"यासारखा माझ्या आयुष्यात आनंदाचा दुसरा क्षण नाही"; लता मंगेशकर पुरस्कार मिळताच गझल गायक भीमराव पांचाळे भावुक
महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना 2025 चा संगीत क्षेत्रातील योगदानासाठीचा प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Published : August 6, 2025 at 12:43 AM IST
|Updated : August 6, 2025 at 7:50 AM IST
मुंबई- गझलला मराठीचं कोंदण लावून संगीताला नव्या उंचीवर पोहोचवणाऱ्या 'गझलनवाज' भीमराव पांचाळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. वरळी येथील डोममध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या हीरक महोत्सवी सोहळ्यात अनेक मराठी कलाकार उपस्थित राहिले.
2024 चा चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांना तर चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देऊन सन्मानित करण्यात आलं. याचबरोबर 2024 चा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना आणि स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना देण्यात आला. या प्रतिष्ठित पुरस्कारांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज 'महावारसा पुरस्कार 2025' हा विशेष पुरस्कार युनेस्कोतील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
यासारखा माझ्या आयुष्यात आनंदाचा दुसरा क्षण नाही- लता मंगेशकर पुरस्काराचे मानकरी ठरल्यानंतर गझल गायक भीमराव पांचाळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना प्रतिक्रिया दिली. "हे मराठी गझल वैभव पुढे न्यायचं आहे, आपल्या गझलला रसिकांनी भरपूर दाद द्यावी, आपली मराठी गझल पुढे जावी, या आशेनं आणि अपेक्षेनं सुरू केलेला हा प्रवास 52 वर्षे सुरू आहे. आयुष्य समृद्ध करणारा हा प्रवास आहे. आज त्याला खूप मोठं फळ मिळालं आहे. ज्यांनी जगण्याचं भरणपोषण केलं, त्या लतादीदींच्या नावानं हा पुरस्कार महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आला. यासारखा माझ्या आयुष्यात आनंदाचा दुसरा क्षण नाही". पुढे गझल गायक पांचाळे विनम्रपणे म्हणाले, " हा पुरस्कार आणि सन्मान जीवन देणाऱ्या बाबासाहेबांना, मराठी गझलला जीवन देणाऱ्या सुरेश भट यांना आणि भरभरून दाद देणाऱ्या रसिकांना अर्पण करतो."
पं. भीमराव पांचाळे यांना ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५’ मिळाल्यानंतर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. #महाराष्ट्र_राज्य_मराठी_चित्रपट_पुरस्कार #Maharashtra #AshishShelar pic.twitter.com/TfJV1wZx6Q
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 5, 2025
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जी यांच्या शुभहस्ते पं. भीमराव पांचाळे यांना ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५’ ने सन्मानित करण्यात आले. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks #महाराष्ट्र_राज्य_मराठी_चित्रपट_पुरस्कार… pic.twitter.com/50AsWxZ1X0
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 5, 2025
वाढदिवशी अभिनेत्री काजोलला मिळालं अनोखं गिफ्ट- हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री काजोल हिला राज कपूर विशेष योगदान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. गेल्या 33 वर्षांच्या करिअरमध्ये तिने 200 हून अधिक सिनेमे केले आहेत. या पुरस्कार प्रदान सोहळ्याला तिची आई तनुजा यादेखील उपस्थित होत्या. विशेष म्हणजे आज काजोल हिचा 51 वा वाढदिवस होता. तिला यादिवशी अनोखं गिफ्ट मिळालं.

चित्रपटाला विरोध करत कार्यक्रमात घोषणाबाजी- `खालिद का शिवाजी'' या मराठी चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी दोन व्यक्तींनी पुरस्कार वितरण सोहळ्यात घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री फडणवीस भाषण देण्यासाठी उभे राहताच दोन व्यक्तींनी हातात फलक घेऊन 'इतिहासाचे विकृतीकरण थांबवा' असा घोषणा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना कार्यक्रम खराब करू नका, असं सांगितलं. कार्यक्रमात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन्ही आंदोलकांना कार्यक्रमापासून दूर नेलं.
मराठी चित्रपट हा आमचा अभिमान - सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, "मराठी चित्रपटसृष्टी हा आमचा अभिमान आहे. दादासाहेब फाळके यांनी जर पहिला सिनेमा बनवला नसता, तर कदाचित भारतीय चित्रपट सृष्टीनं इथवर मजल मारली नसती. नाटक हा मराठी माणसाचा प्राण आहे. आजही मी अभिमानाने सांगतो, की अखंड भारतात मराठी नाटकाइतके दर्जेदार काहीही नाही. त्यामुळे मराठी सिने आणि नाट्यसृष्टीच्या मागे शासन म्हणून आम्ही खंबीरपणे उभे आहोत. तुम्ही नवनवीन प्रयोग करीत रहा, आमचे पाठबळ कायम मिळत राहील," अशी ग्वाही यावेळी दिली. समारंभात 'हिरक-स्मृती' नावाच्या विशेष स्मारकाचं प्रकाशन करण्यात आलं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात चित्रपट आणि संगीतातील योगदानाबद्दल पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केलं.
हेही वाचा-

