ETV Bharat / state

5 सप्टेंबर शिक्षकदिन विशेष : डिसले गुरुजींना कशी सुचली 'क्यूआर कोड'ची संकल्पना, वाचा...

author img

By

Published : Sep 5, 2021, 6:08 AM IST

रणजितसिंह डीसले या शिक्षकामुळे भारतातील एनसीआरटी आणि महाराष्ट्र शिक्षण विभागाच्या बालभारती विभागाने आपल्या सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये क्यूआर कोड पद्धत लागू केली आहे.

teachers day
teachers day

सोलापूर - जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेड्यातील रणजितसिंह डीसले या शिक्षकामुळे भारतातील एनसीआरटी आणि महाराष्ट्र शिक्षण विभागाच्या बालभारती विभागाने आपल्या सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये क्यूआर कोड पद्धत लागू केली आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना याचा भरपूर लाभ मिळत आहे. मोबाईल किंवा स्मार्ट फोनमध्ये पाठ्यपुस्तकातील क्यूआर कोड स्कॅन करताच पुस्तकातील सर्व अभ्यासक्रम मोबाईलमध्ये दिसत आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने डीसले गुरुजींसोबत संवाद साधला आहे.

प्रतिक्रिया

...आणि सुचली क्यूआर कोडची संकल्पना -

रणजितसिंह डीसले हे सोलापूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षण सेवक म्हणून भरती झाले. खेड्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण कसे देता येईल, यावर त्यांचा अभ्यास सुरू होता. त्यासाठी डीसले गुरुजी मोबाईलमध्ये व्हिडीओ रिकोर्ड करून, लॅपटॉपद्वारे किंवा सोशल मीडियामधून ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न करत होते. 2018मध्ये ते बाजारात काही वस्तू खरेदीसाठी गेले होते. तेथे त्यांनी सर्वात पहिल्यांदा क्यूआर कोड पाहिला. दुकानदार आपल्याला ज्याकाही वस्तू दिल्या आहेत, त्या वस्तूंवरील क्यूआर कोड त्याने स्कॅनरने स्कॅन केल्या. स्कॅन केल्याबरोबर संबंधित वस्तूची सर्व माहिती समोर आली होती. त्यावरून रणजीतसिंह डीसले यांना पाठ्यपुस्तकांमध्येदेखील क्यूआर कोड संकल्पना आणून पाठ्यपुस्तकाची इत्यंभूत माहिती एका क्लिकवर मोबाईल किंवा लॅपटॉप, संगणकावर दिसावी, अशी संकल्पना सुचली.

एनसीआरटीने घेतली दखल -

सोलापूर जिल्हा परिषदेच्या माढा तालुक्यातील परितेवाडी या गावात रणजितसिंह डीसले वाड्या वस्त्यांवरील गरीब व शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाचे धडे देत होते. क्यूआर कोडच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाची सुरुवात केली. त्याचा फायदा कसा होणार याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांना आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांना पटवून सांगितले. एनसीआरटीच्या शिक्षकांनी व वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेत सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये क्यूआर कोड पद्धत लागू केली. सीबीएसईमधून शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळू लागला. त्यांनतर लगेच बालभारती पाठ्यपुस्तकांमध्येदेखील क्यूआर कोड सुरू झाले.

विद्यार्थ्यांना कोरोना काळात सर्वात जास्त फायदा -

मार्च 2020 पासून देशात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केले. देशातील सर्व शाळा महाविद्यालये बंद झाली. ऐन वार्षिक परिक्षांसमोर असताना शाळा बंद झाल्या. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवाद बंद झाले. यावेळी क्यूआर कोडचा फायदा विद्यार्थ्यांना होऊ लागला. अनेक विद्यार्थी क्यूआर कोड स्कॅन करून पुस्तके आपल्या मोबाईल किंवा संगणकावर सेव्ह करून घेत घरीच अभ्यास करू लागली. सर्व विश्व महामारीमुळे बंद असताना सोलापुरातील परितेवाडी येथील डीसले गुरुजींच्या क्यूआर कोडमुळें शिक्षणाचे धडे सुरू होते.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील डीसले गुरुजींची दखल-

आंतरराष्ट्रीय पातळीवर रणजितसिंह डीसले यांची दखल घेण्यात आली. युनेस्को व लंडनस्थित वारकि फाउंडेशन यांच्याकडून दरवर्षी दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार 2020 साली घोषित करण्यात आला. सात कोटी रुपये व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. जगातील 140 देशांमधून सोलापुरातील एका खेड्यातील शिक्षकाची निवड झाल्याने सोलापुरा जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले होते.

हेही वाचा - कोरोना उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतो, माझ्याशी नाही - चंद्रकांत पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.