ETV Bharat / politics

'इंडिया'तून नितीश कुमार बाहेर पडल्यानंतर महाविकास आघाडीची आज बैठक, निश्चित होणार का जागावाटपाचा फॉर्म्युला?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 30, 2024, 9:35 AM IST

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत जागावाटप अंतिम करण्यासाठी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक आज दुपारी मुंबईत होत आहे. या बैठकीला तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हेसुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

MVA Meet today
MVA Meet today

मुंबई - अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीची धामधूम देशभर सुरू असताना महाराष्ट्रातही महाविकास आघाडीची जागा वाटपा संदर्भातील चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. इंडिया आघाडीतील मुख्य घटक असलेले संयुक्त जनता दला प्रमुख तथा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेच इंडिया आघाडीतून बाहेर पडल्याने देशात भाजपा व त्यांच्या समर्थकांच्या विरोधात उभी झालेली इंडिया आघाडीत 'बिघाडी' झाली आहे.

इंडिया आघाडीची बाजू कमकुवत झाली तरी राज्यात महाविकास आघाडी मजबूत करून भाजपाला टक्कर देण्याची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या अनुषंगानं आज महाविकास आघाडीच्या जागा वाटपा संदर्भातील महत्त्वाची बैठक दुपारी २ वाजता मुंबईतील हॉटेल ट्रायडेंट येथे होत आहे. विशेष म्हणजे या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हेसुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर हे उपस्थित राहणार आहेत. प्रकाश आंबेडकर आज वाशिमच्या दौऱ्यावर असल्याची माहिती मिळत आहे.



आज अंतिम फॉर्म्युला ठरणार?- २५ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली होती. त्या बैठकीत प्रकाश आंबेडकर हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सामील झाले होते. परंतु राजू शेट्टी हे त्या बैठकीला उपस्थित नव्हते. आजच्या बैठकीत महत्त्वाच्या जागांबाबत चर्चा होऊन अंतिम फार्म्युला ठरवला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे गट हा मुंबईत लोकसभेच्या ४ जागा लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झालं आहे. यामध्ये दक्षिण मुंबई, दक्षिण - मध्य मुंबई, ईशान्य मुंबई आणि उत्तर - पश्चिम मुंबई यांचा समावेश आहे.


प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांची साथ- प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी अकोला मतदारसंघ सोडला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यासोबत वंचित बहुजन आघाडीला अजून एक जागा दिली जाऊ शकते. त्याचप्रमाणं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना हातकणंगलेची जागा दिली जाऊ शकते. शेतकरी नेते शेट्टी यांना पाठिंबा देण्याबाबत मागील बैठकीतच चर्चा झाली होती.



सध्याच्या परिस्थितीत जास्त वाद नको- मागील बैठकीत जागावाटपावर सीपीआयकडून २ जागांची मागणी करण्यात आली होती. त्यांना शिर्डी तसेच परभणीची जागा हवी आहे. यावरही आज अंतिम चर्चा होईल. जागावाटपाबाबत ठाकरे गट एक क्रमांकवर असेल. दुसऱ्या क्रमांकाला काँग्रेस आणि तिसऱ्या क्रमांकाला राष्ट्रवादी असेल, अशी जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची रचना असणार आहे. २५ जानेवारीला झालेल्या बैठकीनंतर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत म्हणाले होते की, ३० जानेवारीला होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

एकमेकांना साभांळून घेण्याचा प्रयत्न- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे कुठेही जाणार नसून ते आमच्या सोबत असल्याचेसुद्धा त्यांनी तेव्हा सांगितलं होतं.ज्या पद्धतीने नितीश कुमार यांनी पलटी मारली आहे. त्या अनुषंगानं आजच्या बैठकीत जागा वाटपा संदर्भात जास्त रस्सीखेच न करता एकमेकांना सांभाळून घेण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आहे. कारण जागा वाटपाबाबत आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नसून आम्हाला सर्व जागा जिंकून आणणं महत्त्वाचं आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा-

  1. 'वंचित' महाविकास आघाडीसोबत; 48 जागांवर एकत्र लढण्याचा निर्धार, पुढील बैठक 30 जानेवारीला
  2. आघाडी केली तरच वाचाल, अन्यथा जेलमध्ये जाताल; प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला इशारा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.