महाराष्ट्र

maharashtra

भारतीय महिलांचा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय; इंग्लिश महिलांना पळता भुई थोडी

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 16, 2023, 2:11 PM IST

IND W vs ENG W Test Match : भारतीय महिला क्रिकेट संघानं कसोटी सामन्यात इंग्लंडवर मोठा विजय मिळवलाय. भारतीय महिलांनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी उपाहारापूर्वीच सामना जिंकला. विशेष म्हणजे भारतीय संघानं तब्बल 9 वर्षांनंतर कसोटीत विजय मिळवला आहे.

IND W vs ENG W Test Match
IND W vs ENG W Test Match

नवी मुंबई IND W vs ENG W Test Match : भारतीय महिला क्रिकेट संघानं एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडचा दारुण पराभव केलाय. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघानं 347 धावांच्या मोठ्या फरकानं ऐतिहासिक विजय मिळवलाय. महिलांच्या कसोटी क्रिकेटमधील धावांच्या बाबतीतही हा सर्वात मोठा विजय आहे. भारतीय संघानं तब्बल 9 वर्षांनंतर कसोटी सामना जिंकलाय. या कालावधीत संघ केवळ दोन सामने खेळला आणि दोन्ही सामने अनिर्णित राहिले. भारतीय महिला संघाची ही चाळीसावी कसोटी होती. आतापर्यंत संघाला 6 विजय आणि 6 पराभव पत्करावे लागले आहेत. तर 27 सामने अनिर्णित राहिले.

इंग्लंडचा डाव एका सत्रात संपुष्टात : इंग्लंडचा शेवटचा डाव एका सत्रापुरताच मर्यादित होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारतीय संघानं 6 बाद 186 धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी भारतीय संघानं फलंदाजी न करण्याचा निर्णय घेत आपला डाव घोषित केला. इंग्लंडला विजयासाठी 479 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण पाहुण्या संघाचा डाव एकाच सत्रातील 28व्या षटकांत 131 धावांवर आटोपला. भारताकडून फिरकीपटू दीप्ती शर्मानं 4 तर वेगवान अष्टपैलू गोलंदाज पूजा वस्त्राकरनं 3 बळी घेतले.

दीप्ती शर्मा ठरली सामनावीर : अष्टपैलू दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कार मिळाला. पहिल्या डावात तिनं इंग्लंडच्या 5 फलंदाजांना बाद केलं. यासोबतच दीप्तीनं पहिल्या डावात अर्धशतकही झळकावलं होतं. तिनं 113 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 67 धावा केल्या. दुसऱ्या डावात तिनं 18 चेंडूत 20 धावांचं योगदान दिलंय.

महिलांच्या कसोटीत धावांनी सर्वात मोठे विजय :

  • 347 धावा- भारत विरुद्ध इंग्लंड 2023-24
  • 309 धावा- श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान 1997-98
  • 188 धावा- न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका 1971-72
  • 186 धावा- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड 1948-49
  • 185 धावा- इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड 1948-49

9 वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी : भारतीय महिला संघानं तब्बल 9 वर्षांनंतर मायदेशात कसोटी सामना खेळलाय. यापूर्वी 2014 मध्ये टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या भूमीवर कसोटी खेळली होती. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या कसोटीनंतर भारतीय महिला संघाला पुढील कसोटीसाठी फार प्रतीक्षा करावी लागणार नाही. 5 दिवसांनंतर 21 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात वानखेडेवर कसोटी सामना खेळवला जाणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिकाही होणार आहे.

हेही वाचा :

  1. नऊ वर्षांनंतर भारतात महिला कसोटी सामन्याचं आयोजन; इंग्लंड खेळणार शंभरावी 'कसोटी'
  2. भारत-दक्षिण आफ्रिका टी २० सामना; दक्षिण आफ्रिकेच्या मदतीला धावला पाऊस, भारताचा पराभव

ABOUT THE AUTHOR

...view details