नवी दिल्ली Bharat Jodo Nyaya Yatra : 'भारत जोडो न्याय यात्रे'ला रविवारी मणिपूर येथून सुरुवात झाली. यावेळी यात्रेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. "भारताच्या पंतप्रधानांना आजपर्यंत मणिपूरला भेट देण्यासाठी वेळ मिळाला नाही. कदाचित भाजपा आणि आरएसएसच्या दृष्टीनं मणिपूर भारताचा भाग नाही", असा हल्लाबोल त्यांनी केला.
काय म्हणाले राहुल गांधी : "भारत जोडो यात्रे दरम्यान जसा आम्ही दक्षिण-उत्तर पायी प्रवास केला, तसाच पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करावा अशी माझी इच्छा होती. लोकांनी यात्रा सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या सूचना दिल्या. काही पूर्वेकडून तर काही पश्चिमेकडून सुरुवात करण्यास सांगत होते. पण मी म्हणालो, पुढची भारत जोडो यात्रा मणिपूरमधूनच सुरू होऊ शकते", असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं.
मणिपूर भाजपाच्या राजकारणाचं प्रतीक : "मणिपूर हे भाजपाच्या राजकारणाचं प्रतीक आहे. ते भाजपा आणि आरएसएसच्या द्वेषाचं, विचारसरणीचं आणि दृष्टिकोनाचं प्रतीक आहे. भाजपा आणि आरएसएसचा द्वेष पसरल्यानं मणिपूरनं सर्वस्व गमावलं. मी 2004 पासून राजकारणात आहे. भारतातील अशा ठिकाणी मी पहिल्यांदाच गेलो जिथे प्रशासनाच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे कोलमडल्या आहेत", असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला.