ETV Bharat / politics

कुंभनगरी नाशिकमध्ये चार अध्यात्मिक गुरु लोकसभेच्या आखाड्यात; तिघांना लढायचं भाजपाच्या तिकीटावर - lok sabha election

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 1, 2024, 12:18 PM IST

Updated : May 1, 2024, 2:06 PM IST

Nashik Lok Sabha Constituency : कुंभनगरी नाशिकमध्ये यंदा लोकसभा निवडणुकीत अध्यात्मिक गुरुंनी उडी घेतली आहे. यंदा नाशिकच्या निवडणुकीत चार अध्यात्मिक गुरु आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Nashik Lok Sabha Constituency
कुंभनगरी नाशिकमध्ये चार आध्यत्मिक गुरु लोकसभेच्या आखाड्यात; तिघांना लढयाचंय भापाच्या तिकीटावर

नाशिक Nashik Lok Sabha Constituency : कुंभनगरी नाशिकमध्ये यंदा लोकसभा निवडणुकीत अध्यात्मिक गुरुंनी उडी घेतली असून यंदा नाशिकच्या निवडणुकीत अध्यात्मिक आखाडा बघायला मिळणार आहे. यात काही आध्यात्मिक गुरूंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर काहींनी उमेदवारी अर्जाची खरेदी केलीय.

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात राजकीय पक्षांमधील दावेदारांबरोबरच अनेक अध्यात्मिक गुरु देखील यंदा इच्छुक आहेत. बहुतांश इच्छुकांनी प्रचार आणि वरिष्ठ पातळीवर लॉबिंग सुरु केलीय. काहींना पक्षाच्या उमेदवारीची प्रतीक्षा असली, तरी काही अध्यात्मिक गुरुंनी स्वतंत्र उमेदवारीच्या दृष्टीनं प्रचारात आघाडी घेतलीय. यात अध्यात्मिक गुरु शांतिगिरी महाराज, स्वामी श्री कंठानंद, सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज आणि महंत अनिकेत शास्त्री महाराज यांचा समावेश आहे.

शांतिगिरी महाराज यांनी भरला उमेदवारी अर्ज : यंदाची नाशिक लोकसभा निवडणूक चांगलीच परीक्षा बघणारी ठरलीय. महायुतीत मतदार संघ कोणत्या पक्षाला सुटणार याबाबत रस्सीखेच सुरु आहे. यात अनेक ट्विस्ट बघायला मिळत आहे. रोज नवनवीन नावे समोर येत आहेत. अशातच 29 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीबाबत मोठा ट्विस्ट बघायला मिळाला. स्वामी शांतिगिरी महाराज यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला. मात्र हा अर्ज भरताना त्यांनी शिवसेना नावानं भरल्यानं राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आलंय. याबाबत महायुतीतर्फे व शिंदे गटातर्फे नाशिक लोकसभेसाठी कुठलाही अधिकृत उमेदवार अजूनही घोषित करण्यात आलेला नसताना स्वामी शांतिगिरी महाराज यांनी शिवसेनेच्या नावानं अर्ज भरल्यानं राजकीय तज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत. जय बाबाजी भक्त परिवाराचे सर्वेसर्वा 1008 स्वामी श्री शांतिगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी टाकण्यापूर्वी महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांची भेट घेतली होती. यादरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांची देखील भेट घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र काही कारणामुळं ही भेट होऊ शकली नाही. यादरम्यान स्वामी शांतिगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली. मात्र महायुतीतील रस्सीखेच आणि महाविकास आघाडी कडून ठाकरे गटाचे सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी बहाल करण्यात आली, हे बघता महाराजांनी काही दिवसांपूर्वीच प्रचाराला सुरवात केली.

भाजपाकडून उमेदवारी करण्याची इच्छा : स्वामी श्रीकंठानंद यांना भाजपाकडून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा आहे. आपण स्वामी विवेकानंद यांची त्याग आणि सेवा ही मूल्य अंगीकारली आहेत. याच मूल्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पालन करत आहेत. आपण त्यांच्या मार्गावर चालणार आहोत. निस्वार्थी वृत्तीनं सेवा कार्य यापुढं सुरु राहील, असं स्वामी श्री कंठानंद यांनी सांगितलं. श्री रामकृष्ण आरोग्य संस्थेच्या माध्यमातून स्वामी श्रीकंठानंद कार्य करत असून व्याख्यान व प्रवचनं देताना त्यांनी फिरता दवाखाना, कौशल्य प्रशिक्षण केंद्र, महिला सक्षमीकरण केंद्र आणि कुपोषण निर्मूलनासाठी उपक्रम राबवले आहेत.

भाजपा नाही तर अपक्ष उमेदवारी दाखल करणार : स्वामी सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांना देखील भाजपाकडून उमेदवारीची अपेक्षा आहे. मात्र भाजपाकडून उमेदवारी मिळाली नाही, तर अपक्ष उमेदवारी करणार असल्याचा निर्धार त्यांनी केलाय. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत, शिक्षण आणि आरोग्य सेवा मिळाव्यात या साठी ते निवडणूक रिंगणात उतरल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असून ती ठिकाणी ते मतदारांच्या भेटी घेत आहेत रंजल्या गांजल्यांची सेवा करावी, यासाठी त्र्यंबकेश्वर, इगतपुरी भागात अनेक वर्षापासून निस्वार्थी वृत्तीने काम करीत असल्याचं महंत सिद्धेश्वरानंद यांनी सांगितलंय. ते स्वामी सोमेश्वरानंदजी सरस्वती महाराज यांचे शिष्य आहेत. ब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संस्था, श्रीराम शक्तिपीठ संस्थान अशा विविध संस्थांवर त्यांनी पदं भूषवली आहेत.

भाजपाकडून उमेदवारीसाठी प्रयत्न : आपण भाजपाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क सुरु आहे. एक-दोन दिवसात या संदर्भात निर्णय अपेक्षित असल्याचं महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी सांगितलं. भाजपा पक्ष श्रेष्ठींच्या सांगण्यानुसार आपण उमेदवारी अर्ज घेतल्याचंही महंत देशपांडे यांनी सांगितलं. हनुमानाचं जन्मस्थान असलेल्या अंजनेरी पर्वतावर शास्त्रार्थ सभा, महाआरतींसारखे उपक्रम राबवले आहेत. शिवाय गोशाळा, संस्कृत वेद पाठशाळा अशा माध्यमातून त्यांनी कार्य केलंय.



हेही वाचा :

  1. पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रात सभा; अन्य राज्यातून प्रतिसाद नसल्यानं मोदींचं महाराष्ट्रावर लक्ष... - PM Modi Campaign
Last Updated : May 1, 2024, 2:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.