ETV Bharat / state

२४ दिवसांच्या उपचारानंतर महेश गायकवाड ठणठणीत, कार्यकर्त्यांच्या गराड्यात पोहोचले घरी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 26, 2024, 9:29 PM IST

Mahesh Gaikwad Discharged : अगदी पोलीस ठाण्यातच भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात कल्याण पूर्व भागातील शिंदे गटाचे शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड जखमी झाले होते. ते तब्बल २४ दिवसांच्या उपचारानंतर ठणठणीत होऊन पत्नी आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात आज (26 फेब्रुवारी) कल्याण पूर्व तिसगाव येथील निवासस्थानी पोहचले.

Mahesh Gaikwad Discharged
महेश गायकवाड घरी परतताना

महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

ठाणे Mahesh Gaikwad Discharged : महेश गायकवाड यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारपासून त्यांचे समर्थक, कार्यकर्ते महेश यांचे स्वागत करण्यासाठी जोरदार तयारी करत होते. ज्युपिटर रुग्णालयाबाहेर त्यांचे समर्थक, नातेवाईक आणि अर्धांगिनी पत्नी चिमुकल्यासह उपस्थित होते. तर महेश गायकवाड हे रुग्णालयाच्या बाहेर पडताच समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. ज्युपिटर रुग्णालयात महेश गायकवाड यांना घेण्यासाठी आलेल्या समर्थकांच्या गर्दीत पोलीस बंदोबस्तही तैनात केलेला पाहायला मिळाला. एखाद्या मंत्र्याप्रमाणे गाड्यांचा ताफा ज्युपिटर रुग्णालयाच्या आवारात होता. याच वाहनांच्या ताफ्यात महेश गायकवाड हे आपल्या कल्याण पूर्व तिसगाव येथील निवासस्थानी पोहोचले.

घोषणांच्या निनादात महेश गायकवाडांचे स्वागत: महेश गायकवाड यांचे कल्याण पूर्वेतील तिसगाव भागातील लोकांशी संवाद साधण्याचे कार्यालय, घराचे प्रवेशव्दार फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजविण्यात आलेले होते. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर महेश गायकवाड यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं. दुर्गाडी किल्ला ते कल्याण पूर्वेतील महेश गायकवाड यांच्या घरापर्यंत "वाघ आला रे वाघ आला", भावी आमदार, गरिबांचा कैवारी आल्याचे फलक समर्थकांनी सोबत आणल्याचं चित्र पाहायला मिळालं. सोमवारी संध्याकाळी त्यांच्या स्वागतासाठी ठाण्यात ज्युपिटर रुग्णालय आणि दुर्गाडी किल्ला येथे शेकडो समर्थक जमले होते. जनसंपर्क कार्यालयाबाहेर परिसरातील रहिवाशांनी तुंबळ गर्दी केली होती. दुर्गाडी किल्ला येथे महेश गायकवाड यांचे वाहनातून आगमन होताच फटाक्यांची आतिशबाजी, पुष्पवृष्टी करून, पुष्पगुच्छ देऊन महेश त्यांचे जोरदार घोषणांनी स्वागत करण्यात आलं.


असा प्रकार कोणासोबतही होऊ नये: महेश गायकवाड यांना डिस्चार्ज देताना त्यांच्या पत्नी रुग्णालयात उपस्थित होत्या. माझ्या पती सोबत झालेला प्रकार हा कोणाच्याही आयुष्यामध्ये होऊ नये. यासाठी कठोर शिक्षा शासनाने द्यावी अशी भावना त्यांनी व्यक्त केली. जर कठोर शिक्षा झाली तरच असे प्रकार थांबेल, असंही त्यांनी सांगितलं.

गणपत गायकवाडांवर टीका: भाजपाचे कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर शहरातील हिल लाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनात अचानक शिंदे गट शिवसेनेचे शहर प्रमुख यांच्यावर अंधाधूंद गोळीबार केला होता. या गोळीबारातून बचावलेल्या महेश यांना दोन महिन्याच्या उपचारानंतर रुग्णालयातून आज सोडण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता, "शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदाराच्या गोळ्या मी अंगावर झेलल्या आहेत. कल्याण पूर्व येथील विविध समस्यांचा पाठपुरावा मी करत होतो. प्रत्येक वेळेला आमदार गणपत गायकवाड अडचणी निर्माण करत होते. सामाजिक कामात नव्हे तर माझ्या व्यवसायातदेखील त्यांनी माझ्या भागीदारांसमोर अनेक अडचणी निर्माण केल्या आहे. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधून त्यांना सगळा प्रकार सांगितला. प्रत्येक वेळी त्यांनी माझी समजूत काढली. युतीत आहे असं सांगण्यात आलं.''


'ते' भाजपाचे कार्यकर्ता नाहीत: ''आमदार गणपत गायकवाड 2019 मध्ये संधी साधून भाजपामध्ये आले. ते भाजपाचे कार्यकर्ता नाहीत. भाजपाचे हे संस्कार नाहीत. माझा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आमदार गणपत गायकवाड यांना कठोर शिक्षा मिळेल. माझ्या आईचे, गोरगरिबांचे आशीर्वाद आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे आज मी तुमच्यासमोर उभा आहे. इथून पुढे आणखी जोमाने समाजसेवा करेन,'' असंदेखील महेश गायकवाड म्हणाले.

हेही वाचा:

  1. गलिच्छ कपडे परिधान केल्याबद्दल शेतकऱ्याला बंगळुरू मेट्रोत नाकारला प्रवेश, प्रशासनानं कर्मचाऱ्यावर केली कारवाई
  2. अन्न सुरक्षा आणि कृषी अनुदानाच्या मुद्द्यांवर भारताने कंबर कसली, जागतिक व्यापार संघटनेच्या बैठकीत मांडणार भूमिका
  3. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देवेंद्र फडणवीसांवरील आरोपांचा विषय गाजला!
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.