ETV Bharat / politics

पंतप्रधान मोदींच्या लेखणीची किंमत २५ लाख; संजय राऊतांनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 22, 2024, 11:55 AM IST

Sanjay Raut Slams On PM Modi : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी भाजपा नेत्यांना साधेपणानं राहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) श्रीमंती थाटाकडे बोट दाखवत टीका केलीय.

Sanjay Raut Slams On PM Modi
संजय राऊत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई Sanjay Raut Slams On PM Modi : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा (JP Nadda) बुधवारपासून दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. जे. पी नड्डा यांनी साधेपणानं जगा, महागड्या गाड्या, महागडी घड्याळं वापरू नका. सामान्य माणसात जाताना श्रीमंतीचा थाट दाखवू नका, असं आवाहन जे. पी नड्डा यांनी मुंबई दौऱ्यामध्ये केलं होतं. यावर संजय राऊतांनी टीका केलीय. 100 टक्के भाजपाकडं महागडी घड्याळ आहेत. 90 टक्के भाजपा नेते परदेशी गाड्यांतून फिरतात. मोदींच्या हातातील घड्याळाची किंमत किती? घड्याळ वापरणं गुन्हा नाही. कदाचित त्यांना घड्याळांची भीती वाटत असेल. म्हणून पवारांचं घड्याळ काढून घेतलं, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

पंतप्रधान मोदी यांच्या खिशाला २५ लाखांचं पेन : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला की, सामान्य जनतेत जाताना साधी राहणी ठेवा. महागडी घड्याळे आणि गाड्यांचा वापर करु नका. पण जे.पी. नड्डांचा हा सल्ला पंतप्रधान मोदींना लागू होतो. पंतप्रधान मोदी खिशाला पेन लावतात ते 25 लाखांचं आहे. त्यांचा सूट 15 लाखांचा आहे. हा मोदींचा सगळा थाट श्रीमंतीचा आहे. गेल्या 70 वर्षांमध्ये देशाच्या कोणत्याही पंतप्रधानाने इतकी श्रीमंती उपभोगली नव्हती, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत? : याप्रकरणी बोलताना राऊत म्हणाले की, "जे.पी नड्डा यांना माझं आव्हान आहे. चंदीगडच्या निकालावरती बोला. भाजपा देशातील निवडणुका कशा प्रकारे जिंकत आहे. हे चंदीगडच्या महापौर निवडणुकीनं दाखवून दिलं आहे. सुप्रीम कोर्टानं तुमचं एवढं वस्त्रहरण करून सुद्धा तुमचा खोटारडेपणा, तुमच्या चोऱ्या, लबाड्या उघड्या केल्या असूनही 370 पारच्या घोषणा देत आहेत, ही लोकशाहीची थट्टा आहे. तुम्ही अगोदर यंत्रणा ताब्यात घेतल्या आहेत. ते आम्ही होऊ देणार नाही," असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिलाय.

खोक्याचं राजकारण बरोबर चालू आहे : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातकडे वळले जात आहे. उद्या मुंबईसुद्धा गुजरातला देतील. 'महानंदा'चे चेअरमन कोण होते. राधाकृष्ण विखे पाटील यांचे सख्खे मेहुणे. 'महानंदा'चे शेकडो कर्मचारी आहेत. काय केले विखे पाटील यांच्या पाहुण्यांनी? तुम्ही महाराष्ट्र सरकारची डेअरी चालू शकत नाही, खोक्याचं राजकारण बरोबर चालू आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केलीय.

हेही वाचा -

  1. जागा वाटपाचा तिढा सुटला? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जे पी नड्डा यांच्यात 'वर्षा'वर तासभर चर्चा
  2. भ्रष्टाचारी नेत्यांचा गट म्हणजे 'इंडिया' आघाडी; जे पी नड्डांचा हल्लाबोल
  3. "भाजपाला केवळ 150 जागा जिंकण्याचा अंदाज म्हणून पक्ष फोडण्याचं काम सुरू; प्रकाश आंबेडकरांची टीका
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.