ETV Bharat / entertainment

६१व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची नामांकने जाहीर!

६१व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची नामांकने जाहीर करण्यात आली आहे. कुठले चित्रपट नामांकित झाले याबद्दल जाणून घ्या...

61st state award for marathi films
६१व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार (Etv bharat)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : June 27, 2025 at 4:40 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - महाराष्ट्राच्या समृद्ध चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ६१वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा यंदाही आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत रंगत आणण्यासाठी सज्ज होत आहे. या पुरस्काराच्या प्राथमिक फेरीतील नामांकन तसेच तांत्रिक विभागातील पुरस्कारविजेते यांची अधिकृत घोषणा नुकतीच सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. आशिष शेलार यांनी केली. याप्रसंगी अपर मुख्य सचिव विकास खारगे आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील यांनीही विजेत्यांचे विशेष अभिनंदन केलंय. ६१वा राज्य पुरस्कार सोहळा केवळ चित्रपटांचा गौरव नसून, महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा, नव्या प्रतिभेचा आणि कलावंतांच्या अथक मेहनतीचा उत्सव ठरणार आहे. सिनेसृष्टीतील प्रत्येक कलावंतासाठी हा क्षण आहे त्यांच्या कलेच्या प्रवासातील एक मानाचा टप्पा.

चित्रपटांच्या अंतिम फेरीत झळकलेली नावे : सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या अंतिम फेरीत झळकलेली नावे आहेत, ती म्हणजे 'आत्मपॅम्प्लेट', 'जिप्सी', 'नाळ २', 'रौंदळ', 'तेरवं', 'जग्गु' आणि 'ज्युलिएट', 'भेरा', 'आशा', 'झिम्मा २' आणि 'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर'. हे दहा चित्रपट अंतिम फेरीत स्थान पटकावत प्रतिष्ठेच्या शर्यतीत उतरले आहेत. कबीर खंदारे ('जिप्सी') आणि त्रिशा ठोसर ('नाळ २') या लहानग्यांनी आपल्या अभिनयानं रसिकांच्या हृदयात घर केलं असून, त्यांना उत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवण्यात येणार आहे.

अभिनेता आणि अभिनेत्री विभागात अटीतटीची स्पर्धा : कथालेखन, संवाद, गीते, संगीत, नृत्यदिग्दर्शन, अभिनय अशा प्रत्येक विभागात दर्जेदार कलाकृतींचा जोरदार सामना रंगला आहे. विशेषतः 'नाळ २', 'आत्मपॅम्प्लेट', 'तेरवं', 'जग्गु' आणि 'ज्युलिएट', 'झिम्मा २', 'महाराष्ट्र शाहीर', 'घर बंदूक बिर्याणी' या चित्रपटांनी सर्वच विभागांत ठसा उमठवला आहे. अभिनेता विभागात श्रीधर वाटसर, अमेय वाघ, सिद्धार्थ जाधव यांच्यात काटेकोर स्पर्धा आहे तर अभिनेत्री विभागात किरण खोजे, वैदही परशुरामी आणि रिंकू राजगुरू यांच्यात अटीतटीची स्पर्धा आहे. विनोदी भूमिकांमध्ये निर्मिती सावंत, नम्रता संभेराव, उपेंद्र लिमये, आनंद इंगळे, गिरिश कुलकर्णी यांचं नाव उठून दिसतंय. दरम्यान प्रथम पदार्पण अभिनेता म्हणून दीपक जोईल, शाहू तुकाराम आणि जयेश ठक्कर यांना तर अभिनेत्री म्हणून गायत्री बनसोडे, श्रद्धा खानोलकर आणि गौरी देशपांडे, यांना नामांकन प्राप्त झालं आहे. हरिष इथापे (तेरवं), गजानन पडोल (रौंदळ) आणि आशिष बेंडे (आत्मपॅम्प्लेट) यांचं दिग्दर्शन नव्या दमाच्या दृष्टिकोनाची चुणूक दाखवतंय. ‘हजार वेळा शोले' पाहिलेला माणूस’, ‘शॉर्ट अँड स्वीट’ आणि ‘जिप्सी’ यांसारख्या चित्रपटांनी प्रथमच निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवून नामांकन मिळविलं आहे.

तांत्रिक कौशल्यांची दाद मिळवणारे कलाकार आहेत.....

कला दिग्दर्शन : अमेय भालेराव (श्यामची आई)
– छायाचित्रण : प्रवीण सोनावणे (जिप्सी)
– संकलन : अक्षय शिंदे (जिप्सी)
– ध्वनिमुद्रण : कुणाल लोळसुरे (श्यामची आई)
– ध्वनी संयोजन : विकास खंदारे (जिप्सी)
– वेशभूषा : मानसी अत्तरदे (जग्गु आणि ज्युलिएट)
– रंगभूषा : हमीद शेख व मनाली भोसले (हजार वेळा शोले पाहिलेला माणूस)