ETV Bharat / bharat

अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनाला देण्यात येणारे व्हीआयपी दर्शन बंद, जाणून घ्या कारण - Ram Navami 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 12:26 PM IST

Ram Navami 2024 : अयोध्येत रामनवमी 2024 चा जल्लोष दिसतोय. राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर ही पहिलीच रामनवमी आहे. या विशेष प्रसंगी भव्य कार्यक्रमाची तयारी करण्यात आलीय. दुसरीकडं व्हीआयपींना देण्यात येणारे चार दिवसांसाठी बंद करण्यात आले आहेत.

Ram Navami 2024
रामनवमी निमित्त अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनाला जाताय, तर आधी ही बातमी वाचा, अन्यथा होऊ शकतं नुकसान

अयोध्या Ram Navami 2024 : राम मंदिराच्या उद्घाटनानंतर पहिल्या रामनवमीला रामनगरीतील भव्य मंदिरात रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. रामनवमीच्या निमित्त रामनगरीत लाखो भाविक येतील, असा अंदाज आहे. त्यामुळं सुरक्षेच्या कारणास्तव 15 ते 18 एप्रिल चार दिवस व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करण्यात आलीय. तसंच आरतीसाठी देण्यात येणारा पासही रद्द करण्यात आला आहे. यासोबतच आधीचं केलेलं ऑनलाइन बुकिंगही रद्द करण्यात आल्याचं ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितलंय.

रविवारी मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा आणि ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी जन्मभूमी संकुलातील रामनवमी मेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. संकुलात प्रवासी सुविधांची तयारी पूर्ण झाल्याचं ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी सांगितलं.

फुलांनी परिसर सजला : प्राणप्रतिष्ठेनंतर पहिल्यांदाच मंदिर परिसरात रामनवमीचं आयोजन करण्यात येणार आहे. संपूर्ण परिसर फुलांनी सजवला जात असतानाच राम मंदिरात रामनवमीच्या दिवशी भव्य उत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. या काळात अयोध्येत येणाऱ्या भाविकांना रामलल्लाचं दिव्य दर्शनही मिळणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत विशेष व्यवस्था केलीय.

सात ओळींमधून भाविक मंदिरापर्यंत पोहोचतील : ट्रस्टचे सरचिटणीस म्हणाले की, "रामनवमीच्या दिवशी रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविक जन्मभूमी मार्गावरुन सात रांगांमधून प्रवेश करतील. मंदिर परिसरातून बाहेर पडताना रामललाचा प्रसादही त्यांना दिला जाणार आहे. दर्शन व्यवस्थेत सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. राम मंदिरात भाविक शांततापूर्ण आणि सुरक्षिततेनुसारच प्रवेश करतील. भाविकांनी मोबाईल फोन, शूज, चप्पल आदी वस्तू सोबत घेऊन दर्शनासाठी मंदिरात पोहोचू नये."

रामनगरीची 7 झोन आणि 39 सेक्टरमध्ये विभागणी : रामनवमीनिमित्त रामनगरीची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलीय. संपूर्ण शहर 7 झोन आणि 39 सेक्टरमध्ये विभागलं गेलंय. यात सिव्हिल पोलीस, आरएएफ, एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि पीएसी तैनात करण्यात आले आहेत. तसंच शरयू घाटापासून मंदिरापर्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. रामपथ, भक्तीपथ, जन्मभूमी पथ येथे बॅरीकेट्सद्वारे गर्दी नियंत्रित केली जाईल. आयजी प्रवीण कुमार यांनी गोंडा आणि बस्ती जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आसपासच्या जिल्ह्यांना जोडणाऱ्या मार्गावरील सुरळीत वाहतूक व्यवस्थेबाबत नियोजन केलंय.

मोठा पोलीस बंदोबस्त : पोलीस अधीक्षक, (शहर) मधुबन सिंह यांनी सांगितलं की, "यावेळी रामनवमीच्या दिवशी अयोध्येत भाविकांची संख्या जास्त असणार आहे. संपूर्ण फेअर एरियाचं झोन आणि सेक्टरमध्ये विभाजन करण्यासोबतच मुख्य स्टॅटिक पॉइंट्सही तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक झोनमध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक तर सेक्टरमध्ये पोलिस उपअधीक्षक आणि निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलीय. घाट सुरक्षित करण्यासाठी जल पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पूर निवारणाच्या दोन पीएसी कंपन्याही तैनात करण्यात आल्या आहेत. यात 11 अतिरिक्त पोलिस अधीक्षक, 150 निरीक्षक, 400 उपनिरीक्षक आणि 1100 हवालदार बंदोबस्तात आहेत.

हेही वाचा :

  1. अयोध्या फक्त एक झलक, मथुरा-काशी बाकी आहे - गोविंद देव गिरी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.