महाराष्ट्र

maharashtra

आजचा दिवस 'तुमचा'!

By

Published : Jan 25, 2021, 7:01 AM IST

National Voters Day 2021 ETV Bharat special article

बुलेटपेक्षाही बॅलेटमध्ये अधिक शक्ती असते, असे अमेरिकेचे १६वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन म्हणत. अमेरिकेची यावर्षीची अध्यक्षीय निवडणूक ही याचाच प्रत्यय देणारी ठरली. लोकशाहीमध्ये मतदार हाच 'राजा' असतो, हे यानिमित्ताने पुन्हा सिद्ध झाले. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात, २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने हा विशेष लेख...

हैदराबाद : जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाला, या देशातील लोकशाहीला कोणी बळकट करत असेल, तर ते आहेत इथले मतदार. तब्बल ९० कोटींहून अधिक मतदार असलेल्या आपल्या देशात निवडणूक म्हणजे एक सोहळाच असतो. या सोहळ्याला अधिक रंग येतो, ते देशातील विविधतेमुळे. वेगवेगळ्या भाषा, धर्म, संस्कृती आणि प्रांतांमधील लोक जेव्हा एकत्र येऊन आपला सर्वोच्च नेता निवडतात, तेव्हा लोकशाहीची खरी ताकद दिसून येते.

कसा साजरा कराल मतदार दिन..

यावर्षी २५ जानेवारीला आपण दहावा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करत आहोत. जास्तीत जास्त लोकांना मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्यास, आणि मतदान करण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. देशभरात विविध ठिकाणी नवीन मतदार नोंदणीसाठी अभियानं राबवली जातात, तसेच काही ठिकाणी मतदान प्रक्रिया आणि मतदारांना त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते.

का आणि कसा साजरा केला जातो मतदार दिन?

१९५० साली २५ जानेवारीला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती. यानंतर २०११साली या आयोगाच्या वर्धापनदिनी पहिला राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. कायदे मंत्रालयाने याबाबतची शिफारस केली होती, ज्याला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मंजूरी दिल्यानंतर या दिवसाची सुरुवात झाली. यानंतर प्रत्येक वर्षी एका विशिष्ट थीमवर आधारित असा मतदार दिन साजरा करण्यात आला. २०२०च्या मतदार दिनाची थीम होती; 'मजबूत लोकशाहीकरता निवडणूक साक्षरता'. तर, 'मतदारांना साक्षर, सशक्त, सुरक्षित आणि माहितीपूर्ण बनवणे' अशी २०२१ची थीम असणार आहे.

महामारी आणि निवडणुका..

कोरोना महामारीमुळे २०२०मध्ये ७५हून अधिक देशांनी आपल्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनलॉक सुरू असताना काही देशांनी विशेष खबरदारी बाळगत निवडणुका पार पाडल्या. अमेरिकेमध्ये तर सध्या ट्रम्प प्रशासनाचा अस्त होऊन, बायडेन प्रशासन सुरू झाले आहे. या निवडणुकांमध्ये कोरोना महामारीचे व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरला. यावेळी बायडेन यांना हवे त्याहून अधिक इलेक्टोरल व्होट्स तर मिळालेच, मात्र माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्यापेक्षाही अधिक मतं मिळवण्यात बायडेन यशस्वी ठरले.

देशात आता सध्या बिहार आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्रात नुकत्याच तब्बल १४ हजार ग्रामपंचायतींसाठी निवडणुका पार पडल्या. कोरोना महामारीचे सावट असूनही, मोठ्या प्रमाणात मतदारांनी घराबाहेर पडत आपला मतदानाचा हक्क बजावला, हे उल्लेखनीय आहे. या मतदार दिनी; एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही मतदान करुन आपले कर्तव्य बजावू शकताच. मात्र, मतदार दिनाच्या निमित्ताने, आपल्या आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीला याबाबत माहिती देऊन, त्यालाही निवडणूक साक्षर करु शकता.

हेही वाचा :हवेच्या प्रदूषणापासून तुम्ही घरात सुरक्षित आहात?

ABOUT THE AUTHOR

...view details