ETV Bharat / state

कोरोनाचा कहर; नवा मोंढा पोलीस ठाण्यातील दुसरा कर्मचारीही बाधित, 2 रुग्णांचा दुपारपर्यंत मृत्यू

author img

By

Published : Aug 18, 2020, 3:08 PM IST

परभणी शहरातील नवामोंढा पोलीस ठाण्यातील दुसरा पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आला आहे. तर दुपारपर्यंत दोन बाधितांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देखील घडली आहे.

parbhani
पोलीस ठाणे

परभणी - गेल्या काही दिवसात परभणी पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी देखील कोरोनाबाधित आढळून येत आहेत. त्यानुसार परभणी शहरातील नवामोंढा पोलीस ठाण्यातील दुसरा पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आला आहे. तर दुपारपर्यंत दोन बाधितांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देखील घडली आहे. दरम्यान, कोरोनाबाधित पोलिसाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यातील अन्य 12 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची देखील तपासणी करण्यात आली, सुदैवाने ते सर्व निगेटीव्ह असून, त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

मंगळवारी दुपारपर्यंत दोन कोरोनाबधितांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये परभणी शहरातील लक्ष्मीनगर येथील 60 वर्षीय पुरुष आणि परभणी तालुक्यातील पेडगावच्या 55 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. प्रशासनाच्या वतीने या दोन्ही रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
दरम्यान, यापूर्वी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवामोंढा पोलीस ठाण्यातीलच एक कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आला होता. त्यावेळी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकासह अन्य सर्व अधिकारी आणि कर्मचारी क्वॉरंटाईन झाले होते. त्यावेळी सर्व कर्मचाऱ्यांची रॅपिड एंटीजन तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये ते सर्व निगेटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर सोमवारी झालेल्या तपासणीत नवा मोंढा पोलीस ठाण्यातील 45 वर्षीय दुसरा पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आला आहे. त्यामुळे सदर कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेले ठाण्यातील 12 अधिकारी आणि कर्मचारी यांची देखील रॅपिड एंटीजन तपासणी करण्यात आली. त्यात हे सर्व कर्मचारी निगेटिव्ह आढळून आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र या सर्व कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून कोरोनाबाधित कर्मचाऱ्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.


विशेष म्हणजे परभणी प्रमाणेच मागील महिनाभराच्या कालावधीत मानवत, गंगाखेड, सोनपेठ आणि पालम येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय कोरोनाबाधित आढळून आले आहेत. पोलीस दलातील कोरोनाबाधित यांची वाढती संख्या पाहता जिल्हा पोलिस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात यावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.

पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी बाधित आढळून येत असल्याने त्यांचा संसर्ग समाजातील इतर नागरिकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दररोज शेकडो नागरिक पोलिसांच्या संपर्कात येत असतात. ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना देखील याचा धोका होऊ शकतो. शिवाय पोलीस शहरात विविध ठिकाणी सेवा देत असतात, त्यामुळे त्यांच्या मार्फत कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत असल्याने जिल्हा पोलीस दलातील सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या व्हाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.