महाराष्ट्र

maharashtra

'...म्हणून शिवसेनेने घेतली शरद पवारांची मुलाखत '

By

Published : Jul 13, 2020, 4:57 PM IST

मुलाखतीतून महाविकास आघाडीचे सरकार बदलणार नाही, हा संदेश देखील देण्याचा प्रयत्न झाला असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

chandrakant patil
चंद्रकांत पाटील

कोल्हापूर- मोठा गाजावाजा करून आणि सामनाचा खप वाढवून शरद पवार यांची जी मुलाखत झाली ती वाचून असे लक्षात आले की, दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांना यातून धीर देण्याचा प्रयत्न झाला आहे. शिवाय मुलाखतीतून महाविकास आघाडीचे सरकार बदलणार नाही, हा संदेश देखील देण्याचा प्रयत्न झाला असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, खासदार संजय राऊत सतत म्हणतात सरकार पाडून दाखवा, पण आम्हाला सरकार पाडण्याची गरज नाहीये. शरद पवार यांनी म्हटले शिवसेना-भाजप एकत्र लढली म्हणून भाजपच्या 105 जागा निवडून आल्या. मात्र, तुम्ही दोन्ही काँग्रेस एकत्र लढून केवळ 98 जागा आल्या. तुम्ही वेगवेगळे लढला असता तर राष्ट्रवादीच्या 20 आणि काँग्रेसच्या केवळ 10 जागा निवडून आल्या असत्या. त्यामुळे भविष्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सर्वांनी वेगवेगळ्या जागा लढवू आणि त्यानंतर कोणाच्या किती जागा येतात हे पाहू आणि याची एकदा चाचणी होऊन जाऊदेत. शिवाय कोणाची कोणाला मदत झाली आणि झाली नाही हे सुद्धा यानंतर स्पष्ट होईल, असेही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले, 2019 च्या निवडणुकीत भाजपला 1 कोटी 42 लाख मते मिळाली, शिवसेनेला 94 लाख, राष्ट्रवादीला 92 लाख तर काँग्रेसला 82 लाख मते मिळाली. त्यामुळे सर्वाधिक मतेसुद्धा भाजपला मिळाले ते यातून स्पष्ट आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, सत्ता नाही म्हणून आम्ही अस्वस्थ झालो असेच सत्ताधारी म्हणत असतात. त्यामुळे आम्ही आता यावर काहीच बोलायचे नाही असे ठरवले आहे. ज्या ठिकाणी सरकार चुकते त्या ठिकाणी आम्ही विरोधी पक्ष म्हणून प्रश्न विचारणार आणि आंदोलनसुद्धा करणार. मात्र, हे सर्व प्रश्न विचारण्यासाठी अधिवेशनाची वाट पाहत आहे. 2019 च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी आमच्याकडे आले होते की भाजप त्यांच्याकडे गेले होते हे गुपित असून, त्यांचे काय प्रस्ताव होते याबाबत देवेंद्र फडणवीस सविस्तर बोलणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले.

दरम्यान, राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, त्यांच्या पक्षातील आमदारांना किंवा नेत्यांना आपला पक्ष कमकुवत वाटत असेल शिवाय त्यांना मोदींच्या नेतृत्वावर विश्वास असेल, असेही ते यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details