ETV Bharat / state

पतंग व्यवसायावर 'संक्रांत'! मांजाच्या भीतीनं मुले आणि युवकांमध्ये पतंग उडविण्याबाबत निरुत्साह, व्यावसायिक चिंतेत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2024, 11:11 AM IST

Updated : Jan 12, 2024, 11:17 AM IST

Makar Sankranti 2024 : एकेकाळी संक्रांत जवळ आली की विविध प्रकारचे पतंग आणि मांजा घेण्यासाठी लहान मुले आणि युवा वर्ग पतंगाच्या दुकानावर मोठ्या प्रमाणात गर्दी करत असत. परंतु गेल्या काही वर्षात मोबाईल आणि टीव्हीमध्ये हरवलेल्या मुलांनी पतंग उडवण्याकडं पाठ फिरवल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळं या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. पूर्वीपेक्षा 30 टक्केदेखील धंदा होत नसल्याची खंत पतंग व्यावसायिकानं व्यक्त केली आहे.

makar sankranti 2024 discouragement of kite flying among children and youth
पतंग व्यवसायावर 'संक्रांत'! मुले आणि युवकांमध्ये पतंग उडविण्याबाबत निरुत्साह, व्यावसायिक चिंतेत

पतंग विक्री व्यवसायाला उतरती कळा

ठाणे Makar Sankranti 2024 : नवीन वर्षाला सुरुवात झाली की सारा आसमंत हजारो पतंगांनी व्यापून गेलेला दिसत असे. लहान मुलं आणि युवावर्गात किती पतंग आणायचे, कुठला मांजा आणायचा याचीच चर्चा सुरू असायची. मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा महाराष्ट्र आणि विशेष करून गुजरातमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाळली जाते. परंतु, काळ बदलला आणि आधुनिकतेच्या जगात अडकलेल्या मुलांनी आणि युवकांनी पतंगांकडे पाठ फिरवली. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेली ही मुले या कलेपासून दूर गेली. पतंग व्यवसायाला शेवटची घरघर लागली. त्यामुळं पतंग विक्रेत्यांमध्ये चिंतेचं वातावरण बघायला मिळतंय.

35 वर्षांपासून करताय व्यवसाय : ठाण्यातील भाजी मार्केट परिसरात मागील 35 वर्षांपासून अब्बू गफार मेमन (अब्बू चाचा) हे पतंग विकण्याचा व्यवसाय करतात. त्यांचा हा व्यवसाय वर्षभर चालत असला तरी दिवाळीनंतर मकरसंक्रांती पर्यंत मोठ्या प्रमाणात पतंगांची विक्री होत असते. अत्यंत लहान अशा शोभेच्या पतंगापासून तीन फूट रुंदीच्या पतंगांपर्यंत, कागद आणि प्लास्टिक पासून बनवलेल्या पतंग आणि मांजा विकण्याचा व्यवसाय अब्बू चाचा करतात. पूर्वी अवघ्या पाच पैशांना मिळणारा पतंग आता पाच ते दहा रुपयांना मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर्षी कार्टून्स बरोबरच हिंदी चित्रपटांचे पोस्टर असलेले पतंगदेखील बाजारात उपलब्ध आहेत. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे मिशन 2024 चा विशेष राजकीय पतंगदेखील यावेळी त्यांच्याकडे पाहायला मिळाले. मात्र, यावर्षी जवळपास दोन लाखांचा माल आणला. पण आतापर्यंत फक्त त्यातील 30 टक्केच माल विकला गेल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुलं पतंग उडविण्याच्या कलेपासून दूर गेल्यानं आपल्या व्यवसायाला उतरती कळा लागल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.


ग्राहक काय म्हणतात : पतंग उडवताना चायनीज मांजा न वापरता साधा दोरा वापरावा जेणेकरून अपघात होणार नाहीत, असे मत अश्विनी पाटील यांनी व्यक्त केलं. तसंच चायनीज मांजामुळे दरवर्षी अनेकजण जायबंदी होतात. तर पक्षांना देखील त्यामुळे दुखापत होते. तेव्हा सगळ्यांनीच साधा दोरा वापरून पतंग उडवण्याचा आनंद घ्यावा. मांजापासून होणाऱ्या दुखापतीमुळं पालक लहान मुलांना पतंग उडवण्यापासून दूर ठेवत असल्याचं मत राहुल गुप्ता या पतंगप्रेमीनं व्यक्त केलं.



हेही वाचा -

  1. PETA Chinese Manja Protest In Pune : मकरसंक्रांत...; अंगावर रक्ताचे डाग लावून चीनी मांजा न वापरण्याचे पेटा संस्थेकडून आवाहन
  2. Makar Sankranti : पारंपरिक पद्धतीची संक्रांत स्पेशल भोगीची भाजी, जाणून घ्या रेसिपी
  3. Makar Sankranti : मकर संक्रांतीसाठी बनवा तिळाचे हेल्दी लाडू, जाणून घ्या 'ही' झटपट रेसिपी
Last Updated : Jan 12, 2024, 11:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.