राजस्थानच्या टोंकमध्ये मोठी दुर्घटना, बनास नदीत आंघोळीसाठी गेलेले १० जण बुडाले, ८ मुलांचा मृत्यू
राजस्थानच्या टोंकमध्ये मोठी दुर्घटना घडली. बनास नदीत आंघोळीसाठी गेलेली १० मुलं बुडाली आहेत.

Published : June 10, 2025 at 3:49 PM IST
|Updated : June 10, 2025 at 4:04 PM IST
टोंक : राजस्थानमधील टोंक जिल्ह्यात मंगळवारी (१० जून) एक मोठा अपघात घडला. बनास नदीत आंघोळीसाठी गेलेली ११ मुलं बुडाल्याची घटना समोर आली आहे. यापैकी ८ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच, जयपूरचे जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र कुमार सोनी टोंकला रवाना झाले आहेत. टोंक एसपींनी ८ मुलांचा मृत्यू झाल्याच्या माहितीला दुजारा दिला असून इतरांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बनास नदीत आंघोळीसाठी गेलेले ११ मुलं अचानक नदीच्या प्रवाहात अडकली आणि बुडाली. या हृदयद्रावक घटनेत आतापर्यंत ८ तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. माहिती मिळताच, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. यातील ३ तरुणांना स्थानिक डायव्हर आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीनं वाचवण्यात यश आलं आहे. दरम्यान, या दुःखद घटनेमुळं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पाण्यात बुडालेले सर्व तरुण जयपूरचे रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच जयपूरचे जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र कुमार सोनी टोंकला रवाना झाले आहेत. हा अपघात झाला तेव्हा सर्व तरुण पिकनिकसाठी गेले होते. दरम्यान, रुग्णालयात लोकांची मोठी गर्दी जमली आहे. पोलिस अधीक्षक विकास सांगवान आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक बिजेंद्र सिंह भाटी घटनास्थळी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दुःख- या घटनेवर दुःख व्यक्त करताना सीएम भजनलाल शर्मा यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून लिहिलं की, "टोंक जिल्ह्यात असलेल्या बनास नदीत बुडून तरुणांच्या मृत्यूची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तातडीने बचाव आणि मदत कार्य हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. मी देवाकडे प्रार्थना करतो, की त्यांनी मृतांच्या आत्म्यांना शांती द्यावी आणि शोकग्रस्त कुटुंबांना हे मोठे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी".
पीसीसी प्रमुख गोविंद सिंग दोतासारा यांनीही ट्विटरवर दुःख व्यक्त करत लिहिले की, 'टोंकमधील बनास नदीत बुडून जीवितहानी झाल्याची हृदयद्रावक घटना अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. मृतांच्या कुटुंबीयांना माझ्या मनापासून संवेदना. सरकारने पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करावी". त्याचवेळी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनीही ८ तरुणांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.
सचिन पायलट काय म्हणाले? : या घटनेवर टोंकचे आमदार सचिन पायलट यांनीही दुख व्यक्त केलं आहे. पायलट यांनी ट्विटरवर पोस्ट करून लिहिलं की, 'टोंकला भेट देण्यासाठी आलेल्या काही जयपूर रहिवाशांचा बनास नदीत बुडून मृत्यू झाल्याची बातमी खूप दुःखद आणि हृदयद्रावक आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांच्या कुटुंबियांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. या दुर्घटनेमुळे पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत'.

