महाराष्ट्र

maharashtra

One Nation One Election : एक राष्ट्र-एक निवडणुकीसाठी रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2023, 11:27 AM IST

Updated : Sep 1, 2023, 11:47 AM IST

One Nation One Election : केंद्र सरकार एक राष्ट्र-एक निवडणूक बाबत गंभीर झाल्याचं दिसून येत आहे. या संदर्भात १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्यानंतर, आता माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलीय.

One Nation One Election
एक राष्ट्र-एक निवडणूक

नवी दिल्ली: देशात 'एक राष्ट्र - एक निवडणूक' लागू करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं मोठ पाऊल उचललंय. सरकारनं आता माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. विशेष म्हणजे, केंद्रानं १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलंय. या घोषणेच्या एका दिवसानंतर कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीची स्थापना करण्यात आली. या अधिवेशनाचा अजेंडा मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

..तर निवडणुका पुढे ढकलल्या जातील : गेल्या काही वर्षांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या संकल्पनेवर जोर दिला आहे. आता सरकारचा माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना या प्रक्रियेत सामिल करून घेण्याचा निर्णय, या धोरणाचं गांभीर्य अधोरेखित करतो. या वर्षी नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यानंतर पुढील वर्षी मे - जूनमध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील. मात्र आता सरकारच्या या पावलांमुळे, लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर होणार्‍या काही राज्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली : विरोधी पक्षांनी मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केलीय. 'सध्या याची गरज नाही. सरकारनं आधी बेरोजगारी आणि महागाईवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. महागाई शिगेला पोहोचली असून बेरोजगारीची स्थिती कोणापासून लपून राहिलेली नाही', असं काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले. तर सरकारच्या संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याच्या निर्णयावर काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी टीका केली. 'विशेष अधिवेशन बोलवायचं असेल तर मग आधी विरोधकांना विश्वासात घ्या. ही हुकूमशाही आहे', असं रशीद अल्वी म्हणाले.

चर्चेतून निर्णय होईल : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी देखील या मुद्द्यावर मत व्यक्त केलं. 'एक राष्ट्र - एक निवडणूक संकल्पना विविध राजकीय पक्षांसमोर मांडणे आवश्यक आहे. त्यानंतर विचारविनिमय आणि चर्चा होईल. त्यानंतर निर्णय येईल', असं देसाई म्हणाले.

हेही वाचा :

  1. Special Session Of Parliament : मोदी सरकारनं बोलावलं संसदेचं विशेष अधिवेशन, 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान होणार पाच बैठका
Last Updated : Sep 1, 2023, 11:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details