महाराष्ट्र

maharashtra

पेंच व्याघ्र प्रकल्प आणि भारतातील इतर 13 व्याघ्र प्रकल्पांना जागतिक CA/TS दर्जा

By

Published : Aug 1, 2021, 7:47 AM IST

वाघांचे उत्तम संरक्षण आणि संवर्धन केल्याबद्दल देशातील 14 व्याघ्र प्रकल्पांना जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा (CA|TS) अशी मान्यता देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प 257.26 चौ.कि.मी क्षेत्रात विस्तारला आहे. व्याघ्रसंवर्धनासाठी इथे अत्यंत पोषक वातावरण असून त्याचा दर्जा अत्यंत उत्कृष्ट आहे.

Tiger
वाघ

नवी दिल्ली - उत्तम व्याघ्र संवर्धनासाठी महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प आणि भारतातील इतर 13 व्याघ्र प्रकल्पांना जागतिक CA/TS दर्जा मिळाला आहे. जागतिक व्याघ्रदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आभासी कार्यक्रमात केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी व्याघ्र संवर्धन हे वन संवर्धनाचेच प्रतीक असल्याचे मत व्यक्त केले.

वाघांचे उत्तम संरक्षण आणि संवर्धन केल्याबद्दल देशातील 14 व्याघ्र प्रकल्पांना जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा (CA|TS) अशी मान्यता देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा (CA|TS) ही संज्ञा दर्जा निश्चित करण्याचे एक साधन आहे. (CA|TS) निकषानुसार व्याघ्र प्रकल्पांमध्ये होणारे व्यवस्थापन संवर्धनासाठी पूरक आहे की नाही हे तपासले जाते. हे निकष हे निकष व्याघ्र तसेच संरक्षित प्रदेशाच्या तज्ञांनी ठरवले आहेत.

मानस, काझीरंगा आणि ओरांग (आसाम), सातपुडा, कान्हा आणि पन्ना (मध्यप्रदेश), पेंच (महाराष्ट्र) वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प (बिहार), दुधवा (उत्तरप्रदेश) सुंदरबन (पश्चिम बंगाल) पारंबीकुलम (केरळ) बंदिपूर व्याघ्र प्रकल्प (कर्नाटक) मदुमलाई आणि अन्नामलाई (तामीळनाडू) ही ती 14 व्याघ्र प्रकल्प आहेत.

पेंच व्याघ्र प्रकल्प-

पेंच नदीचे नाव या व्याघ्र प्रकल्पाला देण्यात आले आहे. हा व्याघ्र प्रकल्प पेंच नदीमुळे पूर्व पेंच आणि पश्चिम पेंच अशा दोन भागात विभागला गेला आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान हे भारतातील मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यांच्या सीमाभागात वसलेले राष्ट्रीय उद्यान आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र हे 22 नोव्हेंबर,1975 रोजी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले असून केंद्र शासनाने 18 फेब्रुवारी, 1999 रोजी भारतातील 25वा व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर केला. पेंच राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प 257.26 चौ.कि.मी क्षेत्रात विस्तारला आहे. व्याघ्रसंवर्धनासाठी इथे अत्यंत पोषक वातावरण असून त्याचा दर्जा अत्यंत उत्कृष्ट आहे.

वाघांसाठी भारत जगभरातील सर्वात सुरक्षित ठिकाणापैकी एक -

जगातील एकूण वाघांच्या संख्येपैकी 70 टक्के वाघ हे भारतात आहेत. यासोबतच, देशात 30 हजारांहून अधिक हत्ती, तीन हजार एकशिंगी गेंडे आणि 500हून अधिक सिंह आहेत. 2010 साली भारतात 1706 वाघ होते. तर, 2014 साली वाघांची 2226 वर पोहचली होती. ऑल इंडिया एस्टीमेशन, 2018 च्या अहवालानुसार 2014 च्या तुलनेत भारतामध्ये 741 वाघ वाढले आहेत. सध्या देशभरात 2 हजार 967 वाघ आहेत. भारतात 2014 साली वाघांसाठी आरक्षित विभागाची संख्या 692 होती. 2019 पर्यंत याची संख्या वाढवून 860 करण्यात आली आहे. जवळपास 3 हजार वाघांच्या संख्येसह भारत जगभरात सर्वात सुरक्षित ठिकाणापैकी एक आहे.

दर चार वर्षांनी व्याघ्र गणना -

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला लाखाच्या आसपास असणारी वाघांची संख्या सत्तरच्या दशकात हजारांच्या घरात आली होती. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुढाकाराने देशात वाघांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी 1973-74 मध्ये व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आले. त्याअंतर्गत देशात सुरुवातीला 9 व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आले. मेळघाट हा त्यापैकी सुरू होणारा राज्यातला पहिला व्याघ्र प्रकल्प होता. सध्या देशात 50 व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यापैकी सर्वाधिक 6 व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रात येतात हे विशेष. भारतीय वन्यजीव संस्था, डेहरादून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्तविद्यमाने देशात दर चार वर्षांनी व्याघ्र गणना होते.

ABOUT THE AUTHOR

...view details