महाराष्ट्र

maharashtra

Virat Kohli Equals Sachin Record : 'देवाशी' बरोबरी केल्यानंतर विराट भावूक होत म्हणाला, 'हा खूप मोठा सन्मान'

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 9:22 AM IST

Updated : Nov 6, 2023, 9:28 AM IST

Virat Kohli Equals Sachin Record : विक्रमी खेळी केल्यानंतर विराटनं सचिन तेंडुलकरसोबत बरोबरी करू शकत नसल्याचं सांगितलं. त्याच्या या प्रतिक्रियेचं सध्या सर्वत्र कौतुक होतंय.

Virat Kohli Equals Sachin Record
Virat Kohli Equals Sachin Record

कोलकाता Virat Kohli Equals Sachin Record :विश्वचषकातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीनं आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील 49 वं शतक झळकावत 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केलीय. मात्र सामना संपल्यानंतर सचिन तेंडुलकरसोबत बरोबरी करू शकत नसल्याचं विराटनं प्रांजळपणे सांगितलं. विराटच्या या प्रतिक्रियेचं सध्या कौतुक होतंय. कोहलीच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 49 व्या शतकाच्या जोरावर भारतीय संघानं पाच विकेट्सवर 326 धावा उभारल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव 27.1 षटकांत अवघ्या 83 धावांवर गुंडाळत भारतानं मोठा विजय नोंदवला. यासह विश्वचषकात आपला विजयरथ कायम ठेवलाय.

काय म्हटला विराट : विराट कोहलीला सामनावीराच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यावेळी बोलताना विराट म्हणाला की, "माझ्या हिरोच्या विक्रमाची बरोबरी करणं हा खूप मोठा सन्मान आहे. तो एक भावनिक क्षण आहे. मी कुठून आलो, ते दिवस मला माहित आहेत. मला ते दिवस माहित आहेत जेव्हा मी त्यांना टीव्हीवर पाहिलं होतं. त्यांच्याकडून कौतुक मिळणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे," असं सामन्यानंतर विराटनं म्हटलंय.

'मास्टर ब्लास्टर'कडून कोहलीचं कौतूक : कोहलीच्या विक्रमी शतकानंतर सचिन तेंडुलकरनं X (पूर्वीचं ट्वीटर) वर विराटचं 49 व्या शतकाबद्दल अभिनंदन केलंय. सचिननं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "विराटनं शानदार खेळी खेळली. या वर्षाच्या सुरुवातीला मला 49 ते 50 (वर्षांचं) होण्यासाठी 365 दिवस लागले. मला आशा आहे की पुढील काही दिवसांत तू 49 ते 50 (शतकं) गाठशील आणि माझा विक्रम मोडशील. अभिनंदन", अशी पोस्ट सचिननं केलीय.

तेंडुलकरचा संदेश खूप खास : सचिनच्या पोस्टबद्दल कोहलीला विचारलं असता तो म्हणाला, "त्यांचा संदेश माझ्यासाठी खूप खास आहे.' पुढं कोहली म्हणाला की, चाहत्यांनी हा सामना त्याच्यासाठी खूप खास बनवला. हा एक आव्हानात्मक सामना होता. कदाचित, स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्वात कठीण संघाविरुद्ध खेळताना आम्हाला चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली," असंही कोहलीनं सामन्यानंतर म्हटलंय.

वाढदिवशी शतकी खेळी करणारा विराट सातवा फलंदाज :विराट कोहलीनं रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकी खेळी करत सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली. यासोबतच वाढदिवसाच्या दिवशी शतकी खेळी करणारा विराट कोहली सातवा फलंदाज बनलाय. रविवारी त्याचा 35वा वाढदिवस होता. त्यानं 101 धावा केल्या. यापूर्वी सहा जणांनी हा विक्रम केला आहे.

होय विराट कोहली स्वार्थी-माजी क्रिकेटपट्टू व्यंकटेश प्रसादनंदेखील विराट कोहलीचं कौतुक केलं. त्यानं एक्समध्ये पोस्ट करत म्हटलं, विराट कोहली हा स्वार्थी असल्याचा गमतीशीर वाद केला जातो. होय, कोहली स्वार्थी आहे. अब्जावधी लोकांच्या स्वप्नाचा पाठलाग करण्याकरिता विराट हा स्वार्थी आहे. इतकं साध्य करूनही उत्कृष्टतेसाठी कठोर परिश्रम करण्याकरिता स्वार्थी आहे. नवीन विक्रम करण्याकरिता पुरेसा स्वार्थी आहे. त्याच्या संघाचा विजय करण्यासाठी पुरेसा स्वार्थी आहे, असं व्यंकटेश प्रसादनं म्हटलं.

वाढदिवसाच्या दिवशी शतकी खेळी करणारे खेळाडू :

  • विनोद कांबळी - 100* धावा विरुद्ध इंग्लंड 1993
  • सचिन तेंडुलकर 131 धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया 1998
  • सनथ जयसूर्या 130 धावा विरुद्ध भारत 2008
  • रॉस टेलर 131* धावा विरुद्ध पाकिस्तान 2011
  • टॉम लॅथम 140* धावा विरुद्ध नेदरलॅंड्स 2022
  • मिशेल मार्श 121 धावा विरुद्ध पाकिस्तान 2023
  • विराट कोहली 101* धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका 2023

हेही वाचा :

  1. Prasidh Krishna : प्रसिद्ध कृष्णा लहानपणापासूनचं आहे प्रतिभावान गोलंदाज, विश्वचषकात निवड होणं अभिमानास्पद
  2. Virat Kohli Record : कोहलीची विश्वचषकात आणखी एक 'विराट' कामगिरी; रचला नवा इतिहास
  3. Virat Kohli : शतकांच्या विक्रमाची बरोबरी करताच सचिनच्या विराटला अनोख्या शब्दात शुभेच्छा!
Last Updated : Nov 6, 2023, 9:28 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details