ETV Bharat / state

नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त; अखेरच्या दोन रुग्णांना उपचारानंतर सोडण्यात आले घरी

author img

By

Published : May 19, 2020, 10:08 AM IST

Updated : May 19, 2020, 2:40 PM IST

nandurbar
नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त; अखेरच्या दोन रुग्णांना उपचारानंतर सोडण्यात आले घरी

जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले तळोदा तालुक्यातील बोरद येथील 68 वर्षीय महिला व नंदुरबार तालुक्यातील नटावद येथील 31 वर्षीय पुरुष असे अखेरचे दोघेही रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने सोमवारी त्यांना रुग्णालरातून घरी पाठविण्यात आले.

नंदुरबार - जिल्ह्यात आढळलेल्या 21 कोरोनाबाधितपैकी 19 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. अवघ्या एका महिन्यात कोरोनावर मात करीत नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. 21 पैकी दोघांचा मृत्यू झाला असून 17 जण गेल्या काही दिवसाआधी कोरोनामुक्त झाले होते. तर जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले तळोदा तालुक्यातील बोरद येथील 68 वर्षीय महिला व नंदुरबार तालुक्यातील नटावद येथील 31 वर्षीय पुरुष असे अखेरचे दोघेही रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने सोमवारी त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.

नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त; अखेरच्या दोन रुग्णांना उपचारानंतर सोडण्यात आले घरी

दरम्यान, बामखेड्यातील 19 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले असून अद्याप 57 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेतील कोरोना योद्ध्यांना खर्‍या अर्थाने अहोरात्र प्रयत्न केल्याने जिल्ह्यातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने प्रशासनाचे कार्य कौतुकास्पद आहे.

देशासह राज्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना नंदुरबार जिल्ह्यात 17 एप्रिलला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. गुजरात, मध्यप्रदेश या परराज्यांसह नजीकच्या धुळे जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळल्याने नंदुरबार जिल्ह्यातही कोरोनाने शिरकाव केला होता. कोरोना विषाणूच्या साखळीतील रुग्ण महिन्याभरात आढळून येत असल्याने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 21 वर पोहोचली. त्यात शहाद्यातील 32 वर्षीय युवकाचा व नंदुरबारातील 80 वर्षीय वृध्देचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बाधितांच्या संपर्कातील लोकांची माहिती घेवुन सर्वेक्षणाचे काम आरोग्य यंत्रणेने कोटेकोरपणे केले. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजनबध्द उपाययोजना राबविल्या. बाधितांच्या वास्तव्याचा परिसर तातडीने प्रतिबंधात्मक परिसर म्हणुन जाहीर करित वेळोवेळी निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. तसेच बाहेरगावाहुन येणार्‍या प्रत्येकांवर आरोग्य यंत्रणेसह पोलीस प्रशासनानेही करडी नजर ठेवली.

नंदुरबार जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेल्याने पुन्हा ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेने कंबर कसली होती. प्रशासनाने लागू केलेल्या उपाययोजना व लॉकडाऊनच्या आदेशाचे जिल्हावासियांनी काटेकोरपणे पालन करित प्रशासनाला सहकार्य केले. या सार्‍या बाबींचा लेखाजोखा पाहता नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त झाला असून पुन्हा ग्रीन झोनमध्ये आला आहे. जिल्हा रुग्णालयात बाधित असलेल्या रुग्णांवर वैद्यकीय अधिकार्‍यांसह आरोग्य कर्मचार्‍यांनी उपचाराचे शर्थीचे प्रयत्न सुरुच ठेवले. तर बाधित रुग्णांनीही कोरोनामुक्त होण्यासाठी उपचाराला प्रतिसाद दिला. त्यामुळे बाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन सुखरुप घरी पोहोचले आहे.

17 एप्रिल रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने बाधितांची साखळीनुसार नंदुरबार शहरासह शहादा व अक्कलकुव्यात कोरोनाचे रूग्ण आढळले. त्यातील काही रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तर उपचार सुरू असलेल्या अखेरच्या दोन रुग्णांचे अहवाल देखील निगेटिव्ह आले आहेत.

नवापूर, तळोदा व धडगाव हे तीन तालुके आधीपासूनच कोरोनामुक्त आहेत. सोमवारी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तळोदा तालुक्यातील बोरद येथील 68 वर्षीय महिला व नंदुरबार तालुक्यातील नटावद येथील 31 वर्षीय पुरूष असे अखेरच दोन कोरोना रूग्ण संसर्गमुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत, उपजिल्हाधिकारी कैलास कडलग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. डी. भोये अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. के. डी. सातपुते, डॉ.पंकज चौधरी, अधिपरिचारिका नामी गावीत, पौर्णिमा भोसले, मंजुषा मावची, टिना वळवी, कक्षसेवक उदर परदेशी, अक्रम शेख आणि जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेले सर्व 19 रुग्ण कोव्हिड संसर्गमुक्त झाले आहेत.

शेवटच्या या दोन्ही रुग्णांना टाळ्यांच्या गजरात आणि फुलांची उधळण करीत घरी पाठविण्यात आले. जाताना दोन्ही रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांनी देखील सर्व रुग्ण संसर्गमुक्त झाल्याने समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील सर्व रुग्ण संसर्गमुक्त झाल्याबद्दल समाधान आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन अनावश्यक गर्दी टाळावी. शहरातील व्यवहार सुरळीत करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न असून नागरिकांनी सहकार्य करावे. या संकटापासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व कोरोना योध्दांविषयी सन्मानाची भावना ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

Last Updated :May 19, 2020, 2:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.