ETV Bharat / state

Mantralaya Suicide News : मंत्रालयासमोर तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू

author img

By

Published : Mar 28, 2023, 9:34 PM IST

मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सोमवारी दुपारी दोघींनी किटकनाशक प्राशन करून तर, एका अपंग बांधवाने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये धुळ्यातील रहिवासी शीतल गादेकर (47) यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच नवी मुंबईच्या रहिवासी संगीता डवरे यांच्यावर सर जे. जे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तिन्ही आत्महत्यांच्या प्रयत्नांप्रकरणी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करून मरीन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत.

Maharashtra Ministry Suicide Case
आत्महत्या

मुंबई: धुळे एमआयडीसी परिसरात राहत असलेल्या शीतल गादेकर यांचे पती रवींद्र गादेकर यांच्या नावावर धुळे एमआयडीसी परिसरात 9 गुंठे जागा होती. त्यांनी ही जागा नरेशकुमार मनोत याला भाडेतत्त्वावर दिली होती. मात्र, मनोत याने 2010 मध्ये तत्कालीन एमआयडीसी अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही जमीन खोटी नोटरी बनवून स्वत:च्या नावावर करून घेतली. शीतल यांनी धुळ्यातील मोहाडी पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी करूनही काहीच कारवाई केली गेली नाही. त्यांनी प्रशासनाच्या विविध स्तरावर तक्रारी करूनही त्यांची दखल घेतली न गेल्याने त्यांनी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र, न्याय न मिळाल्याने याच नैराश्यातून त्यांनी सोमवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास मंत्रालयाच्या मुख्यप्रवेशद्वारासमोर किटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शीतल यांना ताब्यात घेत याप्रकरणी गुन्हा दाखल केला. यानंतर त्यांना उपचारांसाठी सर जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

'त्या' डॉक्टरांविरुद्ध कारवाई नाही: नवी मुंबईतील उलवे परिसरात राहत असलेल्या संगीता डवरे यांचे पती हनुमंत डवरे हे नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. कर्तव्यावर असताना गेल्या वर्षी त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. डवरे यांच्यावर बेलापूरमधील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार नीट न केल्याने पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संगीता यांनी रुग्णालयातील डाॅक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली. गुन्हा दाखल करून न्याय मिळत नसल्याने संगीता यांनी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास संगीता यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. संगीता यांनी किटकनाशक प्यायल्याचे लक्षात येताच येथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ त्यांना उपचारांसाठी सर जे. जे. रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.


अपंगाचा आत्मदहनाचा प्रयत्न: पुण्यातील मावळचे रहिवासी असलेले रमेश मोहीते (४८) हे अपंग बांधव दुपारी सव्वादोनच्या सुमारास मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पोहचले. त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत स्वत:ला जाळून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला; परंतु, पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

हेही वाचा: MNS Protest Against Hawkers : फेरीवाला मुक्त परिसराची डेडलाईन संपली; मनसे स्टाईलने आंदोलनाला सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.