महाराष्ट्र

maharashtra

दत्तजयंती निमित्त २९ व ३० डिसेंबरला देवगडकडे जाणारे रस्ते बंद राहाणार; दत्त मंदिर संस्थानचा निर्णय

By

Published : Dec 26, 2020, 5:09 PM IST

जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील श्री. क्षेत्र देवगड येथे दत्तजयंती निमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी २९ व ३० डिसेंबर असे दोन दिवस देवगडकडे जाणारे रस्ते बंद राहाणार आहे. हा निर्णय श्री. दत्त मंदिर देवगड संस्थानने घेतला असल्याची माहिती संस्थानचे प्रमुख मार्गदर्शक भास्करगिरी महाराज यांनी दिली.

Datta Mandir Devgad Sansthan
दत्तजयंती

अहमदनगर -जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील श्री. क्षेत्र देवगड येथे दत्तजयंती निमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी २९ व ३० डिसेंबर असे दोन दिवस देवगडकडे जाणारे रस्ते बंद राहाणार आहे. हा निर्णय श्री. दत्त मंदिर देवगड संस्थानने घेतला असल्याची माहिती संस्थानचे प्रमुख मार्गदर्शक भास्करगिरी महाराज यांनी दिली.

माहिती देताना भास्करगिरी महाराज

हेही वाचा -शिर्डी मंदिर परिसरात लवकरच पर्यटन पोलिसांची चौकी होणार सुरू

कोरोना महामारीच्या जागतिक संकटामुळे सर्वच क्षेत्रामध्ये कमालीची स्वच्छता व सुरक्षित अंतर पाळण्यात येत असून सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर शासन, प्रशासनाकडून अनेक बंधने घालण्यात आली आहेत. त्या दृष्टीने कार्यकारी मंडळ, तसेच भक्तगणांशी चर्चा करून या वर्षी संपन्न होणारा भगवान दत्तात्रयांचा जन्म सोहोळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय संस्थान प्रशासनाने घेतला आहे.

अत्यंत अल्पसंख्येत साजरा होणार सोहोळा

कर्नाटक व इतर ठिकाणी जाहीर झालेले नवीन लॉकडाऊन व नुकतेच पार पडलेल्या श्री. क्षेत्र आळंदी व श्री. क्षेत्र जेजूरी येथील अनुभव लक्षात घेता संस्थान प्रशासनाने दत्त जन्म सोहोळा प्रसंग अत्यंत अल्पसंख्येत साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यादृष्टीने मंगळवार २९ डिसेंबर २०२० रोजी सकाळपासून ते बुधवार ३० डिसेंबर २०२० सायंकाळ पर्यंत प्रवरासंगम, देवगड फाटा व नेवासा येथून श्री. क्षेत्र देवगडकडे येणारे रस्ते बंद केले जाणार असून, श्री. क्षेत्र देवगड येथील नवीन स्वागतद्वारही पूर्णपणे बंद राहाणार आहे. याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी, असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी केले.

दूरचित्रवाहिनी व फेसबुकद्वारे थेट प्रक्षेपण

दत्त जन्मसोहोळ्याचा आनंद अनुभवण्यासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी दत्त जन्म सोहोळ्याचे विविध दूरचित्रवाहिन्या, तसेच फेसबुकद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तरी सर्व भाविकांनी त्याचा लाभ घेऊन प्रत्यक्ष श्री. क्षेत्र देवगड येथे येण्याचे टाळावे व संस्थान प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले. याबद्दल भाविकांच्या होणाऱ्या संभाव्य गैरसोयीबद्दल संस्थान प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

हेही वाचा -अहमदनगरमधील सुपा ग्रामपंचायत मतदारयादीत बांगलादेशी!

ABOUT THE AUTHOR

...view details