महाराष्ट्र

maharashtra

WTC Final : क्रिकेटच्या पंढरीत टीम इंडिया न्यूझीलंडशी भिडणार

By

Published : Mar 6, 2021, 4:54 PM IST

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतील विजयाबरोबरच भारतीय संघाने, आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील आपला प्रवेश निश्चित केला.

India qualify for WTC final 2021
WTC Final : क्रिकेटच्या पंढरीत टीम इंडिया न्यूझीलंडशी भिडणार

अहमदाबाद - भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत, डावाने विजय मिळवला. भारताने उभय संघातील मालिका ३-१ अशी जिंकली. या विजयाबरोबरच भारतीय संघाने, आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वलस्थान काबीज करत स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील आपला प्रवेश निश्चित केला. १८ जूनला लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर भारत-न्यूझीलंड असा अंतिम सामना रंगणार आहे.

ऑस्ट्रेलिया संघाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली. यामुळे उभय संघातील कसोटी मालिका रद्द करावी लागली. त्याचा फटका ऑस्ट्रेलिया संघालाच बसला. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारत-इंग्लंड यांच्यातील मालिका निकालावर दुसरा संघ ठरणार होता. न्यूझीलंडने आधीच अंतिम सामन्यात प्रवेश केल्यामुळे दुसऱ्या स्थानासाठी भारत, इंग्लंड यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचा संघ देखील शर्यतीत होता. पण, ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी भारत-इंग्लंड मालिकेच्या निकालावर अवलंबून राहवे लागले होते. पण, भारतीय संघाने चौथी कसोटी सामन्यासह मालिका जिंकून ऑस्ट्रेलियालाही स्पर्धेतून बाहेर फेकले.

भारताने चौथी कसोटी अशी जिंकली -

इंग्लंडने पहिल्या डावात २०५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ऋषभ पंतचे शतक आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद ९६ धावांच्या जोरावर ३६५ धावा करून १६० धावांची आघाडी घेतली. इंग्लंडचा दुसरा डाव भारतीय फिरकीपुढे गडगडला. आर अश्विन आणि अक्षर पटेल या फिरकी जोडीने इंग्लंडचा दुसरा डाव १३५ धावांवर गुंडाळला आणि भारताने हा सामना १ डाव २५ धावांनी जिंकला. अक्षर पटेलने ४८ धावांत पाच विकेट घेतल्या, तर आर अश्विननेही ४७ धावांत पाच बळी टिपले.

हेही वाचा -सुंदरला शतकाची हुलकावणी : वाईट वाटतं रे..! लक्ष्मणने व्यक्त केली खंत

हेही वाचा -Ind VS Eng ४th Test : टीम इंडियाने WTC फायनलचे तिकीट मिळवले, अखेरच्या कसोटीत इंग्लंडवर डावाने विजय

ABOUT THE AUTHOR

...view details