ETV Bharat / state

Sanjay Raut On Sharad Pawar Resign : शरद पवारांचा निर्णय कुठलीही राजकीय खेळी नाही - संजय राऊत

author img

By

Published : May 2, 2023, 7:24 PM IST

Updated : May 2, 2023, 7:54 PM IST

शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय ही कुठलीही राजकीय खेळी नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच शरद पवार हे समाजकारणातून कधीच निवृत्त होणार नाहीत, असेही राऊत यावेळी म्हणाले.

Sanjay Raut
संजय राऊत

संजय राऊत

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाने महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात खळबळ माजली आहे. शरद पवार यांच्या या निर्णयावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांनी पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगून त्यांनी राजकारणातून संन्यास घेतलेला नाही, असे म्हटले आहे. तसेच शरद पवारांचा निर्णय हा कुठलीही राजकीय खेळी नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

'पदावरून निवृत्त, राजकारणातून नाही' : यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतलेला असून ते राजकारणातून निवृत्त होणार नाहीत. शरद पवार हे समाजकारणातून कधीच निवृत्त होणार नाहीत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ज्या काही अंतर्गत घडामोडी सुरू आहेत, त्या अनुषंगाने हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. मी या विषयावर बोलणे उचित होणार नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वाची फक्त राज्यालाच नाही तर देशालाही गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या पक्षात त्यांच्या या निर्णयासंदर्भात चर्चा सुरू आहे. यावरही लवकरच निर्णय घेतला जाईल. काही घडामोडी अचानक घडल्या असल्या तरी त्यात अनपेक्षित असे काही नाही, असं मला अलीकडच्या काही निर्णयावरून वाटतं, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

'बाळासाहेबांनीही दिला होता राजीनामा' : या विषयावर पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा अशाच पद्धतीने राजीनामा दिला होता. 1990 च्या दरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी सुद्धा असंख्य कार्यकर्ते आणि नेते अस्वस्थ झाले होते. पक्षातील राजकारण, चालू असलेल्या सद्य घडामोडी यांचा बाळासाहेबांना उबग आला होता. परंतु त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसैनिकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये राजीनामा मागे घेण्यास हट्ट धरला होता की, काही दिवसांनी त्यांना त्यांचा राजीनामा मागे घ्यावा लागला होता. अशा परिस्थितीत हे मोठे नेते कुठल्या परिस्थितीत निर्णय घेतात हे सांगू शकत नाही, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

'मविआला फरक पडणार नाही' : संजय राऊत पुढे म्हणाले की, आज त्यांच्या पक्षाच्या बैठका सुरू असून त्यांचा पक्ष थोडा गोंधळलेला दिसत आहे. त्यांच्याच पक्षाचा आधारस्तंभ पदावरुन दुर होत असताना इतर पक्षांनी जावून त्यांच्यात व्यत्यय आणणे बरोबर नाही. आम्ही एकमेकांशी संपर्कात आहोत. तसेच शरद पवार यांच्या निर्णयाचा महाविकास आघाडीवर काही एक फरक पडणार नाही, असेही राऊत म्हणाले.

हेही वाचा : Sanjay Raut on Sharad Pawar Retirement : भाकरी फिरवण्याचे संकेत होते, पण तवाच फिरवला; पवारांच्या राजीनाम्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Last Updated : May 2, 2023, 7:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.