महाराष्ट्र

maharashtra

Stuart Broad Retirement : युवराज सिंगने 6 षटकार ठोकलेल्या गोलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, युवी म्हणाला..

By

Published : Jul 30, 2023, 6:55 PM IST

Updated : Jul 30, 2023, 7:33 PM IST

इंग्लंडचा आघाडीचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. ब्रॉड इंग्लंडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महान वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. भारतीयांना मात्र तो युवराज सिंगने त्याला मारलेल्या 6 षटकारांमुळेच जास्त लक्षात आहे. त्याच्या निवृत्तीनंतर युवीने एक ट्विट केले आहे. (Stuart Broad Retirement).

Stuart Broad
स्टुअर्ट ब्रॉड

लंडन : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने अ‍ॅशेस मालिकेतील पाचवा कसोटी सामना त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना असल्याचे जाहीर केले आहे. अशाप्रकारे त्याच्या 17 वर्षांच्या ऐतिहासिक कारकिर्दीला पूर्णविराम मिळाला आहे. (Stuart Broad Retirement).

स्टुअर्ट ब्रॉडचा निवृत्तीचा संदेश : 'ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. हा एक आश्चर्यकारक प्रवास होता. नॉटिंगहॅमशायर आणि इंग्लंड संघाकडून खेळणे माझ्यासाठी गौरवाचे होते. मला नेहमीच अव्वल स्थानी राहायचे होते. ही मालिका माझ्या सर्वात आनंददायक मालिकांपैकी एक आहे', असे स्टुअर्ट ब्रॉड याने त्याच्या निवृत्तीच्या संदेशात म्हटले आहे.

ब्रॉडचे युवराज सिंगशी 'खास' नाते : भारतीयांना मात्र स्टुअर्ट ब्रॉड हा त्याच्या ऐतिहासिक कारकिर्दीपेक्षा दुसऱ्याच एका गोष्टीमुळे जास्त लक्षात राहिला आहे. 2007 मध्ये त्याच्याच गोलंदाजीत युवराज सिंगने 6 चेंडूत 6 षटकार ठोकले होते. त्यावेळी ब्रॉड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अत्यंत नवखा होता. त्यानंतर मात्र त्याने मोठी भरारी घेत आपले स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.

निवृत्तीवर युवराज सिंगची प्रतिक्रिया : स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर युवराज सिंगने ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. 'तुझ्या अतुलनीय कसोटी कारकिर्दीबद्दल तुझे अभिनंदन! तु कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहेस. तुझा प्रवास आणि जिद्द खूप प्रेरणादायी आहे. तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा', असे ट्विट युवीने केले आहे.

ब्रॉडची कारकीर्द : ब्रॉड इंग्लंडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महान वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये त्याने जगभरात आपला डंका बजावला आहे. त्याच्या नावे सर्व फॉरमॅटमध्ये 800 हून अधिक आंतरराष्ट्रीय विकेट आहेत. ब्रॉडने 167 कसोटी सामन्यांमध्ये 602 विकेट घेतल्या आहेत. तसेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 18 च्या सरासरीने 1 शतक आणि 13 अर्धशतकांसह 3656 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ब्रॉडने 121 सामन्यात 178 विकेट घेतल्या आहेत. 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये 5/23 ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. तर 56 टी 20 सामन्यांमध्ये त्याने 22.93 च्या सरासरीने 65 विकेट घेतल्या आहेत.

2007 मध्ये कसोटी पदार्पण : स्टुअर्ट ब्रॉडने 2007 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. तो इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अव्वल स्थानी दिग्गज गोलंदाज जिमी अँडरसन आहे. या दोघांच्या नावे कसोटीत 600 हून अधिक बळी आहेत. या दोन वेगवान गोलंदाजांची जोडी कसोटी इतिहासात सर्वोत्तम मानली जाते. या दोघांनी मिळून भल्या-भल्या फलंदाजांची भंभेरी उडवली आहे.

हेही वाचा :

  1. ICC World Cup 2023 : क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी; 'या' तारखेपासून विश्वचषकाच्या तिकिटांची ऑनलाइन विक्री सुरू होणार
  2. Asian Games 2023 : टीम इंडियाला मिळाली थेट क्वार्टरफायनलमध्ये एंट्री! जाणून घ्या कशी
  3. India Vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलणार, 'हे' आहे कारण
Last Updated : Jul 30, 2023, 7:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details