नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (सोमवार, 28 ऑगस्ट) राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात दिवंगत एन टी रामाराव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्मृती नाण्याचं अनावरण केलं. राष्ट्रपतींनी एनटीआर यांचं स्मृती नाणं जारी केल्याबद्दल वित्त मंत्रालयाचं कौतुक केलं. 'एनटीआर यांचं अनोखं व्यक्तिमत्व लोकांच्या, विशेषतः तेलुगु भाषिक लोकांच्या हृदयात कायमच छापलं जाईल', असं द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.
एनटीआर यांनी भारतीय चित्रपट संस्कृती समृद्ध केली : यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी एन टी रामाराव यांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त केल्या. 'दिवंगत एन. टी. रामाराव यांनी तेलुगू चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय चित्रपट आणि संस्कृती समृद्ध केली. त्यांनी आपल्या अभिनयातून रामायण आणि महाभारतातील प्रमुख पात्रांमध्ये प्राण फुंकलं. त्यांनी साकारलेली भगवान राम आणि भगवान कृष्ण यांची पात्रं इतकी जिवंत झाली की लोक एनटीआरची पूजा करू लागले', असं त्या म्हणाल्या.
अनेक लोककल्याणकारी उपक्रम सुरू केले : एनटीआर यांनी आपल्या कृतीतून सर्वसामान्यांच्या वेदनांना वाचा फोडल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. 'त्यांनी त्यांच्या 'माणूसलांता ओक्कटे' अर्थात सर्व मानव समान आहेत, या चित्रपटातून सामाजिक न्याय आणि समतेचा संदेश दिला', असं त्या म्हणाल्या. 'लोकसेवक आणि नेता म्हणून एनटीआर यांची लोकप्रियता तितकीच व्यापक होती. त्यांनी आपल्या विलक्षण व्यक्तिमत्वाने आणि मेहनतीने भारतीय राजकारणात एक अनोखा अध्याय निर्माण केलाय. त्यांनी अनेक लोककल्याणकारी उपक्रम सुरू केले, जे आजपर्यंत स्मरणात आहेत', असं राष्ट्रपतींनी सांगितलं.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित : नंदामुरी तारका रामाराव अर्थातच एनटीआर हे एक अभिनेता, चित्रपट निर्माता आणि राजकारणी होते. त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. ज्यात प्रामुख्याने तेलुगू चित्रपटांचा समावेश आहे. राव यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने १९६८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं. चित्रपटातील कारकिर्दीनंतर एनटीआर यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी १९८२ मध्ये तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) ची स्थापना केली. ते सातवर्षे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
हेही वाचा :
- National Film Awards 2023 : 'हे' २ मराठी चित्रपट ठरले राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२३ चे मानकरी; जाणून घ्या असं काय आहे या चित्रपटात...
- Ashok Saraf : अशोक सराफ यांचा 'शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कारा'ने गौरव