महाराष्ट्र

maharashtra

‘बांबू' चित्रपटाद्वारे तेजस्विनी पंडित करणार चित्रपट निर्मितीत पदार्पण

By

Published : May 12, 2022, 5:03 PM IST

बांबू मोशन पोस्टर

तेजस्विनी पंडितने नुकतेच ‘बांबू’ या चित्रपटाद्वारे निर्मितीक्षेत्रात पाऊल टाकले आहे. यात प्रेमात पडलेल्या किंबहुना ‘लागलेल्या’ ‘बांबू’ ची कथा खुमासदार पद्धतीने मांडण्यात आली आहे. तेजस्विनी पंडित आणि संतोष खेर निर्मित आणि विशाल देवरुखकर दिग्दर्शित नव्या चित्रपटाची घोषणा झाली असून ‘बांबू’ मधून एक आगळावेगळा विषय हाताळला जाणार आहे.

मुंबई- तेजस्विनी पंडित ही एक उत्तम अभिनेत्री असून तिने वैविध्यपूर्ण भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता ती एका नवीन रूपात प्रेक्षकांसमोर येतेय. तेजस्विनीने नुकतेच ‘बांबू’ या चित्रपटाद्वारे निर्मितीक्षेत्रात पाऊल टाकले आहे. यात प्रेमात पडलेल्या किंबहुना ‘लागलेल्या’ ‘बांबू’ ची कथा खुमासदार पद्धतीने मांडण्यात आली आहे. तेजस्विनी पंडित आणि संतोष खेर निर्मित आणि विशाल देवरुखकर दिग्दर्शित नव्या चित्रपटाची घोषणा झाली असून ‘बांबू’ मधून एक आगळावेगळा विषय हाताळला जाणार आहे, मनोरंजक पद्धतीने.

बांबू मोशन पोस्टर

मराठी सिनेसृष्टीत 'बॉईज', 'बॉईज २' आणि 'गर्ल्स' ची दंगामस्ती पडद्यावर सादर केल्यानंतर आता दिग्दर्शक विशाल सखाराम देवरुखकर आणखी एक तुफान चित्रपट घेऊन सज्ज झाले आहेत. 'बांबू' असे या चित्रपटाचे नाव असून प्रेमात पडलेल्या, नव्हे लागलेल्या प्रत्येकासाठी हा सिनेमा आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला असून यानिमित्ताने ‘बांबू’चे टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अंबर विनोद हडप लिखित या चित्रपटाची पहिलीच झलक खूप काही सांगून जाणारी आहे. 'लव्ह अंडर कन्स्ट्रक्शन' म्हणजेच यात प्रेमकहाणी पाहायला मिळणार असून त्यात 'बांबू'ही पडणार आहेत. आता हे 'बांबू' कोणाला आणि कसे पडणार आहेत, हे पाहणे रंजक ठरेल.

सध्या तरी ‘बांबू’ चित्रपटातील कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. लवकरच त्यांचीही आोळख होईल. विशेष बाब म्हणजे अभिनेत्री तेजस्विनी पंडित ‘बांबू’च्या निमित्ताने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. यापूर्वी तिने प्लॅनेट मराठीसाठी ‘अथांग’ या वेबशोची निर्मिती केली आहे जी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि नुकतेच तिने प्रस्तुतकर्ता म्हणूनही काम केले आहे.

दिग्दर्शक विशाल देवरुखकर चित्रपटाबद्दल म्हणाले, ''हा एक युथ एंटरटेनिंग चित्रपट असून यात खुमासदार कथानक पाहायला मिळणार आहे. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाने हा चित्रपट आपल्या साथीदारासोबत पाहावा. कुठेतरी हा चित्रपट तरुणाईला आपल्या आयुष्याशी नक्कीच मिळताजुळता वाटेल. खूप हलकाफुलका विषय असून प्रेमात पडलेल्या सर्वांनाच हा धमाल सिनेमा आवडेल. अभिनेत्री म्हणून मी तेजस्विनीसोबत काही सिनेमांमध्ये काम केले आहे. आता निर्माती म्हणून पहिल्यांदाच काम करत आहे आणि ही जबाबदारी ती उत्तमरित्या सांभाळत आहे.”

निर्माती तेजस्विनी पंडित आपल्या चित्रपट निर्मिती पदार्पणाबद्दल म्हणाली, “विशाल देवरूखकर यांचे चित्रपट नेहमीच तरुणाईला भुरळ पाडणारे असतात. हल्लीच्या मुलांची भाषा, वागणे, जीवनशैली अशा युवा भावविश्वाभोवती फिरणारे त्यांचे चित्रपट तरूणतरुणींना स्वतःच्या आयुष्यासारखे वाटतात. विशेष म्हणजे या चित्रपटातून काहीतरी बोधही दिला जातो. मला आणि संतोषला ही कथा खूप भावली त्यामुळेच निर्मिती पदार्पणासाठी आम्ही ‘बांबू’ची निवड केली.’’

क्रिएटिव्ह वाईब प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संतोष खेर यांनीही सांभाळली आहे. यापूर्वी क्रिएटीव्ह वाईबने 'पॉंडीचेरी' आणि सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या 'चंद्रमुखी' चित्रपटाकरता प्रस्तुतकर्त्याची जबाबदारी सांभाळली होती.

हेही वाचा -‘पृथ्वीराज’ दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी सांगितला चित्रपटाच्या बजेटचा किस्सा

ABOUT THE AUTHOR

...view details