ETV Bharat / state

नागपूर-पुण्याचं अंतर 'इतक्या' तासात होणार पूर्ण; छत्रपती संभाजीनगर-पुणे सहा पदरी महामार्गाच्या करारावर स्वाक्षऱ्या

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 10:57 AM IST

Updated : Mar 9, 2024, 12:25 PM IST

Pune Chhatrapati Sambhajinagar Expressway : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दोन महानगरादरम्यान नवीन एक्सप्रेस वे निर्मिती बाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. यामुळं आता नागपूर ते पुण्याचं अंतर सहा तासात पूर्ण होणार आहे, असा दावा यावेळी करण्यात आला आहे.

नागपूर-पुण्याचं अंतर सहा तासात होणार पूर्ण; छत्रपती संभाजीनगर-पुणे सहा पदरी महामार्गाच्या करारावर स्वाक्षऱ्या
नागपूर-पुण्याचं अंतर सहा तासात होणार पूर्ण; छत्रपती संभाजीनगर-पुणे सहा पदरी महामार्गाच्या करारावर स्वाक्षऱ्या

नागपूर Pune Chhatrapati Sambhajinagar Expressway : समृद्धी महामार्गाच्या यशस्वी निर्मितीनंतर नागपूर इथून मुंबई इथं पोहोचणं सुखद आणि जलद झालंय. समृद्धी महामार्गानं नागपूरहून संभाजीनगरला अवघ्या चार तासात जाता येते. मात्र, संभाजीनगर इथून पुणे इथं पोहोचणं अधिक आव्हानात्मक झालंय. यामुळं संभाजीनगर ते पुणे या सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नव्या महामार्गाची नितांत गरज होती. ही गरज ओळखून आता पुणे ते छत्रपती संभाजीनगर या 230 किलोमीटर सहा पदरी ग्रीन फिल्ड एक्सप्रेसची निर्मिती करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आलाय.


सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दोन महानगरादरम्यान नवीन एक्सप्रेस वे निर्मिती बाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हा करार सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारच्या रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयासमवेत एक्सप्रेस वे बाबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, मुख्य अभियंता डी. एन. नंदनवार, उपसचिव मयुर गोवेकर उपस्थित होते.

भूसंपादन प्रक्रिया पूर्णत्वास -देवेंद्र फडणवीस : "पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दोन शहरांना जोडणारा नवीन एक्सप्रेस वे मराठवाड्यातील दृष्काळग्रस्त भाग असलेल्या बीड जिल्ह्यातील काही गावांना जोडून जाणार आहे. दृष्काळग्रस्त भागाला विकासाच्या नवीन वाटा याद्वारे मिळणार आहे," असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. "हा महामार्ग पुणे येथील रिंग रोडला जाऊन मिळेल. पुणे येथील ज्या ठिकाणी रिंग रोडला हा रस्ता मिळणार आहे, त्या रिंग रोडसाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्णत्वास आलीय. पुण्यातील रिंग रोडही एक्सप्रेसवेचं काम पूर्ण होईपर्यंत पूर्णत: तयार असेल," असंही त्यांनी सांगितलं. "समृद्धी महामार्ग आता आपण गोंदिया, चंद्रपूरपर्यंत नेत आहोत. नागपूर-गोवा महामार्गाला गती दिली असून या कामासंदर्भात आवश्यक त्या नोटीस काढल्या आहेत. महाराष्ट्रातला प्रत्येक भाग महामार्गाच्या जाळ्याशी जोडला गेला पाहिजे ही आमची भूमिका असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भक्कम साथ आहे," असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.


मी स्वतः वाहतूक कोंडी अनुभवली - नितीन गडकरी : "पुणे ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गावर वाहनांची वर्दळ ही अनेक पटीनं वाढलीय. काही दिवसापूर्वी मी स्वत: अहमदनगर ते संभाजीनगर मार्गावरील ही कोंडी अनुभवली," असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलंय. "या दोन्ही महानगरांना जलद गतीनं जोडणाऱ्या नवीन एक्सप्रेसवेची नितांत गरज होती. त्यादृष्टिनेच महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची निर्मिती आपण केल्याचही ते म्हणाले. तसंच सध्या असलेल्या मार्गालाही चांगलं करण्याची गरज असून लवकरच हे काम पूर्ण केले जाईल," असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केलाय. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत व पूर्व पश्चिम भागांनाही जोडणारं महामार्गाचं जाळं आपण निर्माण केलंय. हा नवीन एक्सप्रेसवे मराठवाड्यातील काही भागाला कवेत घेऊन दक्षिण ते उत्तर दिशाशी जोडला जाईल," असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. नागपूर मतदारसंघात कोण मारणार बाजी? 'ही' आहेत राजकीय समीकरणे
  2. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची राजस्थानात मोठी घोषणा; जयपूर ते दिल्ली दरम्यान धावणार इलेक्ट्रिकल केबल बस
Last Updated : Mar 9, 2024, 12:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.