महाराष्ट्र

maharashtra

Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी; मृतांचा अधिकृत आकडा 275 वर

By

Published : Jun 4, 2023, 9:42 PM IST

ओडिशामधील तिहेरी रेल्वे अपघाताची आता सीबीआयमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. रेल्वे अपघातात आतापर्यंत 275 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती रेल्वे बोर्डाने दिली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

भुवनेश्वर(ओडिशा) -ओडिशा रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी करणार आहे. रेल्वे बोर्डाने या चौकशीची शिफारस केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. शुक्रवारी झालेल्या रेल्वे अपघातात 275 जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: शनिवारी अपघातस्थळी पोहोचले होते.

घटनेची सीबीआयमार्फत चौकशी - ओडिशा रेल्वे अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी केली. रेल्वे बोर्डाने या चौकशीची शिफारस केल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. अपघाताबाबत रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, दोन ट्रॅक मोकळे करण्यात आले आहेत. साइड ट्रॅकचे काम सुरू आहे. अपघातात जखमी झालेल्या सर्वांवर योग्य उपचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मृत प्रवाशांच्या कुटुंबीयांशी रेल्वे प्रशासन संपर्क साधत आहे, असेही रेल्वे मंत्री म्हणाले.

मृतांची संख्या 275 - ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २८८ नव्हे तर २७५ आहे. रेल्वे बोर्डाच्या सदस्य जया वर्मा यांनी रविवारी ही माहिती दिली आहे. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनीही याला दुजोरा दिला आहे. जेना यांनी सांगितले की, काही मृतदेहांची दोनदा मोजणी करण्यात आली होती. जखमींची संख्या 1175 आहे. त्यापैकी 793 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रेल्वे बोर्डाची प्रतिक्रिया - रेल्वे बोर्डाने सांगितले की, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टममध्ये बदल झाल्यामुळे हा अपघात झाला. जया वर्मा यांनी अपघाताबाबत आणखी काही माहिती दिली. मालगाडीत लोखंड ठेवले होते, त्यामुळे ते खूप जड असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार मालगाडी इतकी जड होती की बोगी रुळावरून घसरली नाही. या अपघातात अधिकचे बळी कोरोमंडल एक्स्प्रेसमधील असल्याचेही जया वर्मा यांनी सांगितले. त्यांच्या मते, टक्कर झाली तेव्हा कोरोमंडल ताशी 128 किलोमीटर वेगाने धावत होती. ओव्हरस्पीडिंगमुळे हा अपघात झाला का, असे रेल्वे बोर्डाला विचारले असता जया वर्मा म्हणाल्या की, तसे नाही. बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस ताशी 126 किलोमीटर वेगाने येत होती.

कसा घडला अपघात - ओडिशातील बहंगा बाजार स्टेशनच्या बाह्य मार्गावर (लूप लाइन) एक मालगाडी उभी होती. त्यात लोखंडाचा भार होता. हावडाहून चेन्नईकडे येणारी कोरोमंडल एक्स्प्रेस अचानक रुळावरून घसरली. त्यातील काही बोगी मालगाडीला धडकल्या. इंजिन मालगाडीवर चढले. काही बोगी तिसऱ्या ट्रॅकवर वळल्या. बेंगळुरू-हावडा एक्सप्रेस तिसऱ्या ट्रॅकवर आली आणि कोरोमंडल एक्सप्रेसला धडकली.

मदतकार्य वेळेवर पोहचले -अपघातानंतर सुमारे 20 मिनिटांनी बचावकार्य सुरू झाले. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी आपापल्या स्तरावरून मदत सुरू केली होती. राज्य प्रशासनापासून एनडीआरएफपर्यंतचे पथक बचाव कार्यात गुंतले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः घटनास्थळी पोहोचले. तसेच जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले. घटनास्थळी अन्य पक्षांच्या नेत्यांच्या हालचालीही सुरू होत्या. बचावकार्य पूर्ण होईपर्यंत रेल्वेमंत्री तिथे उपस्थित होते.

काँग्रेसने उपस्थित केला गंभीर प्रश्न- मोदी सरकारचा कारभार एखाद्या 'ड्रामा'सारखा असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी सांगितले. ते म्हणाले की, रेल्वेत तीन लाख पदे रिक्त आहेत. खरगे यांच्या म्हणण्यानुसार, रेल्वे बोर्डाने स्वत: लोको पायलटच्या समस्या मांडल्या आहेत, मात्र त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांना जास्त तास काम करावे लागते, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. संसदीय स्थायी समितीच्या ३२३व्या अहवालाचाही खरगे यांनी संदर्भ दिला. रेल्वे सुरक्षा आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा आग्रह धरला होता. खरगे यांच्या म्हणण्यानुसार याकडेही रेल्वेने दुर्लक्ष केले. कॅगने 2017-18 आणि 2020-21 दरम्यान झालेल्या अपघातांचा संदर्भ देत म्हटले आहे की, यातील बहुतांश घटना रुळावरून घसरल्यामुळे घडल्या आहेत. कॅगच्या म्हणण्यानुसार, नॅशनल रेल सेफ्टी फंडमध्ये केवळ 79 टक्के निधी देण्यात आला. ट्रॅक अपडेटची गती खूप कमी आहे. आतापर्यंत केवळ चार टक्के मार्गांवर कवच प्रणाली का लागू करण्यात आली, असा सवालही खरगे यांनी केला. प्रियांका गांधी यांनीही कॅगच्या अहवालाच्या आधारे सरकारला प्रश्न विचारले आहेत.

हेही वाचा -

  1. Odisha Train Accident : रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर; पंतप्रधानांनी घेतला आढावा
  2. Odisha Train Accident : तीन नाही तर एकाच ट्रेनचा झाला अपघात; रेल्वे बोर्डाची महत्वाची माहिती
  3. Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघात; मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू, भुवनेश्वरमधील एम्समध्ये ठेवण्यात येणार 100 मृतदेह

ABOUT THE AUTHOR

...view details