ETV Bharat / politics

'ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांचा पक्षच काढून दुसऱ्याला दिला, देशात कधी असं घडलं नाही'; शरद पवार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 1:30 PM IST

Sharad Pawar in Baramati : पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शरद पवार आज पहिल्यांदाच बारामतीत आले होते. यावेळी त्यांनी पक्ष आणि चिन्ह गेल्याबाबत भाष्य केलं. तसंच हा निर्णय कायद्याला धरुन असल्याचं वाटत नाही, असंही पवार म्हणाले.

Sharad Pawar in Baramati
Sharad Pawar in Baramati

शरद पवार

बारामती Sharad Pawar in Baramati : पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज पहिल्यांदाच बारामतीत आले होते. शरद पवार यांच्या बारामती इथल्या गोविंदबाग या निवासस्थानी माढा मतदारसंघातील मैत्री फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षांसह असंख्य कार्यकर्त्यांनी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांनी पक्ष आणि पक्ष चिन्ह गेल्याबाबत भाष्य केलं.


देशात असं कधीच घडलं नाही : गोविंदबाग इथं बोलताना शरद पवार पक्ष आणि चिन्ह गेल्याबाबत म्हणाले की, "राजकारणामध्ये पक्ष उभे राहतात, पक्ष सोडून जातात ही प्रक्रिया चालू राहते. मात्र, देशामध्ये असं कधीच घडलं नाही की ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांचा पक्षच काढून दुसऱ्याला दिला. नुसता पक्षच दिला नाही तर, चिन्ह सुद्धा दिलं." तसंच हा निर्णय कायद्याला धरुन आहे, असं वाटत नाही असंही शरद पवार यावेळी म्हणाले. या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून त्याचा निकाल लवकर लागेल अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केलीय.


आतापर्यंत 14 निवडणुका लढलो : पुढं बोलताना शरद पवार म्हणाले, "दुसरी गोष्ट म्हणजे राजकारणात खूण किंवा चिन्ह गेल्यानं फारशी चिंता करण्याची आवश्यकता नाही. मी आतापर्यंत 14 निवडणुका लढलो. त्यापैकी पाच निवडणुका आशा होत्या की, त्यात चिन्ह वेगळे होते. एका निवडणुकीत बैल जोडी नंतर गाय वासरु नंतर चरखा हात आणि मग घड्याळ हे वेगवेगळे चिन्ह राज्यात आणि देशात आपण पाहिले आहेत. त्यामुळं कोणाला असं वाटत असेल की, एकदा संघटनेचं चिन्ह आपण काढून घेतलं तर त्या संघटनेचं अस्तित्व संपेल असं कधी होत नसतं."

माढा मतदारसंघाच्या उमेदवाराचा निर्णय लवकरच : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माढा मतदारसंघाच्या उमेदवाराबाबत बोलताना पवार म्हणाले, "तुम्ही ज्या मतदारसंघातून काम करता त्या मतदारसंघातून मला तुम्ही निवडून दिलंय. तो मतदारसंघ मला चांगला ठाऊक आहे. तुम्ही एकजुटीनं आपली शक्ती पणाला लावली तर अनुकूल अशा प्रकारचा निकाल आपण या मतदारसंघातून देऊ. येत्या काही दिवसांमध्ये माढा मतदारसंघात कोण उमेदवार द्यायचा यासंबंधीचा निर्णय लवकरच होईल."

हेही वाचा :

  1. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फूट आव्हाड यांनी केली, धनंजय मुंडे यांचा आरोप
  2. "बारामतीत आमच्या उमेदवाराला विजयी करा, अन्यथा मी...", अजित पवारांचा कार्यकर्त्यांना अल्टिमेटम
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.