ETV Bharat / politics

राहुल गांधींचा थेट फोन अन् शेवटच्या क्षणी ट्विस्ट! राहुल बोंद्रे यांचा भाजपा प्रवेश रद्द? बुलढाणात खळबळ

काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे हे भाजपात जाणार हे निश्चित झालं होतं. मात्र, अचानक राहुल गांधी यांचा फोन आला अन् समीकरणच पालटलं.

rahul gandhi call Rahul Bondre
माजी आमदार राहुल बोंद्रे आणि राहुल गांधी (File Photo - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : September 22, 2026 at 8:01 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

बुलढाणा - चिखली-बुलढाणाच्या राजकीय पटावर एक मोठा धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा 22 सप्टेंबरला होणारा भाजपा प्रवेश अचानक थांबला आहे. कारण काय? थेट राहुल गांधींचा फोन!

गेल्या दोन दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात एकच चर्चा होती, राहुल बोंद्रे भाजपामध्ये जाणार. स्वतः बोंद्रे यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. “मी आता भाजपामध्ये जात आहे,” असे त्यांनी जाहीर केले होते. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार, अशी माहितीही जोरात पसरली होती. बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष याच कार्यक्रमाकडे लागले होते. अनेकांना वाटत होते की आता बोंद्रे भाजपाचे झाले.

राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही निश्चित नसते, याची पुन्हा एकदा प्रचिती आली. ऐनवेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचताच पक्षात मोठ्या हालचाली सुरू झाल्या, आणि मग आला तो थेट फोन... राहुल गांधी यांचा!

झालेल्या या फोच्या संभाषणात राहुल गांधींनी बोंद्रे यांना थेट आवाहन केले की, “काँग्रेस सोडू नका. पक्षाच्या लढाईत आम्ही तुमच्यासोबत आहोत.”

या एका वाक्याने सारे काही बदलले. बोंद्रे यांना जुन्या संबंधांची आठवण झाली. ते भावूक झाले आणि ठामपणे म्हणाले, “माझे सर्व काही गेले तरी चालेल; मात्र काँग्रेस सोडणार नाही. मी तुमच्यासोबत राहीन.”

या फोनमुळे संपूर्ण चित्रच उलटे झाले. आता 22 सप्टेंबरचा प्रवेश रद्द झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अधिकृत पुष्टी अद्याप आलेली नसली तरी बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि मतदार यांना आश्चर्य वाटत आहे.
आता सर्वांना एकच प्रश्न पडला आहे, बोंद्रे भाजपमध्ये जाणार की पुन्हा काँग्रेससोबतच राहणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.