ETV Bharat / state

महिलेने डॉक्टर पतीला परिचारिकेसोबत रंगेहात पकडले

author img

By

Published : Feb 2, 2021, 7:24 AM IST

येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पत्नीने त्याला परिचारिकेसोबत रंगेहात पकडले. या प्रकरणी पत्नीने पोलीस तक्रार दिली असून पोलिसांनी डॉक्टरला ताब्यात घेतले आहे.

police station
पोलीस ठाणे

परभणी - पत्नी घरी नसल्याची संधी साधून जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने परिचारिका म्हणून काम करणाऱ्या प्रेमिकेला भेटण्यासाठी बोलावले. मात्र, पत्नीने वडील व भावासोबत येलदरीगाठून परिचारिका व पतीला नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणातील परिचारिका राणीसावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. येलदरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातील शासकीय निवासस्थानात ३१ जानेवारीच्या रात्री ही घटना घडली. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून वैद्यकीय अधिकाऱ्यासह परिचारिका, आई-वडील, भाऊ-बहीण या सहा जणांविरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

10 लाख रुपयांसाठी पत्नीचा करत होते छळ -

या वैद्यकीय अधिकाऱ्याचा विवाह 6 मार्च 2017ला परभणी येथे झाला होता. मात्र, लग्नानंतर पती, सासरा, सासू, दीर, नणंद यांनी संगनमत करून आपला शारीरिक व मानसिक छळ सुरू केल्याचा आरोप या डॉक्टरच्या पत्नीने केला आहे. पतीने गाडी घेण्यासाठी माहेरून 10 लाख रुपये आणण्यासाठी मारहाण केली होती. ही बाब पीडित महिलेच्या पालकांना समजताच त्यांनी रक्कम देऊन छळ थांबवण्याची विनंतीही केली होती.

कोल्हा केंद्रातील परिचाकेसोबत जुळले होते सुत -

जानेवारी 2019 ते ऑगस्ट 2020 दरम्यान आरोपी डॉक्टर कोल्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होते. त्या ठिकाणी कार्यरत कंत्राटी परिचारिकेसोबत त्याचा परिचय झाला. याची वाच्यता सगळीकडे झाल्यानंतर परिचारिकेने डॉक्टरच्या वडील व सासऱ्याकडून 15 लाख रुपये घेत यानंतर डॉक्टरशी संबंध ठेवणार नाही, असे लिहून दिले होते. परंतु. डॉक्टरची येलदरी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून बदली झाल्यानंतरही दोघांचे प्रेमसंबंध सुरूच होते, असे या संदर्भात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

डॉक्टर नको त्या अवस्थेत -

27 जानेवारी 2021 रोजी फिर्यादीची तब्येत बरोबर नसल्याने तिचे आईवडील तिला दवाखान्यात नेण्यासाठी औरंगाबाद येथे घेऊन गेले. तेव्हा बायको नसल्याची संधी साधत डॉक्टरने परिचारिकेला येलदरी येथील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निवासस्थानी बोलावून घेतल्याची माहिती विवाहितेला मिळाली. या माहितीवरून पीडिता 31 जानेवारी रोजी रात्री वडील व भावासोबत तेथे हजर झाली. यावेळी घर आतून बंद दिसल्याने तिचा भाऊ घराच्या छतावरून घरात उतरला. यावेळी डॉक्टर आणि परिचारिका दोघेही नको त्या अवस्थेत घरात आढळले.

त्या दोघांनाही पोलिसांनी घेतले ताब्यात -

त्यानंतर पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टर व त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या विरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जिंतूर पोलिसांनी डॉक्टर व परिचारिकेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.