ETV Bharat / entertainment

चित्रपटाची कमाई किती होईल असा विचार मनात येत नाही : परेश मोकाशी! - Paresh Mokashi

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 29, 2024, 4:59 PM IST

Paresh Mokashi
परेश मोकाशी

PARESH MOKASHI : परेश मोकाशी यांनी एका मुलाखतीत त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल भाष्य केलं आहे. त्यांचा बहुप्रतीक्षित नाच गं घुमा हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित होत असून याबद्दल त्यांनी काही विशेष गोष्टी शेअर केल्या आहेत.

मुंबई - PARESH MOKASHI : परेश मोकाशी यांचा ट्रॅक रेकॉर्ड खूपच चांगला आहे. याआधीचा त्यांचा 'वाळवी' हा चित्रपट सुपरहिट होता. मराठी चित्रपटालाही चांगला प्रेक्षकवर्ग मिळू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं आहे. त्यांच्या कामाची पद्धत अनोखी असून प्रयेक गोष्टीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघून ती कशी मांडायची जेणेकरून प्रेक्षकांना ती भावेल यात ते माहीर आहेत. परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा’ नावाचा नवीन सिनेमा येऊ घातलाय. त्याबाबत आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांनी परेश मोकाशी यांच्याशी संवाद साधला.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

मराठी चित्रपटालाही चांगली प्रेक्षकसंख्या मिळू शकते हे तुमच्या 'वाळवी'च्या यशानं सिद्ध केलं. तुम्ही एकप्रकारे क्रांती घडवून आणली आहे. त्यावर तुमचा दृष्टीकोन काय आहे?

क्रांती वगैरे काही नाही. मी माझा चित्रपट जास्तीतजास्त रिलेटेबल ठेवण्याचा प्रयत्न करतो. जी गोष्ट माझ्या हातात नाही, म्हणजे बॉक्स ऑफिस कलेक्शन वगैरे यावर मी भिस्त ठेवत नाही. चित्रपट बघायला किती प्रेक्षक किंवा केवढी गर्दी होईल अथवा बॉक्स ऑफिसवर किती दिवस चालेल याचा विचार करून मी कधीही चित्रपट केलेला नाही. माझा दृष्टीकोन असा असतो की ते चित्रपट म्हणून चांगले असावे. मी माझं काम प्रामाणिकपणे आणि तन्मयतेनं करीत असतो. चित्रपटाची कमाई किती होईल असा विचार माझ्या मनात कधीही येत नाही.

‘नाच गं घुमा’ हे एक अप्रतिम शीर्षक आहे. त्याचा विचार कसा झाला ते सांगू शकाल?

हे नाव माझ्या प्रिय पत्नीनं दिलेलं शीर्षक आहे. खरं सांगायचं तर हा विषय बऱ्याच काळापासून आमच्या मनात घोळत होता. परंतु त्याचे कथानक अथवा पात्रे समोर नव्हती. मध्यंतरीच्या काळात 'वाळवी' आणि 'आत्मपॅम्प्लेट' हे चित्रपट तयार झाले. अचानक आमच्या डोक्यात एक कल्पना चमकली आणि त्यावर आम्ही लिखाण सुरु केले. ते लिखाणदेखील इतके वेगाने झाले की ते स्टार्ट टू फिनिश होते. तो चित्रपट म्हणजे 'नाच गं घुमा’.

मधुगंधा आणि तुम्ही मिळून याचे लिखाण केले आहे. त्यात 'तू स्त्रियांचा आणि मी पुरुषांचा' दृष्टिकोन मांडेन अशी काही वर्गवारी केली होती का?

नाही. तसं काहीही ठरविलं नव्हतं. परंतु मी पुरुष आहे याचा अर्थ असा नाही की मी फक्त पुरुषांचे अनुभव चित्रपटात लिहिले आहेत. महिलांशी संबंधित काही घटना मी लिहिल्या आहेत आणि मधुगंधानं पुरुषांच्या दृष्टिकोनातून देखील जास्त लिखाण केलं आहे. तसेच कुटुंबाशी संबंधित घटना लिहिल्या आहेत. आम्ही दोघांनीही चांगला विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटासाठी 'माणसाचा' दृष्टिकोन समोर ठेऊन जास्तीत जास्त लेखन केलं आहे.

तुमच्या 'वाळवी'चा नायक स्वप्नील जोशी 'नाच गं घुमा’ मधून निर्माता म्हणून समोर येत आहे. त्याबद्दल काही सांगू शकाल?

स्वप्नील जोशी माझा चांगला मित्र आहे आणि आम्ही वेळोवेळी बोलत असतो. जेव्हा त्यानं मला चित्रपटाबद्दल विचारलं, तेव्हा मी त्याला सांगितलं की यावेळी त्याला 'बढती' मिळणार आहे. खरं सांगायचं तर हा चित्रपट स्त्रीप्रधान आहे आणि त्यात स्वप्नीलसाठी कोणताही रोल नव्हता. तरीही त्यानं चित्रपटासाठी काम करण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा मी त्याला सांगितलं की तू प्रॉडक्शन सांभाळ आणि तो लगेच तयारही झाला. त्याच्यात उत्तम निर्मात्याचे गुण आहेत आणि त्यानं हा 'रोल' देखील उत्तमरीत्या हाताळला आहे. किंबहुना त्याचा असण्यानं शूटिंग आणि इतर गोष्टी विनासायास पार पडल्या. तो एक अतिशय मनोरंजक व्यक्ती आहे आणि त्याची चित्रपटाला खूप मदत झाली.

या चित्रपटाचे 6 निर्माते असून तुम्ही सर्वांनी मिळून 'हिरण्यगर्भ' नावाची निर्मितीसंस्था स्थापन केली आहे....

हो. स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील, मधुगंधा आणि मी मिळून 'हिरण्यगर्भ' या निर्मितीसंस्थेची स्थापना केली. प्रामुख्यान आम्ही सर्व खूप चांगले मित्र आहोत आणि प्रत्येकाच्या मनात काय सुरु आहे याची कल्पना एकमेकांना असते. त्यामुळे कामात परफेक्शन येते आणि कोणाला काहीही न सांगता सर्व कामे सुरळीतपणे पार पडतात.

हेही वाचा :

  1. शिल्पा शेट्टी आपल्या मुळांपाशी परतली! मुलांसह घेतला 'दैवा कोला'चा विस्मयकारक अनुभव - SHILPA WATCHES DAIVA KOLA
  2. 'इंटरनॅशनल डान्स डे' : शाहिद कपूरसह जॅकी भगनानीनं चाहत्यांना दिल्या 'डान्स डे'च्या शुभेच्छा - international dance day 2024
  3. 'पिकू'च्या सेटवर इरफानला पाहून घाबरली होती दीपिका पदुकोण, 'राणा'बरोबरच्या आवडत्या क्षणांना दिला उजाळा - IRRFAN KHNA DEATH ANNIVERSARY
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.