ETV Bharat / state

Nanded News: 'या' जिल्हा परिषद शाळेत उन्हाळी सुटीतील अनोखा उपक्रम; वृक्षांच्या सान्निध्यात मुक्त वाचनालय उपक्रम

author img

By

Published : Apr 24, 2023, 6:54 AM IST

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील जवळा देशमुख या जिल्हा परिषदेच्या शाळेने एक नवनवीन संकल्पना राबवली आहे. विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने खुल्या वातावरणात मुक्त वाचनालयाची संकल्पना मांडली. मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांच्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे. जागतिक पुस्तक दिन व वाचन दिनानिमित्त नवनवीन उपक्रम राबवण्याची संकल्पना जवळा देशमुख येथील शिक्षकांनी सुरू केली आहे.

Open Library Activity
मुक्त वाचनालय उपक्रम

विद्यार्थ्यांनी नोट्स जर काढल्या, तर त्यांच्या मनात पुस्तकाप्रती विचार रुजू होतील- केंद्रप्रमुख नागोराव जाधव

नांदेड : टीव्ही, मोबाईल, ऑनलाईन गेमच्या काळात वाचक अदृश्य होत चालला आहे. त्यासाठी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी. तसेच वाचन संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, यासाठी जवळा देशमुख येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी वृक्षराजींच्या सान्निध्यात मुक्त वाचनालय हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. पुस्तक हे मस्तक घडविण्याचे काम करते. वाचनाने विचारांच्या कक्षा रुंदावत असतात. समाजात वाचन संस्कृतीचा परिपोष होण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. शालेय पातळीवर गोष्टींचा वार शनिवार, वाचन प्रेरणा दिवस, खाऊ प्रकल्प, लेखन वाचन हमी कार्यक्रम, वाचनालय शाळेच्या दारी, असे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांचे उद्देश वेगवेगळे असले तरीही वाचक निर्माण करणे, हे उद्दिष्ट असते


दीडतासांचा अनोखा उपक्रम : शालेय परिसरात वृक्षराजींच्या सान्निध्यात मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर, सहशिक्षक संतोष घटकार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, सदस्य आनंद गोडबोले, मारोती चक्रधर, हैदर शेख, माता पालक संघाच्या अध्यक्षा मनिषा गच्चे यांच्या सहकार्याने मुक्त वाचनालय हा दीडतासांचा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे स्वागत केंद्रप्रमुख नागोराव जाधव, केंद्रीय मुख्याध्यापक शिक्षणविस्तार आंबलवाड,आनंदा नरवाडे, अधिकारी सरस्वती गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे, सरपंच कमलताई शिखरे, माजी सरपंच कैलास 7 गोडबोले आदींनी केले आहे.


'असा' आहे उपक्रम : विद्यार्थी झाडांच्या सावलीत बसून सकाळच्या सत्रात सुरू असलेल्या उपक्रमात सहभागी होतात. कोणतेही आवडीचे पुस्तक घेऊन वाचत बसतात. तसेच वाचन झाल्यावर ते परत ठेवून देतात. शाळेच्या प्रांगणातील झाडांना दोरी बांधून त्यास गोष्टींची, शूरविरांची, थोर महापुरुषांची चरित्रे, वैज्ञानिकांची पुस्तके आदी विविध प्रकारची पुस्तके डकविण्यात येतात. ही प्रक्रिया सतत दीड तास चालते, असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थीही यात सहभागी होत आहेत.


मुक्त वाचनालय उपक्रम : पुस्तक दिनानिमित्त नांदेडमध्ये जवळा देशमुख या जिल्हा परिषदेच्या शाळेने नवीन उपक्रम राबवला. शाळेंना सुट्ट्या असताना देखील विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती वाढावी, या मुख्य उद्देशाने शिक्षकांनी मुक्त वाचनालय उपक्रम राबवला. निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्यांना बसवून वाचन संस्कृती वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. दीडशे पुस्तकांचे दहा तोरण बांधत विद्यार्थ्यांना खुल्या मैदानात झाडाखाली मोकळ्या वातावरणात मुक्त वाचनालय सुरू केले. विद्यार्थ्यांना पाहिजे ते सर्व प्रकारचे पुस्तके आवडीचे पुस्तके विद्यार्थी मुक्तपणे वाचण्यासाठी घेऊ शकेल, अशी व्यवस्था करून वाचन संस्कृती वाढावी अशी संकल्पना जवळा देशमुख या शाळेमध्ये राबवली. वाचन दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम सुरू करण्यात आला.


पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होईल : जी पुस्तके आपण वाचतोय, ते आकलनात्मक वाचन केले पाहिजे. त्यामधून काही थोड्याशा नोट्स काढल्या पाहिजे. पुस्तक कोणत्या लेखकाचे आहे? त्यामध्ये काय संकल्पना आहे? त्या पुस्तकातून आपल्याला काय बोध घेता येईल? विद्यार्थ्यांनी वाचनाच्या नोट्स जर काढल्या, तर चिरकाल त्यांच्या मनात पुस्तकाप्रती विचार रुजू होतील. एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होईल, असे विद्यार्थ्यांनी जर जोपासले तर मोबाईल टीव्ही व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म न पाहता विद्यार्थी वाचनाकडे नक्कीच वळेल, असा संदेश केंद्रप्रमुख नागोराव जाधव यांनी दिला आहे.

हेही वाचा : Kusumagraj Library in Rikshaw : रिक्षाचालकाने रिक्षामध्येच सुरू केले 'कुसुमाग्रज फिरते वाचनालय'!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.