महाराष्ट्र

maharashtra

एलिस पेरीनं 300व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात हिसकावला भारताकडून विजय; मालिकेत 1-1 बरोबरी

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 9:25 AM IST

INDW vs AUSW T20 : भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या टी-20 सामन्यात 6 गडी राखून पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या विजयासह मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. 9 जानेवारीला होणारा उभय संघांमधील तिसरा सामना आता मालिकेचा निर्णायक सामना ठरणार आहे.

INDW vs AUSW T20
INDW vs AUSW T20

मुंबई INDW vs AUSW T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात डी वाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाकडून 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह ऑस्ट्रेलियानं पहिल्या टी-20 सामन्यातील पराभवाचा बदला घेत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधलीय.

ऑस्ट्रेलियानं 6 विकेटनं जिंकला सामना : भारतानं दिलेलं 131 धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियानं 19 षटकांत 4 गडी गमावून 133 धावा करत सहज गाठलं. आपल्या कारकिर्दीतील 300 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या एलिस पेरीनं ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक नाबाद 34 धावा केल्या. तर कर्णधार अ‍ॅलिसा हिलीनंही 26 धावांची खेळी केली. भारताकडून दीप्ती शर्मानं दोन बळी घेतले. अष्टपैलू कामगिरी करुनही दीप्ती आपल्या संघाला विजयापर्यंत नेण्यात अपयशी ठरली.

भारतीय फलंदाजांकडून निराशा : संपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ भारतीय संघावर वर्चस्व गाजवल्याचं दिसत होतं. ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिस हिलीनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. प्रथम गोलंदाजी करताना कांगारु गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत भारताला 20 षटकांत अवघ्या 130 धावांवर रोखलं. भारताकडून अष्टपैलू दीप्ती शर्मानं सर्वाधिक 30 धावा केल्या. मात्र, दुर्दैवानं तिला धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. स्मृती मानधना आणि ऋचा घोष यांनीही फलंदाजीत प्रत्येकी 23 धावांचं योगदान दिलं. उर्वरीत फलंदांजांनी मात्र निराशा केली.

तिसरा टी20 ठरेल निर्णायक : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेली 3 सामन्यांची टी-20 मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आहे. अशा स्थितीत मंगळवारी होणारा सामना आता मालिकेचा निर्णायक सामना ठरणार आहे. जो संघ तिसरा टी-20 सामना जिंकेल, तो संघ मालिकेवर कब्जा करेल. अशा स्थितीत मंगळवारी दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.

एलिस पेरीनं रचला इतिहास : ऑस्ट्रेलियाची स्टार अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीनं रविवारी भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मैदानात उतरताच इतिहास रचलाय. तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिचा 300 वा सामना होता. ऑस्ट्रेलियाकडून 300 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी ती पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरलीय. पेरीनं माजी भारतीय दिग्गज मिताली राजच्या 300 सामन्यांच्या क्लबमध्ये प्रवेश केलाय. 300 किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी ती चौथी महिला खेळाडू आहे. पेरीनं आतापर्यंत 12 कसोटी, 141 एकदिवसीय आणि 147 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटू :सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूंच्या यादीत भारताची मिताली राज पहिल्या क्रमांकावर आहे. मितालीनं 23 वर्षांच्या कारकिर्दीत 333 सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्त्व केलंय. तिच्यापाठोपाठ इंग्लंडची शार्लोट एडवर्ड्स (309) आणि न्यूझीलंडची सुझी बेट्स (309) यांचा क्रमांक लागतो. त्याचबरोबर पेरीनंतर सर्वाधिक सामने खेळणारी ऑस्ट्रेलियन खेळाडू सध्याची कर्णधार अ‍ॅलिसा हिली आहे. हिलीनं आतापर्यंत 261 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

हेही वाचा :

  1. एकच वादा, रोहित दादा! कर्णधार म्हणून कायम; अफगाणिस्तानविरुद्ध टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
  2. टीम इंडियाला मोठा धक्का, सूर्यकुमार-हार्दिक अफगाणिस्तानविरुद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर

ABOUT THE AUTHOR

...view details