69 गावांमधील ग्रामस्थ हे गोड्या पाण्यापासून वंचित झाले आहेत. अचानकपणे स्थगित करण्यात आलेल्या या योजनेला भाजपच्या आमदार व पदाधिकाऱ्यांकडून का विरोध होत आहे? हा प्रश्न नितीन देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

तालुक्यातील 69 गावांतील ग्रामस्थांमध्ये नाराजी :69 गावातील ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे. जिल्ह्याचे पालकत्व सांभाळत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाल्यांवरच गोड पाण्यापासून वंचित ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे 69 ग्रामस्थांना सोबत घेऊन ठाकरे गटातील पदाधिकारी हे दहा एप्रिल रोजी खरपानपट्ट्यातील पाणी जमा करतील. अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरात या पाण्याचा जलाभिषेक करून जमा झालेले पाणी टँकरद्वारे ते नागपूर येथे पायदळ वारी करीत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी नेण्यात येईल.

आमदार नितीन देशमुख करणार मोर्चाचे नेतृत्व :पालकमंत्री फडणवीस यांना हे पाणी पिण्यास देण्यात येणार आहे. तसेच, या पाण्याने त्यांना आंघोळ घालण्यासाठी हे पाणी देऊ. या पायदळवाडीमध्ये 69 गावांतील ग्रामस्थ सहभागी होणार आहेत. 21 एप्रिलपर्यंत आम्ही नागपूर येथे पोहोचल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना हे पाणी पिण्यास देणार आहोत, अशी माहितीही ठाकरेचे आमदार देशमुख यांनी एवढी दिली.

योजना स्थगितीवरून तेल्हारा तालुक्यातील नागरिक हे न्यायालयात :वाण धरणातील पाणी खारपाणपट्ट्यातील 69 गावांना देण्यात यावे, यासंदर्भात योजना मंजूर असताना ती स्थगित करण्यात आली. या विरोधात तेल्हारा तालुक्यातील काही नागरिक हे न्यायालयात गेले आहेत. न्यायालयात प्रकरण सुरू असतानाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला स्थगिती दिली. त्यामुळे पालकमंत्री फडणवीस यांनीच न्यायालयाचा अवमान केला असल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी यावेळी केला आहे.

आमदार नितीन देशमुख यांची पत्रकार परिषद :खारपणपट्टीतील पाणी टँकरद्वारे घेऊन जाण्यासाठी शेकडो ग्रामस्थ आमच्यासोबत येण्यास तयार आहेत. त्यासाठी आम्ही प्रशासनाकडून परवानगीही घेऊ. परंतु, ही पायदळ वारी आहे. त्यामुळे यासाठी परवानगी लागत नसली तरीही आम्ही याबाबत परवानगी घेऊन हे आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत नागपूर येथील निवासस्थानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला भेटणार नाहीत; तोपर्यंत आम्ही त्याच ठिकाणी राहू, अशी माहिती ही ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पावनीकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा, राहुल कराळे, उपजिल्हाप्रमुख गजानन बोराळे, संतोष अनसने यांच्यासह आदी ठाकरे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : Mumbai Crime : मुंबईतील बलात्कार प्रकरणाचे आसाम कनेक्शन; 5 वर्षापासून फरार आरोपीला अखेर अटक

Last Updated :Apr 3, 2023, 10:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details