महाराष्ट्र

maharashtra

Tokyo Paralympics : भारताची पॅरालिम्पिकमध्ये 7 पदकांची कमाई; अवनी लेखराचा सुवर्णवेध...

By

Published : Aug 30, 2021, 8:53 AM IST

Updated : Aug 30, 2021, 10:18 AM IST

पॅरालिम्पिक्समध्ये महिला नेमबाज अवनी लेखराने इतिहास रचत 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णवेध घेतला. पॅरालिम्पिक्समधील भारताच्या खात्यातील हे पहिलं सुवर्ण पदक आहे. आतापर्यंत भारताने पॅरालिम्पिकमध्ये 7 पदकांची कमाई केली. यात 1 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कास्य पदकांचा समावेश आहे.

Tokyo Paralympics: India's Avani wins gold  for 10m Air Rifle standing SH1 final
Tokyo Paralympics 2021 : भारताने रचला इतिहास, अवनी लेखराचा सुवर्णवेध...

टोकियो -टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारतावर आज पदकांचा वर्षाव होत आहे. आज महिला नेमबाज अवनी लेखराने इतिहास रचत भारताला सुवर्ण पदक जिंकून दिलं. अवनी लेखराने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णवेध घेतला. पॅरालिम्पिक्समधील भारताच्या खात्यातील हे पहिलं सुवर्ण पदक आहे. अवनी लेखराने खातं उघडल्यानंतर आज आणखी तीन पदकं भारताच्या खात्यात पडली आहेत. आज सोमवारी 4 तर रविवारी 3 अशी एकूण सात पदकं भारताने आतापर्यंत पॅरालिम्पिक्समध्ये जिंकली आहेत. यात 1 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कास्य पदकांचा समावेश आहे.

पॅरालिम्पिक्समधली आतापर्यंतची पदकं -

भारताची टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेल हिनं देशाला पहिलं मेडल मिळवून दिलं होतं. रविवारी झालेल्या सामन्यात तिनं रौप्य पदकाची कमाई केली. भाविनाचा फायनलमध्ये पराभव झाला. भाविनाला महिला एकेरीत चीनच्या झाऊ यिंगकडून ३-० असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

पॅरालिम्पिक्समध्ये भारतासाठी दुसरे पदक पटकावले निषाद कुमारने. उंच उडी स्पर्धेत निषाद कुमारने भारतासाठी आणखी एक रौप्य पदक पटकावलं. निषाद कुमारने 2.06 मीटर उंच उडी मारत रौप्य पदक जिंकले. त्याने या कामगिरीसर वैयक्तिक विक्रमाशी बरोबरी साधली. निषाद कुमार याने पदकावर नाव करण्यासोबत आशियाई रेकॉर्ड नोंदवला आहे. तर अमेरिकेचा टाउनसेंड रोडेरिक याने 2.15 मीटरची उडी टाकत सुवर्ण पदक जिंकलं.

टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत रविवारचा दिवस भारतासाठी चांगला राहिला. भाविना, निषादनंतर विनोद कुमार यांनी थाळी फेकमध्ये कांस्य पदकं मिळवलं. हे भारताच तिसरे पदक आहे. पहिल्यांदाच पॅरालिंपिकमध्ये सहभागी झालेल्या विनोद कुमार यांनी 19.91 मीटर लांब थाळी फेकत कांस्य पदकाची कमाई केली. त्यांच्या या कामगिरीनं आशियामध्ये विक्रम नोंदवला आहे. F52 गटात खेळत असलेले विनोद 41 वर्षांचे आहेत. मात्र, माहितीनुसार, सामन्याचा निकाल रोखण्यात आला आहे. अपंगत्व वर्गीकरणावर विरोध करण्यात आल्यानंतर निकाल रोखण्यात आला आहे. आयोजकांनी 22 ऑगस्ट रोजी विनोद यांच्या अपंगत्वाचे वर्गीकरण केले होते. वर्गीकरणाला कोणत्या आधारावर आव्हान दिले गेले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आज सोमवारी पॅरालिम्पिक्समध्ये भारतासाठी चौथे पदक अवनी लेखराने जिंकले. तिने थेट सुवर्णवेध घेतला. चीनच्या नेमबाजाचा परभाव करत अवनी 249.6 पॉईंट्स मिळवले आहेत. चीनच्या झांगने 248.9 गुणांसह दुसरं स्थान मिळवत, रौप्य पदक पटकावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन अवनीचे कौतूक केले आहे.

थाळीफेकीतही भारताच्या योगेश कठुनियाने आज रौप्यपदक जिंकले. योगेशने 44.38 इतक्या लांब थाळी फेकली आणि पदक जिंकले. सुरुवातीला योगेश सुवर्णपदकाच्या शर्यतीत होता. पण ब्राझीलच्या खेळाडूने 44.57 इतक्या लांब थाळी फेकत आघाडी घेतली. टोकियो पॅरालिम्पिक्समधलं भारताचे या स्पर्धेतील हे पाचवे पदक आहे.

भारताच्या भालाफेकपटू देवेंद्र झाझरियाने आज पॅरालिम्पिक्समध्ये सहावे पदक मिळवून दिले. देवेंद्र झाझरियाने पॅरालिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत F46 प्रकारात 64.35 मीटर भालाफेक करुन रौप्यपदक जिंकलं आहे.

पॅरालिम्पिक्समध्ये सुंदरसिंग गुर्जर याने भालाफेकीत F46 प्रकारात 64.01 मीटर भालाफेक करुन कांस्य पदक जिंकलं आहे. टोकियो पॅरालिम्पिक्समधलं भारताचे या स्पर्धेतील हे सातवे पदक आहे.

पॅरालिम्पिक्समध्ये भारताची सर्वश्रेष्ठ कामगिरी कोणती?

भारतीय संघाने पॅराऑलिम्पिकमध्ये सर्वश्रेष्ठ कामगिरी 2016 मध्ये केली होती, असे म्हटलं जायचे. रिओमध्ये झालेल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताने 4 पदके जिंकली होती. पण टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत 7 पदकं कमावली आहेत. यामुळे या स्पर्धेत भारतीय आपली सर्वश्रेष्ठ कामगिरी नोंदवू शकतो.

हेही वाचा -Tokyo Paralympics: भाविनाबेन पटेलच्या 'रुपेरी' कामगिरीचे अभिनव बिद्राने केलं कौतुक, म्हणाला...

हेही वाचा -Tokyo Paralympics : टोकियोत भारताने जिंकले तिसरे पदक, विनोद कुमारची कास्य पदकाला गवसणी

Last Updated : Aug 30, 2021, 10:18 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details