ETV Bharat / state

मुंबईतच घरे मिळावीत या मागणीवर गिरणी कामगार संघटना ठाम, मुंबईबाहेर जाण्यास नकार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 28, 2023, 5:04 PM IST

Mill Workers House Issue : मुंबईत गिरणीच्या जागेवर गिरणी कामगारांना घरे देण्यात यावी अशी मागणी गिरणी कामगारांनी केली होती. यावर राज्य शासनाने त्यांची ही मागणी मान्य केली होती. (mill workers in mumbai) पण, सध्या चित्र वेगळंच आहे. या गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर घरे देण्याचं ठरवण्यात आलं आहे. मात्र सरकारने कामगारांना मुंबईतच घरे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे. (houses for mill workers)

Mill Workers House Issue
गिरणी कामगार घर

मुंबईतच घरे मिळावीत

मुंबई Mill Workers House Issue : मुंबईत गिरणी कामगारांसाठी घराची जागा उपलब्ध नसल्याने आता गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर घरे दिली जातील. त्यासाठी ठाणे जिल्ह्यात 54 एकराचा भूखंड ताब्यात घेतला जात आहे. तर मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण परिसरात अन्य घरांची उपलब्धता करण्यात येत आहे, असं सरकारने स्पष्ट केलं आहे. (mill workers union) मात्र सरकारने शब्द दिल्याप्रमाणे गिरणी कामगारांना मुंबईतच घरे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे.


घरे मिळवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा : मुंबईतील गिरणी कामगारांना त्यांच्या गिरण्यांच्या जागेवर हक्काची घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुमारे सात दशके मुंबईच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असणाऱ्या आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाग घेतलेल्या गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळावीत यासाठी कामगार संघटनांनीही सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळे गिरण्यांच्या जागेवर उभ्या राहणाऱ्या इमारतींमध्ये गिरणी कामगारांना घरे देण्यात यावी किंवा त्यांच्या वारसांना घरे देण्यात यावी यासाठी म्हाडाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.

पावणेदोन लाख गिरणी कामगारांचा घरासाठी अर्ज : गिरणी कामगारांच्या घरांसाठी विकास नियमावलीत तरतूद करून गिरण्यांची एक तृतीयांश जागा म्हाडाला ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार म्हाडाकडून या जागांवर गृहनिर्माण योजना राबवण्यास सुरुवात झाली. 2012 पासून आतापर्यंत मुंबईतील 27 गिरण्यांच्या जागेवर सुमारे 15,870 सदनिका उभारण्यात आल्या आहेत. यापैकी अकरा हजार 158 सदनिका वितरित करण्यात आल्या असून 4712 सदनिका शिल्लक आहेत. मात्र असे असले तरी आतापर्यंत गिरणी कामगारांना प्रत्यक्ष घराचा मिळालेला ताबा लक्षात घेता ही संख्या अत्यल्प म्हणजेच 1718 इतकी आहे. तर आतापर्यंत सुमारे पावणे दोन लाख गिरणी कामगारांनी अथवा त्यांच्या वारसांनी घरासाठी अर्ज केला आहे.


गिरणी कामगारांना मुंबई बाहेर जावे लागणार : मुंबईमध्ये असलेल्या गिरण्यांच्या जागेवर उभ्या राहणाऱ्या इमारतींमध्ये गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला. असं असलं तरी यापैकी कित्येक गिरण्यांची जमीन ही यापूर्वीच अन्य कारणांसाठी वापरण्यात आली आहे, अथवा गिरणी मालकांनी ती म्हाडाकडे सुपूर्द केली नाही. त्यामुळे केवळ 27 गिरण्यांच्या भूखंडावरच गिरणी कामगारांसाठी घरे उभारण्यात आली; परिणामी आता मुंबईमध्ये गिरणी कामगारांना घर मिळणं दुरापास्त झालं आहे. मुंबईमध्ये अपार कष्ट करून मुंबईच्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा असलेल्या गिरणी कामगाराला आता मुंबई बाहेरचा रस्ता धरावा लागणार आहे. राज्य सरकारने गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घरे देण्याचे आश्वासन दिले होते. एक लाख घरे आम्ही निर्माण करू, असे सरकार सांगत आहे. त्यामुळे सरकारने काहीही झाले तरी गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्यावीत अशी मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस निवृत्ती देसाई यांनी केली आहे.


काय आहे सरकारचा प्रस्ताव? गिरणी कामगारांसाठी आता मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण परिसरात जागा निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील उत्तर शिव येथे 27 एकर कल्याणमधील रायते येथे अडीच एकर गौरी पाडा येथे दोन एकर आणि हेदूटने येथे 23 एकर अशी सुमारे 54 एकर जागा निश्चित केली जात आहे. या जागेवरील चटई क्षेत्रफळाचा विचार करता सुमारे 19 हजार घरे उपलब्ध होऊ शकतील अशी माहिती गृहनिर्माण विभागाच्या उपसचिवांनी दिली. याशिवाय आता मुंबई आणि परिसरातही घरांसाठी जागा उपलब्ध नसल्याने गिरणी कामगार जर मुंबई बाहेर अन्य जिल्ह्यांमध्ये राहत असतील तर त्या-त्या जिल्ह्यांमध्ये शासकीय जागांवर गृहनिर्माण योजना राबविणे शक्य आहे का हे तपासले जात आहे. तसेच गिरणी कामगारांना घराऐवजी दहा लाख रुपये रक्कम देण्याचा पर्यायही उपलब्ध होतो का, याचीही चाचपणी सुरू असल्याचे म्हाडा मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.


काय आहे सद्यस्थिती? गिरणी कामगारांकडून पात्रता निश्चितीसाठी पुन्हा एकदा अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार आतापर्यंत सुमारे 76 हजार 878 गिरणी कामगारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. यापैकी सुमारे 59 हजार 549 अर्ज पात्र ठरले आहे तर 452 अर्ज अपात्र ठरले आहेत. 12140 गिरणी कामगारांकडून अधिक स्पष्टीकरण मागवण्यात आलं असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 2012 मध्ये 18 गिरण्यांच्या जागेवर सुमारे 6925 घरे उपलब्ध करून देण्यात आली. यापैकी 6759 घरे वितरित करण्यात आली असून 166 घरे अजूनही शिल्लक आहेत. 2016 मधील सोडतीत सहा गिरण्यांच्या भूखंडावर 2634 घरे उपलब्ध करून देण्यात आली. त्यापैकी 2520 घरे वितरित करण्यात आली असून 114 घरे शिल्लक आहेत. एमएमआरडीएच्या 2417 घरांपैकी ५१९ घरे वितरित करण्यात आली असून १८९८ घरे शिल्लक आहेत. गिरणी कामगारांच्या घरांसाठी शेवटची सोडत 2020 मध्ये काढण्यात आली. या तीन गिरण्यांच्या भूखंडावर 3894 घरे उपलब्ध करून देण्यात आली. यापैकी 1360 घरे वितरित करण्यात आली असून 2534 घरे शिल्लक आहेत.

हेही वाचा:

  1. मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांची पुन्हा 'वर्षा'वर भेट, तर्क वितर्कांना उधाण
  2. आमदार अपात्र सुनावणी प्रकरण : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वर्षभर राहिले चर्चेत, भूमिकेवर सरकारचं भवितव्य
  3. बलात्काराच्या आरोपीचा डीएनए पीडितेच्या बालकाशी जुळलाच नाही; कोर्टानं दिला जामीन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.